Saturday, November 5, 2022

काय लागतं जगायला ?....डॉ. नम्रता पडवळ

काय लागतं जगायला ?....डॉ. नम्रता पडवळ 
लोकव्रत प्रकाशन 
लेखिका व्यवसायाने फिजिओथेरिपिस्ट आहे.आपल्या मनाला आनंद देणाऱ्या गोष्टी ती कागदावर उतरवते. तिचे हे म्हणणे शब्दशः खरे आहे हे हा कथासंग्रह वाचल्यावर कळते. यात गोष्टी छोट्या आहेत.शब्दानेही आणि विषयानेही . पण त्या वाचताना आपण नकळत गुंतत जातो.त्या कथेचा एक भाग बनतो.त्यातील घडणाऱ्या घटनांच्या जवळपास आपण हजर आहोत आणि आपल्या डोळ्यासमोर ते घडतेय असे वाटते.
तिच्या पहिल्या वासरू कथेत गाय आणि वासराचे निर्मळ नाते उलगडून दाखविले आहे . परिस्थितीनुसार वासरात होणाऱ्या बदलाचे सूक्ष्मपणे निरीक्षण केले आहे.
मर्मबंधातील ठेव यात लेखिकेने आपल्या मराठी विषयाच्या शिक्षिकेला शालांत परीक्षेत सर्वोच्च गुण मिळवून एक प्रकारची भेटच दिली आहे .तीच मर्मबंधातील ठेव आहे तिच्यासाठी.
गोंडस गुलाबी गाठोडं आणि चिरंजीव या दोन कथेत त्यांनी सहा वर्षाच्या मुलाचा खोडकरपणा आणि आपल्या लहान बहिणीबद्दलचे प्रेम काळजी आणि समजूतदारपणा दाखविला आहे.या दोन्ही गोष्टी त्यांनी इतक्या सहज सोप्या आणि गोड भाषेत लिहिल्या आहेत त्याबद्दल कौतुक करावे तितके कमीच.प्रत्येकाला आपल्या मुलाच्या बालपणीच्या खोड्या आठवतील.माझ्यामते त्यांनी चिरंजीव या पात्रावर अनेक कथांची मालिका लिहावी.
लेखिकेने छोट्या छोट्या गोष्टीत किती आनंद असतो आणि तो कसा मिळवावा हेच या पुस्तकातून सांगितले आहे.मनावर जर ताण असेल तर हे पुस्तक काढून त्यातील कोणतीही एक कथा वाचून ताण हलका करावा असेच हे पुस्तक आहे.
मी यातील इतर कथांविषयी लिहीत नाही .तुम्हीच पुस्तक वाचून आनंद घ्या .
डॉ. नम्रता मॅडमनी वेळातवेळ काढून माझ्या घरी येऊन पुस्तक भेट दिले यासाठी त्यांचे मनापासून आभार .यापुढेही त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित होवो आणि साहित्याची सेवा घडो .

No comments:

Post a Comment