Saturday, May 18, 2024

जन गण मन

जन गण मन
Jana Gana Mana
कॉलेजची लाडकी  तरुण प्रोफेसर  साबा मरियमचे जळलेले प्रेत सुनसान रस्त्यावर आढळले आणि सगळे कॉलेज हादरले.पोलिस आणि मीडियाने हत्येपूर्वी तिच्यावर बलात्कार झालाय असेही जाहीर केले. संपूर्ण कॉलेज त्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी गांधी चौकात जमले पण तिथेही पोलिसांनी निर्दयपणे त्यांच्यावर लाठीचार्ज केला.आता तर देशच पेटला .राज्य सरकारने  एसीपी सज्जनकुमार सारखा हुशार अधिकारी या संपूर्ण घटनेच्या तपासासाठी नियुक्त केला .
सज्जनकुमारने तीस दिवसात आरोपींना कोर्टात हजर केले जाईल असे विद्यार्थ्यांना आश्वासन दिले आणि दिवसरात्र मेहनत करून त्याने चार आरोपींना पकडले .
पण राजकीय हस्तक्षेपामुळे ऐनवेळी त्याच्याकडून केस काढून घेण्यात आली . आरोपींनाही दुसऱ्या कस्टडीत हलवा असा आदेश दिला गेला.सज्जनकुमारला वेगळीच शंका आली आणि त्यातच आरोपींना पकडले गेले ही बातमी मीडियात लिक झाली.
सज्जनकुमार स्वतः आरोपींना दुसऱ्या कस्टडीत घेऊन जायला निघाला आणि मध्येच त्यांचे एन्काऊंटर केले. आरोपींचे एन्काऊंटर झालेले ऐकून संपूर्ण राज्य खुश झाले.एसीपी सज्जनकुमारच्या मागे राज्यातील स्त्री वर्ग आणि समाज उभा राहिला .संपूर्ण पोलीस दल ही सज्जनकुमारच्या पाठीशी होता. पण केंद्रीय मानवअधिकारकडून कोर्टात  नकली एन्काऊंटरची केस उभी राहिली आणि सज्जनकुमारला आरोपी म्हणून उभे केले गेले.पण....
 तिथेच चित्रपटाचा मध्यंतर झाला .
मध्यंतरानंतर  कोर्टात आरोपी सज्जनकुमार विरुद्ध खटला सुरू झाला.एक अनोळखी, एका पायाने लंगडत चालणारा अरविंद स्वामी  नावाचा वकील सज्जनकुमार विरुद्ध खटला लढतोय.
पण हे इतके सरळ साधेसोपे नाही .खरा चित्रपट तर मध्यंतरानंतर सुरू होतो .आपल्याला अनपेक्षित धक्क्यावर धक्के मिळत जातात आणि हे धक्के चित्रपटाच्या शेवटच्या मिनिटापर्यंत आहेत.
एक श्वास रोखून ठेवणारा हा चित्रपट मल्याळम भाषेत नेटफ्लिक्सवर आहे .पण हिंदी सबटायटल्समुळे आपल्याला समजण्यात कोणतीही अडचण येत नाही.एका बैठकीत पाहता येईल असा हा चित्रपट आहे.

Wednesday, May 15, 2024

मर्डर इन माहीम

Murder In Mahim
मर्डर इन माहीम 
प्रॉक्सी गे आहे.तो माहीम स्टेशनवर धंदा करतो.प्लॅटफॉर्मच्या टोकाची मुतारी त्याचा अड्डा आहे.त्या दिवशी रात्री तो नेहमीप्रमाणे एका कस्टमरला घेऊन आत शिरला आणि त्या कस्टमरने त्याची क्रूरपणे हत्या केली.दुसऱ्या दिवशी त्याचे प्रेत पोलिसांना सापडले. त्याची किडनी गायब होती .इन्स्पेक्टर शिवाजीराव जेंडे तिकडचे प्रमुख ऑफिसर आहेत. जेंडेचे वडीलही पोलीस ऑफिसर होते पण त्यांना निलंबित केले होते.फिरदास रबानी ही नवीन लेडीज ऑफिसर त्यांच्या मदतीला आहे.
एका गेचा खून कशासाठी झाला याचा शोध घेत असतानाच दुसऱ्या गेचा खून होतो आणि तो ही माहीम स्टेशनजवळच .खुनी प्रत्येकवेळी एक नाव देत असतो .यावेळी तर त्यांच्याच चौकीतल्या एका इन्स्पेक्टरचे नाव लिहिलेले असते.
पिटर फर्नांडिस निवृत्त पत्रकार .एके काळी तो जेंडेचा खास मित्र होता.पण जेंडेच्या वडिलांचा भ्रष्टाचार त्याने उघडीस आणला आणि त्यांची नोकरी गेली.पिटरचा मुलगा सुनील समलिंगी संबंधाला पाठिंबा देतोय हे पिटरला कळते आणि तो हादरतो.आपला मुलगा ही गे आहे अशी त्याला शंका येते आणि तो त्याची शहानिशा करायचे ठरवितो.त्यात जेंडेला सुनील ही या प्रकरणात आहे असे पुरावे सापडतात.
जेंडे आणि पिटर पुन्हा एकत्र येऊन या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन खरा खुनी शोधून काढतात.
समलिंगी संबंधावर आधारित या सिरीजमध्ये मानवी स्वभावाचे वेगवेगळे कंगोरे आपल्याला दिसतात.आपले मूल समलिंगी आहे हे कळल्यावर पालकांची होणारी प्रतिक्रिया आणि त्यातून घडणारे प्रसंग आपण पाहू शकतो.
जी सिनेमावर ही सिरीज हिंदी मराठी मध्ये आहे .

