Tuesday, January 25, 2022

धक्का

धक्का
तो तिला नेहमी कोपर्यावरच्या टपरीत चहा पिताना दिसायचा .राकट चेहरा..  कडक नजर. ती जवळून गेली की त्याची नजर आपल्या पाठीवर रेंगाळतेय याची जाणीव दूरपर्यंत होत असे.  कधी कधी त्याच्यासोबत मित्र असायचे सिगरेट ओढत ...पण ह्याच्या हातात कधीच दिसली नाही .
हळूहळू तिला त्याची सवय होत गेली.तो दिसला नाही तर कावरीबावरी होऊन इथे तिथे नजरेने शोधीत राहायची त्या . त्या दिवशी तो  तिच्या नजरेला नजर देत हसला आणि काळजात एक कळ उठली.
ती घरात मोठी...एका प्रायव्हेट कंपनीत जॉब करत होती. आई शिक्षिका तर बाबा बँकेत. लहान भाऊ कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला. छोटे सुखी सरळ कुटुंब .सरळमार्गी जगणारे.  घरी वातावरण  मोकळेच होते. त्यामुळे मित्र मैत्रिणींची दोघांनाही कमी नव्हती.
त्या दिवशी संध्याकाळी ती मार्केटला गेली होती.डेअरीमधून एक लिटर दुध घेतले आणि ऑनलाइन पेमेंट करायला मोबाईल उघडला.
अरे देवा ....!! नेट पॅक संपला होता आणि पर्समध्ये सुटे पैसेही नव्हते. " ओ शीट...आता काय करू ..."?? ती स्वतःशी पुटपुटली.
"मी काही मदत करू का..." ?? एक दमदार आवाज कानावर पडला आणि तिने वळून पाहिले. तो तिच्याकडे पाहून विचारत होता. तिचा चेहरा कसानुसा झाला . जणूकाही चोरीच पकडली गेलीय. त्याने तिचा होकार गृहीत धरून स्वतःच्या मोबाईलवरून ऑनलाइन पेमेंट केले. 
"थँक्स .." ती खाली मान घालून पुटपुटली .
" थँक्स कसले ...!! मला पैसे परत करा ... उपकार फिटले ....तो हसत म्हणाला . मोबाईल नंबर ...??? 
तिने सांगितलेला नंबर त्याने सेव्ह केला . 
"व्हाट्स अप केलाय .....फोन चालू झाला की पेमेंट करा..." असे बोलून तो निघाला.
मनात हुरहूर ठेवूनच ती घरी आली आणि नेहमीच्या सवयीप्रमाणे आईला घडलेली गोष्ट सांगितली.
"पोरगा भल्या घराचा दिसतो ...."आई सहज म्हणाली.
रात्री नेट रिचार्ज करून तिने त्याला हाय केले आणि ऑनलाइन पेमेंट करून टाकले . दोन दिवसांनी भावासोबत फिरायला निघाली तेव्हा तो पुन्हा टपरीवर दिसला यावेळी तिने स्वतःहून हाय केले आणि भावाची ही ओळख करून दिली. तिचा भाऊ ही तिच्या सारखाच दिसायचा .हसताना ही तिचीच ठेवण उचलली होती.त्याने  तिच्या भावाची खूप चौकशी केली .काही मदत लागल्यास नक्की विचार असे बोलून आपला मोबाईल नंबर ही दिला. त्याचे दिलखुलास वागणे  पाहून ती सुखावली.
हळू हळू त्यांची मैत्री वाढत चालली होती. मध्येच तो एकदा घरी येऊन आई वडिलांनाही भेटून गेला. मुलांचा मित्र यापलीकडे दोघांनीही फार लक्ष दिले नाही . तो तिच्याशी रोज बोलत होता आणि तितकेच तिच्या भावाशीही . उलट कधी कधी तो त्याच्याशीच जास्त बोलतो असे तिला वाटे .त्याच्या वागण्यावरून आपले मन लवकरच उघडे करेल अशी आशा तिला वाटू लागली . त्याचे वागणे खूपच संयमी होते . कधी कधी ते एकत्र फिरायला जात तेव्हाही तो तिच्याशी अंतर ठेवूनच वागत असे .त्याचा संयमी स्वभावच तिला आवडत होता . 
पण हल्ली घरी तिच्या लग्नाविषयी चर्चा सुरू झाली होती. तिने आडून त्याच्याकडे विषयही काढला होता पण होईल सर्व व्यवस्थित असे बोलून विषय वाढवला नव्हता .ती दिवसेंदिवस बैचेन होऊ लागली .
आज मात्र तिचे कामात लक्ष लागत नव्हते .वडिलांनी मित्राच्या मुलाचा फोन नंबर देऊन त्याला भेटण्यास सांगितले होते. ती खूपच अस्वस्थ झाली होती . कामात लक्ष लागेना म्हणून सरळ अर्धा दिवसाने घरीच निघाली.
आज त्याला विचारावेच लागेल.त्यासाठी भावासोबत त्याला भेटून या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावायचा असे मनाशी ठरवूनच ती घरी आली .
स्वतःकडील लॅचकीने दरवाजा उघडून ती आत शिरली. घरात शांतता दिसत होती भावाला फोन लावणार इतक्यात बेडरूममधून कुजबुज ऐकू आली ती दाराजवळ गेली तेव्हा तिला काही सुस्कारे ऐकू आले .मनात  चिंता ठेवून तिने दार लोटले आणि समोरचे दृश्य पाहून  शी..... अशी किंकाळी फोडली . समोर तो आणि तिचा भाऊ  नको त्या अवस्थेत एकमेकांच्या मिठीत होते .
© श्री.किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment