Tuesday, April 26, 2022

विक्रम वेधा

विक्रम वेधा
ही कथा आहे चांदोबातील विक्रम वेताळची.
पण इथे विक्रम राजा नसून एक प्रामाणिक पोलीस अधिकारी आहे.जो जनतेचे गुन्हेगारांपासून रक्षण करण्यास बांधील आहे.
तर वेताळ आहे एक क्रूर गुन्हेगार ज्याच्या नावावर अनेक खून आणि इतर गुन्हे आहेत.त्याचे नाव आहे वेधा.
जेव्हाजेव्हा विक्रम वेधाला पकडतो तेव्हातेव्हा  वेधा त्याला एक गोष्ट सांगतो आणि त्यावर प्रश्न विचारतो . त्या प्रश्नाचे उत्तर मिळताच वेधा विक्रमच्या तावडीतून निसटतो..पण त्या गोष्टीतूनच एका रहस्याचा उलगडा होत जातो.विक्रम त्यातूनच काही नवीन गोष्टी शिकतो.
वेधाचा भाऊ पोलीस एन्काऊंटरमध्ये मारला गेलाय .तो निरपराध होता असे वेधाचे म्हणणे.तर त्याला मारल्यामुळे वेधा संतापून बाहेर येईल आणि तो सहज शिकार होईल असा पोलिसांचा प्लॅन .
पण काही घटना उलट घडत जातात ज्या विक्रमला गोंधळून टाकतात.विक्रमचा जवळचा मित्र सायमन एका एन्काऊंटरमध्ये मारला जातो.सायमनच्या हत्येमागे वेधाच आहे अशी विक्रमची खात्री आहे तर आपल्या भावाच्या हत्येमागे नक्की कोणाचे कारस्थान आहे याचा शोध वेधाला घ्यायचा आहे .हळूहळू या गोष्टीतूनच एक असे रहस्य उलगडते त्याने विक्रम हादरून जातो.
आर माधवन विक्रमच्या भूमिकेत जीव ओतलाय. त्याची मध्येमध्ये पांढरे केस डोकावणारी  खुरटी दाढी वेशभूषा  देहबोली तो एक परिपक्व अनुभवी पोलीस अधिकारी असल्याचे दर्शविते .तर वेधाच्या भूमिकेत विजय सेतुपती अगदी सहज वावरतो.त्याचे आत्मविश्वासाने गोष्ट सांगणे ,सहजपणा आपल्याला त्याच्या बाजूने झुकवितो. या दोघांमधील रंगतदार सामना पाहण्यासाठी विक्रम वेधा पाहायलाच हवा 
© श्री. किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment