Thursday, April 25, 2019

फरक

फरक
स्थळ... दुर्गम भागातील एक छोटे खेडे
ठिकाण ... गावाचा पार
वेळ... सकाळी 10
आज गावातील एक तरुण डॉक्टर बनून आला आहे . ग्रामस्थांनी त्याच्या सत्कार करायचे ठरविले आहे . आता तो त्याचे मनोगत व्यक्त करतोय
"सर्वप्रथम गावकऱ्यांचे आभार . त्यांनी वेळात वेळ काढून.घरातील ...शेतातील ..कामे सोडून माझे कौतुक करायला इथे हजर राहिले . पण खरे तर हे तुमच्यामुळेच शक्य झाले आहे .आज मी डॉक्टर बनून इथे आलोय त्याला कारणीभूत तुम्हीच आहात. आपल्या वेदना ..आजार.. विसरून तुम्हाला फक्त पोटासाठी कष्ट करणेच माहिती आहे . मुलगा झाला की काही वर्षांनी शेताला मजूर लाभला म्हणून आनंद व्यक्त करायचा आणि मुलगी झाली तर केव्हा एकदा वयात येतेय आणि तिचे लग्न करून परघरी पाठवतोय असे व्हायचे तुम्हाला .गावात बरीच वर्षे वीज फक्त नावालाच आहे .धड सरळ रस्ता नाही ...सरकारी वाहन  दिवसातून स्वतःच्या वेळेप्रमाणे कधीतरी येणार .डॉक्टर हा प्रकार आम्हाला माहितीच नव्हता . मी दहा वर्षाचा असताना माझी चार वर्षाची बहीण वारली. ती का वारली....???कशी वारली ....??हे माहीत नव्हते . सकाळी उठलो तेव्हा आई तिला मांडीवर घेऊन रडत होती .काही दिवसांनी मला म्हणाली तिला डॉक्टरकडे नेले असते तर वाचली असती. कालपर्यंत माझ्या बरोबर  खेळणारा माझ्या वयाचा मित्र सकाळी खेळायला आलाच नाही तेव्हा कळले रात्री ताप येऊन तो देवाघरी गेला ..डॉक्टर असते तर वाचला असता म्हणजे आज डॉक्टर असते तर हे सर्व वाचले असते. मग आपण का डॉक्टर होऊ नये . असा विचार करून मी अभ्यासाला सुरवात केली . ज्या ज्या वेळी नाउमेद व्हायचो त्यावेळी तो मित्र आणि बहीण आठवायची . आणि पुन्हा झपाटून गेल्यासारखे अभ्यासाला लागायचो . मिळेल त्या शिक्षवृत्ती ....मिळेल तशी मदत घेत पुढे जात राहिलो . प्रसंगी लोकांच्या पाया ही पडलो.मेरिटवर प्रवेश मिळावला. डॉक्टर व्हायचे हे पक्के डोक्यात बसले होते . मला माहितीय मी डॉक्टर होऊनही तुमचे प्राण वाचवीनच याची हमी देऊ शकत नाही पण प्राण वाचवायचे प्रयत्न करीन याची हमी देऊ शकतो . माझ्या ज्ञानाचा वापर मी गावसाठीच करेन हा माझा शब्द आहे .धन्यवाद ......
स्थळ.... मुंबई
ठिकाण ... उच्चभ्रू वस्तीतील पॉश हॉटेल
वेळ... रात्री नऊ
आज सोसायटीतील एक मुलगा डॉक्टर झाला होता . त्या यशाची पार्टी त्याने आयोजित केली होती .सोसायटीतील मित्रमैत्रीनिणा त्याने बोलावले होते . टेबलवर उंची दारू ,आणि इतर पेय तसेच वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ होते.
"चियर्स फॉर सक्सेस .....असे म्हणत सर्वांनी ग्लास एकमेकांना भिडवले आणि तोंडाला लावले . मग तो उठून उभा राहिला .
"च्यायला ....झालो एकदाचा डॉक्टर ...!!  आई बापाची खूप इच्छा होती पोरगा डॉक्टर व्हावा . आयुष्यभर दोघांनीही नोकरी करून पैसे कमावले .आम्ही काय करतोय...???कसे राहतोय ..?? याकडे लक्ष दिले नाही . फक्त जे पाहिजे ते आणायला पैसे देत राहिले.गरज आहे त्यापेक्षा जास्त दिले . सोसायटीतील मुले डॉक्टर किंवा इंजिनियर बनतात नाहीतर एमबीए .म्हणून मला डॉक्टर बनायला सांगितले . पाहिल्यावर्षी मार्क कमी पडले म्हणून दुसर्यावर्षी नवीन जोमाने प्रयत्न करायला सांगितले . डबल क्लास लावला .शेवटी डोनेशन भरून ऍडमिशन घेतले .वर्षाला दोन दोन लाख फी भरली . त्यासाठी वडिलांनी ओव्हर टाईम केला . आपला मुलगा डॉक्टर झाला पाहिजे हीच अपेक्षा . तरच चार लोकांत ताठ मानेने जगता येईल असे त्यांना वाटले. मला काय वाटते कोणी विचारलेच नाही . एकदा विचारले बाबांना खरेच डॉक्टर होऊन मी लोकांची सेवा करू शकेन का ....??? तर बाबा म्हणतो "हल्ली मुंबईत कोण डॉक्टर सेवा करतो ..?? आणि 70 % लोकांना एकसारखेच आजार सर्दी खोकला ताप .Bp आणि शुगर  आणि ताप चेक करायला मशीन निघाल्यात . जास्त काही समजले नाही तर स्पेशालिस्टची चिट्ठी देऊन पुढे पाठवायचे . आपण शिक्षणासाठी केलेला सर्व खर्च लवकरात लवकर वासून केला पाहिजे .उद्या आम्हाला अभिमानाने सांगता आले पाहिजे आमचा मुलगा डॉक्टर आहे .च्यायला..... मला तर व्हायोलिन शिकायचे होते . संगीत मला प्रिय आहे . बासरी शिकायची आहे . त्याचे कार्यक्रम करायचे आहेत . मागे रात्री बासरी वाजवताना बाबांनी पाहिले सकाळी त्याचे दोन तुकडे  डस्टबिन मध्ये सापडले .हे असे वाजवून काही मिळणार नाही आयुष्यात . असा दमही वर मिळाला . उद्यापासून आता रोज माझी जाहिरात होईल मुलगा डॉक्टर झालाय . दोन वर्षांनी स्वतःचा दवाखाना उघडेन आणि सुरवातीची फी 200 रु घेऊन धंद्याला सुरवात करेन . आज पोटभर पिऊन घ्या चियर्स ...
© श्री. किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment