Saturday, May 4, 2024

रणनीती

Ranneeti : Balakot and Beyond
रणनीती :बालाकोट अँड बियोंड 
कश्यप सिन्हा ही दोन आडनावाची व्यक्ती एकेकाळी रॉची उत्कृष्ट फिल्ड एजंट होती. पण सर्बियातील त्याची एक मोहीम फेल झाली आणि त्याचुकीची शिक्षा म्हणून त्याची बदली रक्षा मंत्रालयात टेबल वर्कवर झालीय.आता तो चित्रपटाच्या स्क्रिप्ट वाचून ओके करतो.
 सर्बियातील त्या अपयशी मोहिमेत कोणीतरी फितूर आहे अशी त्याला खात्री आहे .त्यासाठी तो अजूनही पुरावे शोधतोय.अश्याच कामासाठी तो तिहार जेलमधील एका अतिरेक्याला भेटतो आणि वेगळीच माहिती त्याच्या समोर येते.
तो संरक्षण सचिव दत्ता याना भेटून भारतावर अतिरेकी हल्ला होणार आहे असे सांगतो. पण दत्ता त्याकडे दुर्लक्ष करतात.पण काही दिवसांनी पुलवामा येथे भारतीय सैनिकांवर आत्मघातकी हल्ला होतो आणि सुमारे चाळीस सैनिक शाहिद होतात.
दत्ता ताबडतोब कश्यपला बोलावून घेतो. पाकिस्तानातील अतिरेक्यांच्या तळावर हवाई हल्ला करू अशी कश्यपची योजना आहे .दत्ता त्याच्या जोडीला मनीषाला देतो. मनीषा ही आजची आघाडीची पत्रकार आहे.मीडियावर तिचा होल्ड आहे .आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची प्रतिमा स्वच्छ ठेवण्यात मनीषा उपयोगी पडेल याची दत्ताना खात्री आहे .
हवाई हल्ला केल्यानंतर खरे युद्ध सुरू होईल असे दत्ता याना वाटते.हे युद्ध जमीन आकाश पाणी यावर नसेल तर सोशल मीडिया ,इंटरनेट यावर असेल याची त्यांना खात्री आहे.हल्ला झाल्यावर पुढे घडणाऱ्या परिणामांवर विचार करावा लागेल आणि त्यासाठी तयार राहावे लागेल .एक परिपूर्ण योजना तयार करून बालाकोट येथील अतिरेकी तळ भारतीय वायुसेना उध्वस्त करते.
पण हे इथेच थांबत नाही .पाकिस्तानही हवाई हल्ल्याच्या तयारीत येतो. पण विंग कमांडर अभिमन्यूचे पन्नास वर्षे जुने M 21 त्यांचे हल्ले अयशस्वी करते आणि त्यांचे अत्याधुनिक फायटर जेटही पाडते. यात विंग कमांडर अभिमन्यूचे जेट ही पाकिस्तानात कोसळते. विंग कमांडर अभिमन्यू पाकिस्तानात कैदी बनतो.
त्याला कोणत्याही परिस्थितीत भारतात चोवीस तासात परत आणा अशी ऑर्डर पंतप्रधानांकडून दत्ताना येते.
आता कश्यप ,मनीषा आणि दत्ता त्याला परत आणण्यासाठी कोणती खेळी खेळतात हे पाहणे रोमांचकारी आणि थरारक आहे.आपल्याला भारतीय सैन्याच्या मोहिमा दिसतात पण त्यामागे कोणती रणनीती आणि राजकारण आहे आणि ते कश्या पद्धतीने खेळले जाते हे ही सिरीज बघून कळते.
जिमी शेरगिलने कश्यप सिन्हा वेगळ्या पद्धतीने रंगविला आहे.तर लारा दत्ता टिपिकल मीडिया पत्रकार दिसते.आशिष विद्यार्थीचा दत्ता नेहमीसारखा.आशुतोष राणाही एका प्रमुख खलनायकाच्या भूमिकेत आहे .
एका वॉर रूम मध्ये घडणारी ही सिरीज जिओ सिनेमावर मोफत आहे .पडद्यामागील राजकारण काय असते हे पाहण्यासाठी रणनीती नक्की पहा.

No comments:

Post a Comment