Monday, May 25, 2020

रॅम्बो..5 लास्ट ब्लड

रॅम्बो..5  लास्ट ब्लड 
रॅम्बो सिरीजमधील कदाचित हा अखेरचा चित्रपट. म्हणूनच लास्ट ब्लड हे नाव दिल असावे.
पहिल्या चार भागापेक्षा पूर्ण वेगळा असा हा चित्रपट . सैन्यात सर्वात घातक आणि एकटा कामगिरी करणारा जॉन रॅम्बो आता थकलाय. त्याच्या हालचाली मंद झाल्यात. पण तरीही त्याची बुद्धी अजूनही शार्प आहे . आतापर्यंत त्याने अनेक कठीण कामगिऱ्या एकट्यानेच पार पाडल्या आहेत.
फर्स्ट ब्लडमध्ये जरी तो शांत दिसत होता तरी त्याच्या डोळ्यात आग होती . पण आता तो आपल्या रॅम्बो इस्टेटमध्ये सुखी समाधानी आयुष्य जगतोय . 
त्याच्या आधीच्या चारही भागात भरपूर ऍक्शन होती . फर्स्ट ब्लड आणि रॅम्बोमध्ये तर दर तीन मिनिटानंतर ऍक्शन हाणामारी होती . पण काळानुसार ती कमी होत गेली.
स्टॅलोनने स्वतःचे वय मान्य केले असावे . त्यामुळे या भागात फार कमी ऍक्शन आहे . आधी काही मिनिटे चित्रपट खूप संथ आहे . काय कथा असेल याचा अंदाज येत नाही . पण नंतर मुख्य कथा सुरू झाल्यानंतर चित्रपट वेग घेतो . 
हा एक सूडपट आहे . मेक्सिको येथील ड्रगआणि मुली सप्लाय करणारा  माफिया जो त्याच्या आयुष्यात वादळ  आणतो  आणि रॅम्बो त्याला अतिशय क्रूरपणे संपवितो.
यावेळी त्याला आपल्या शक्तीची पूर्ण कल्पना आहे. म्हणूनच तो  त्याच्या विभागात न जाता आपल्या इस्टेटमध्ये खेचून आणतो आणि ठार मारतो . रॅम्बो गौरीला युद्धात एक्सपर्ट आहे त्यामुळे इस्टेटमधील भुयारात जे काही सापळे तयार करतो ते बघण्यासारखे आहे .
यात  मुख्य खलनायकाची तो अतिशय क्रूरपणे हत्या करतो . ते कदाचित जॉन रॅम्बोच्या स्वभावाविरुद्ध असावे . शेवटी कुटुंबावर किंवा स्वतःच्या प्रेमाच्या व्यक्तींसाठी माणूस कुठल्या थराला जाऊ शकतो हेच दिग्दर्शकाला दाखवायचे असेल .
एकूण रॅम्बोप्रेमींना हा चित्रपट फारसा आवडणार नाही .
© श्री. किरण बोरकर

No comments:

Post a Comment