वन

One
वन
आपल्या आजूबाजूला बऱ्याच घटना घडत असतात.सामान्य माणसांना महत्वाच्या व्यक्तींचा नेहमीच्या जीवनात प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे त्रास होत असतो.अशीच एक घटना एका राज्यात महत्वाचा बदल घडवून आणते.
दशप्पन एक गरीब गृहस्थ, आपली पत्नी, मोठी मुलगी सीना, जी एका मॉलमध्ये पार्किंग सिक्युरिटी आहे आणि मुलगा, सनाल जो कॉलेजमध्ये शिकतोय, यांच्यासोबत राहतोय.
दशप्पन डिलिव्हरी बॉयचे काम करतो.एका रात्री उंच बिल्डिंगमध्ये जेवण डिलिव्हरी करायला जातो पण लाईट गेलेली असते .तरीही कस्टमर त्याला जेवण घरी आणून द्यायला सांगतो. बारा मजले चढून दशप्पन त्याच्या घरी जातो तेव्हा त्यालाच अपमानित व्हावे लागते.तो चक्कर येऊन पडतो .हॉस्पिटलमध्ये त्याला ऍडमिट केले जाते. पण त्याचवेळी केरळचे मुख्यमंत्री तिथे येतात आणि सामान्य माणसांना बाहेर ठेवले जाते.त्या गडबडीत सनालला पोलिसांकडून मारहाण होते.
या सर्व घटनेमुळे सनाल चिडतो पण सिस्टीम पुढे आपण काहीच करू शकत नाही म्हणून हताश होतो . नंतर तो खोट्या आयडीने या सर्व प्रसंगाची बातमी फेसबुकवर पोस्ट करतो.ती पोस्ट व्हायरल होताच समाजात मुख्यमंत्र्याविरुद्ध असंतोष पसरतो.विरोधक याचा फायदा घेऊन मुख्यमंत्र्यांना कचाट्यात पकडण्याचा प्रयत्न करतात.
पोस्टकर्त्याला सर्व पातळीवरून पकडण्याचे प्रयत्न सुरू होतात . तेव्हा सनाल घाबरतो आणि पळून जाण्याचा प्रयत्न करतो पण पोलीस पकडतात. मुख्यमंत्री त्याला आणि वडिलांना बंगल्यावर भेटायला बोलावतात.
त्याच्या या पोस्टचा आणि सनालचा मुख्यमंत्री कसा वापर करून घेतात हे पाहणे मनोरंजक आहे.
मुख्यमंत्री एक नवीन बील तयार करतात . ते पास होणार नाही याची खात्री त्यांना असते . पण ते प्रयत्न सोडत नाही.त्यांना या कामात सनाल मदत करेल का ??
सुपरस्टार ममूटी मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख भूमिकेत नेहमीसारखी छाप पाडून जातो. मुख्य म्हणजे चित्रपटात अजिबात हिंसा नाही. पण चित्रपट आपल्याला गुंतवून ठेवतो.
चित्रपट प्राईम व्हिडिओवर मल्याळम भाषेत असला तरी हिंदी सबटायटल्समुळे  समजायला अजिबात अडचण येत नाही .
एका वेगळ्या विषयावरील चित्रपट नक्की पहावा.

