द हंगर गेम्स ... सुझान कॉलिन्स
अनुवाद......सुमिता बोरसे
डायमंड पब्लिकेशन
दर वर्षी त्या बारा डिस्ट्रिक्टमधील प्रत्येकी बारा ते सोळा वर्षातील दोन मुले निवडली जातात आणि राजधानीत नेली जातात. तिथे त्यांना प्रशिक्षित केले जाते आणि मग चालू होतो हंगर गेम्स. या खेळात ही चोवीस मुले एकमेकांना ठार मारण्याचा प्रयत्न करणार .देशभरात या खेळाचे थेट प्रक्षेपण केले जाते.यात जो जिंकेल त्याची आणि कुटुंबियांची वर्षभर काळजी घेतली जाईल .अश्याच एक बाराव्या डिस्ट्रिक्टमध्ये सोळा वर्षाची कॅटनिस आपल्या आई आणि लहान बहिणीबरोबर राहतेय .आपल्या बहिणीच्या जागी ती हंगर गेम्समध्ये सहभागी होते .हंगर गेमचे ठिकाण ,नियम प्रेक्षक तिच्यासाठी नवीन आहेत पण इथे एक गोष्ट नक्की आहे मारा नाहीतर मरा.
जगण्यासाठी केलेली धडपड,जीवघेणा पाठलाग आणि गतिमान प्रसंग यामुळे ही कादंबरी खूपच वेगवान आणि खिळवून टाकणारी झाली आहे .
Wednesday, January 9, 2019
द हंगर गेम्स ... सुझान कॉलिन्स
Tuesday, January 8, 2019
संस्कार
संस्कार
प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या ट्रेनमध्ये तो धावत धावत चढला.ट्रेन रिकामीच होती.खिडकीजवळच्या सीटवर तो बसला . त्याचा शेजारी मस्तपैकी मोबाईल पहात समोरच्या सीटवर पाय ताणून बसला होता. नशीब चपला तरी काढल्या होत्या. त्याने एक नजर त्याच्याकडे टाकली आणि परत मोबाईलमध्ये डोके खुपसले . ट्रेन पुढच्या स्टेशनवर थांबली आणि एक वृद्ध जोडपे त्यांच्या डब्यात शिरले . त्याच्या समोरची मोकळी जागा पाहताच त्या दिशेने आले.त्यांना पाहून मोबाईलवाल्याने पाय खाली घेतले पण डोके मात्र मोबाईलमध्येच होते.ते बसणार इतक्यात त्याने थांबवून खिश्यातून रुमाल काढला ती सीट साफ केली आणि त्यांना बसण्याचा इशारा केला . मोबाईलवाला ते पाहून ओशाळला आणि मुकाटपणे उठून दरवाजाजवळ उभा राहिला .
आज छोट्याला गार्डनमध्ये घेऊन जायचा दिवस होता . घरी आला तेव्हा छोटू तयार होऊनच बसला होता . पटापट आवरून तो त्याला घेऊन गार्डनमध्ये शिरला.संध्याकाळची वेळ असल्यामुळे गार्डन गर्दीने फुलून गेले होते. छोटूला पाळण्याजवळ सोडून तो रिकाम्या बेंचवर बसला . सहज आजूबाजूला नजर टाकली असता भेळेचे कागद,कुल्फीच्या कांड्या, फ्रुटीचे पाऊच विखरलेले दिसले . काही न बोलता त्याने तो कचरा गोळा करण्यास सुरवात केली. आजूबाजूचे त्याच्याकडे नुसते पाहू लागले . थोड्यावेळाने त्याचा बाजूला अजून काही छोटी पावले दिसून आली मान वर करून पाहिले तर छोटू आणि त्याचे दोन मित्र जमिनीवरचा कचरा गोळा करून पेटीत टाकत होते .
मार्गशिषाचा शेवटचा गुरुवार ती आणि तिची सासू जेवणाचे पान घेऊन गाय शोधायला नाक्यावर निघाले .एकमेव गाय तिथल्या झाडाखाली बांधली होती .गायीची मालकीण सर्वांच्या हातून पान घेत होती . त्यातील नेमके जिन्नस ती बाजूला काढून ठेवत होती आणि थोडेच गायीच्या पुढ्यात ठेवत होती . सुनेने सासुकडे पाहिले. सासूने आपल्या हातातील पान थोड्या अंतरावर बसलेल्या कुत्र्याच्या पुढ्यात ठेवले तर सुनेने त्यातील मोतीचुराचा लाडू काढून कोपऱ्यात बसलेल्या लहान मुलाच्या हाती दिला .