Saturday, May 11, 2024

बार्बेरियन

Barbarian
बार्बेरियन
टेस नोकरीच्या इंटरव्ह्यूसाठी डेट्रोइटच्या ब्राईटमूरला आली होती.खरे तर तो भाग एकदम निर्मनुष्य होता.इस्टेट एजंटने तिला एक घर भाड्याने दिले होते.रात्री त्या घराजवळ ती पोचली पण घरात दुसराच तरुण पाहून तिला धक्काच बसला. किथने देखील ते घर भाड्याने घेतले होते .आता दोघांचाही नंबर त्या एजंटला लागत नव्हता.रात्रीची त्या निर्मनुष्य विभागात कुठे जाणार ?? म्हणून टेसने किथची त्या घरात राहण्याची विनंती मान्य केली.
दुसऱ्या दिवशी ती  इंटरव्ह्यू देऊन परत आली तेव्हा किथ नव्हता.तिने सहज घराची तपासणी सुरू केली आणि तिला तळघर दिसले.तळघर आत खोलवर पसरले होते. तळघरात  एक रिकामी खोली आणि त्यात बेड आणि व्हिडिओ कॅमेरा होता.ती घाबरून परत फिरली.थोड्या वेळाने किथ घरी आला तेव्हा तिने सर्व माहिती किथला दिली.
किथने त्या तळघरात जाण्याचा निर्णय घेतला .तो टेसला बाहेर थांबवून तळघरात शिरला.काही वेळाने त्याच्या मदतीसाठी हाका ऐकू आल्या. टेस त्याला मदत करायला तळघरात शिरली आणि तेथील भयानक प्रकार पाहून हादरली.
गिलब्रीड एक हॉलिवूड कलाकार .त्याच्यावर एका अभिनेत्रीने लैंगिक शोषणचा खटला दाखल केलाय .तो खटला लढायला त्याच्याकडे पुरेसे पैसे नाहीत म्हणून तो आपली प्रॉपर्टी विकायला डेट्रॉईटला आलाय .ही तीच प्रॉपर्टी आहे जिथे टेस आणि किथ राहत होते.
गिलब्रीड जसा त्या घरात शिरतो तेव्हाच त्याला कळते इथे कोणीतरी राहतोय.तो चिडून प्रॉपर्टी मॅनेजरला फोन करतो तेव्हा ती प्रॉपर्टी कोणालाच दिली नाही असे सांगण्यात येते.कोण आहेत याचा शोध घेतानाच त्याला तळघर दिसते.कुतूहल वाटून तो त्या तळघरात शिरतो आणि आतील दृश्य पाहून हादरतो.
असे काय आहे त्या तळघरात जे त्या प्रॉपर्टीच्या मालकालाच माहीत नाही .डेट्रोइटच्या त्या भागात मनुष्यवस्ती का नाही ? का सगळी घरे ओस पडली आहेत ? टेसी आणि किथचे त्या तळघरात काय झाले ?? गिलब्रीडही त्यात अडकणार का ??
अंगावर शहारे आणणारा हा चित्रपट नेटफ्लिक्सवर हिंदी भाषेत आहे.

Wednesday, May 8, 2024

बिग गेम

Big Game 
बिग गेम 
फिनलँडच्या उंच पर्वतरांगात आणि गर्द दाट जंगलात काही शिकारी टोळ्या राहतात. जंगल हेच त्यांचे घर आहे.त्यातीलच एक टोळी ओस्करीची आहे.ओस्करीचे वडील त्या टोळीतील एक.मुलगा तेरा वर्षाचा झाला की त्याला एकट्याला  तीर कमान घेऊन जंगलात हरणाच्या शिकारीसाठी पाठवायचे ही त्या टोळीची जुनी परंपरा आहे.त्याने हरीण मारून त्याचे मुंडके घेऊन आला तर तो शिकारीसाठी लायक झाला असे समजले जाते.उद्या ऑस्करी तेरा वर्षाचा होईल म्हणून आजच त्याला जंगलात पाठविले जाते.खरे तर ऑस्करी तितका तयार झाला नाही पण परंपरेनुसार त्याला शिकार आणावीच लागेल.
अमेरिकेचे अध्यक्ष एअर फोर्स वनमधून प्रवास करणार आहेत.त्याचे विमान फिनलँडच्या जंगलातूनच जाणार असते.काही आतंकवादी त्या उंच शिखरावर दबा धरून बसले आहेत.त्यांच्याकडे अत्याधुनिक चिनी बनावटीची जमिनीवरून मारा करणारी मिसाईल आहेत. त्यांनी एअरफोर्स वनवर ती मिसाईल सोडून ते पाडले. पण एका बंदिस्त बॉक्समधून प्रेसिडन्ट बाहेर पडले.
ऑस्करी जंगलात शिकार शोधत असताना त्याला एअर फोर्स वन कोसळताना दिसले आणि नंतर तो बॉक्स दिसला. त्याने प्रेसिडन्टला त्या बॉक्समधून बाहेर काढले.
पण आता आतंकवादी त्या दोघांचाही शोध घेतायत. ऑस्करी त्यांच्यापासून प्रेसिडन्टचे रक्षण करेल का ??
एका लहान मुलांची भन्नाट शौर्यगाथा पहायची असेल तर प्राईम व्हिडिओवर बिग गेम हिंदी भाषेत पाहायला विसरू नका.दीड तासाचा हा चित्रपट आपल्याला खिळवून ठेवतो.
सॅम्युअल जॅक्सन प्रेसिडन्टच्या भूमिकेत आहेत.तर ऑस्करीच्या भूमिकेत ओंनी टोम्मीला आहे.

Monday, May 6, 2024

अकेली

Akelli
अकेली
ज्योती पंजाबच्या छोट्या गावात आपली आई आणि पुतणीसोबत राहतेय.तिचा भाऊ आणि वहिनी केदारनाथ यात्रेत अपघातात गेले. ती एअरपोर्टवर काम करत होती पण तिथेही तिच्यावर शिस्तभंगाची कारवाई करून काढून टाकले जाते.आता तिच्याकडे उदरनिर्वाहचे साधन नाही.नाईलाजाने ती मोसुल शहरात एका गारमेंट फॅक्टरीत जॉब स्वीकारते.मोसुल इराकमध्ये आहे आणि आता इराकमध्ये आयसिसने हल्ला केलाय.
खरे तर तिची फॅक्टरी खूप चांगली आहे.सर्वजण एकत्र राहातायत पण आयसिसवाले कधीही येऊ शकतात ही भीती त्यांना आहे आणि एके दिवशी ती खरी होते. त्या फॅक्टरीत आयसिस येते आणि सर्वाना बंदी बनवून दुसरीकडे हलविले जाते.
आयसिसच्या कडेकोट बंदोबस्तातून ज्योतीची सुटका होईल ??
होय.. ज्योती आपली सुटका करून घेते पण त्यात आयसिसचा प्रमुख नेता जखमी होतो.ज्योती इराकी आर्मीच्या ताब्यात येते पण मोसुलचा एअरपोर्ट आयसिसच्या ताब्यात आहे.तिथून बाहेर पडणे अश्यक्य आहे .
भारतीय दूतावास, इराकी दूतावास ज्योतीला मदत करायची इच्छा असूनही काही करू शकत नाही.एअरपोर्टवरून देशाबाहेर पडणे हे ज्योतीलाच करावे लागेल .ती यशस्वी होईल का ??
नुशरत भरूचाची प्रमुख भूमिका असलेला हा थरारक चित्रपट जिओसिनेमावर आहे.

Saturday, May 4, 2024

रणनीती

Ranneeti : Balakot and Beyond
रणनीती :बालाकोट अँड बियोंड 
कश्यप सिन्हा ही दोन आडनावाची व्यक्ती एकेकाळी रॉची उत्कृष्ट फिल्ड एजंट होती. पण सर्बियातील त्याची एक मोहीम फेल झाली आणि त्याचुकीची शिक्षा म्हणून त्याची बदली रक्षा मंत्रालयात टेबल वर्कवर झालीय.आता तो चित्रपटाच्या स्क्रिप्ट वाचून ओके करतो.
 सर्बियातील त्या अपयशी मोहिमेत कोणीतरी फितूर आहे अशी त्याला खात्री आहे .त्यासाठी तो अजूनही पुरावे शोधतोय.अश्याच कामासाठी तो तिहार जेलमधील एका अतिरेक्याला भेटतो आणि वेगळीच माहिती त्याच्या समोर येते.
तो संरक्षण सचिव दत्ता याना भेटून भारतावर अतिरेकी हल्ला होणार आहे असे सांगतो. पण दत्ता त्याकडे दुर्लक्ष करतात.पण काही दिवसांनी पुलवामा येथे भारतीय सैनिकांवर आत्मघातकी हल्ला होतो आणि सुमारे चाळीस सैनिक शाहिद होतात.
दत्ता ताबडतोब कश्यपला बोलावून घेतो. पाकिस्तानातील अतिरेक्यांच्या तळावर हवाई हल्ला करू अशी कश्यपची योजना आहे .दत्ता त्याच्या जोडीला मनीषाला देतो. मनीषा ही आजची आघाडीची पत्रकार आहे.मीडियावर तिचा होल्ड आहे .आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची प्रतिमा स्वच्छ ठेवण्यात मनीषा उपयोगी पडेल याची दत्ताना खात्री आहे .
हवाई हल्ला केल्यानंतर खरे युद्ध सुरू होईल असे दत्ता याना वाटते.हे युद्ध जमीन आकाश पाणी यावर नसेल तर सोशल मीडिया ,इंटरनेट यावर असेल याची त्यांना खात्री आहे.हल्ला झाल्यावर पुढे घडणाऱ्या परिणामांवर विचार करावा लागेल आणि त्यासाठी तयार राहावे लागेल .एक परिपूर्ण योजना तयार करून बालाकोट येथील अतिरेकी तळ भारतीय वायुसेना उध्वस्त करते.
पण हे इथेच थांबत नाही .पाकिस्तानही हवाई हल्ल्याच्या तयारीत येतो. पण विंग कमांडर अभिमन्यूचे पन्नास वर्षे जुने M 21 त्यांचे हल्ले अयशस्वी करते आणि त्यांचे अत्याधुनिक फायटर जेटही पाडते. यात विंग कमांडर अभिमन्यूचे जेट ही पाकिस्तानात कोसळते. विंग कमांडर अभिमन्यू पाकिस्तानात कैदी बनतो.
त्याला कोणत्याही परिस्थितीत भारतात चोवीस तासात परत आणा अशी ऑर्डर पंतप्रधानांकडून दत्ताना येते.
आता कश्यप ,मनीषा आणि दत्ता त्याला परत आणण्यासाठी कोणती खेळी खेळतात हे पाहणे रोमांचकारी आणि थरारक आहे.आपल्याला भारतीय सैन्याच्या मोहिमा दिसतात पण त्यामागे कोणती रणनीती आणि राजकारण आहे आणि ते कश्या पद्धतीने खेळले जाते हे ही सिरीज बघून कळते.
जिमी शेरगिलने कश्यप सिन्हा वेगळ्या पद्धतीने रंगविला आहे.तर लारा दत्ता टिपिकल मीडिया पत्रकार दिसते.आशिष विद्यार्थीचा दत्ता नेहमीसारखा.आशुतोष राणाही एका प्रमुख खलनायकाच्या भूमिकेत आहे .
एका वॉर रूम मध्ये घडणारी ही सिरीज जिओ सिनेमावर मोफत आहे .पडद्यामागील राजकारण काय असते हे पाहण्यासाठी रणनीती नक्की पहा.

Wednesday, May 1, 2024

मॉंक

MONK
मॉंक
एड्रीयन मॉंक एक हुशार पोलीस अधिकारी .इतरांच्या लक्षात येणार नाहीत अशा गोष्टीतून तो पुरावे शोधून काढतो.पण तितकाच विचित्र .एका अपघातात त्याच्या पत्नीचा मृत्यू होतो आणि तो मानसिक रुग्ण बनतो.आता त्याची चौकशी चालू आहे. मानसोपचार तज्ञ त्याच्यावर उपचार करतायत.
मॉंकला काही विचित्र सवयी आहेत.तो स्वच्छतेबाबत खूपच जागरूक आहे.त्याला कोणी स्पर्श केलेला आवडत नाही.तो कोणाशी हात मिळवत नाही.नाईलाजाने हातात हात घेतला की ताबडतोब हात टिशू पेपरने पुसून टाकतो. त्याला रस्त्यावरील पिलर मोजायची सवय आहे. वस्तू जाग्यावर आणि व्यवस्थित ठेवलेल्या आवडतात.इतकेच काय तो दुसऱ्यांच्या कोटावरचे डाग ही साफ करतो.
शरोना ही त्याची केयर टेकर आणि सेक्रेटरी . ती त्याची काळजी घेते .मॉंक तिला वेळेवर पगारही देत नाही तरीही तिला मॉंकची काळजी आहे. काही विचित्र केस घडल्या तर पोलीस मॉंकची मदत घेतात आणि मॉंक त्या सहज सोडवतो.
प्रत्येक भागात वेगवेगळ्या केसेस मॉंक कश्या सोडवतो हे पाहणे आश्चर्यकारक आहे .
विनोदी अंगाने जाणारी ही सिरीज नेटफ्लिक्सवर इंग्रजी भाषेत आहे हिंदी सबटायटल सहित आहे.