रेल्वे स्टेशन मधून बाहेर पडल्यावर प्रत्येकाला घरी जायची घाई होती . तोही इतरांसारखाच घाईघाईने घराकडे निघाला होता. आज त्याला जास्तच उशीर झाला होता .रस्त्यातून चालताना एका ठिकाणी मध्येच काहीजण उद्या मारून जात होते . जणू तिथे एक खड्डा किंवा घाण असावी. तर रिकामटेकडे नुसते त्याठिकाणी पाहत उभे होते. तो त्यातिथे आला आणि पाहिले एक कावळ्याचे छोटे पिल्लू पडले होते. क्षीण आवाजात ते ओरडत होते . जाणारे येणारे फक्त त्याच्याकडे नजर टाकून जात होते तर काही ओलांडून. इतरांसारखा तोही त्याला ओलांडून गेला पण काही केल्या त्याच्या मनातून त्याचा विचार जाईना. काही अंतर जाताच तो थांबला आणि मागे फिरला . पुन्हा त्या पिल्लाजवळ आला . लोकांची पर्वा न करता ते किळसवाणे पिल्लू त्याने हळुवारपणे उचलले आणि बंद दुकानाच्या कोपऱ्यात ठेवले . शेजारच्या चणेवाल्याकडून दोन रुपयांचे कुरमुरे विकत घेऊन त्याच्या बाजूला पसरले आणि पुन्हा घराच्या दिशेने वळला .आज रात्री त्यालाछान झोप लागणार होती हे निश्चित.
नेहमीप्रमाणे ते बार मधून बाहेर पडले . दिवसभर कष्ट करायचे आणि रात्र झाली की थोडी पोटात ढकलून उशीरा घरी जायचे हा नेहमीचा शिरस्ता. आज रस्त्यावर जास्त काळोख दिसत होता बहुतेक अमावस्या असावी . त्या सुनसान रस्त्यावरून आरामात चालत ते निघाले . काही अंतरावर ती उभी होती . प्रत्येक ऑटोला हात करीत होती पण कोणतीही ऑटो थांबायला तयार नव्हती. ते जवळ येताच तिच्या चेहऱ्यावर भीती पसरली .अंग चोरून ती मागे झाली . ते काही न बोलता रस्त्याच्या मध्ये उभे राहिले . येणाऱ्या ऑटो ला थांबविले. "ए बेवड्यानो....निघा असे म्हणत तो ऑटोवाला बाहेर आला . एका क्षणात त्यातील एकाने त्याच्या कानाखाली जोरदार आवाज काढला ." या ताईला पाहिजे तिथे सोडून ये नाहीतर गाठ आमच्याशी आहे" असे म्हणत तिला आत बसण्याचा इशारा केला .ती थँक्स म्हणत ऑटोत शिरली आणि ते काहीच न घडल्यासारखे पुढे चालू लागले .
© श्री. किरण कृष्णा बोरकर
Sunday, January 6, 2019
साद देती हिमशिखरे.. डॉ. रामचंद्र ज. जोशी
साद देती हिमशिखरे.. डॉ. रामचंद्र ज. जोशी
Towards the Silver Crest of Himalayas ..कै. जी. के. प्रधान
एका बुद्धिमान आणि दर्जेदार खेळाडू असलेल्या गुणी तरुणांचा अध्यात्मिक मार्गाचा प्रवास म्हणजेच हे पुस्तक .
पुस्तकातील नायक माधव हा अतिशय हुशार आणि दर्जेदार खेळाडू आहे .पण स्वप्नात दिसलेल्या हिमालयातील एका गुहेची आस त्याला लागली होती. ती गुहा त्यांच्यासाठीच बनविण्यात आली आहे असे त्याला वाटते . तो आपल्या स्वप्नांच्या दिशेने अध्यात्मिक मार्गाने प्रवास सुरु करतो .आणि शेवटी आपले ध्येय पूर्ण करतो .अतिशय अध्यात्मिक असे हे पुस्तक आहे . ज्यांना अध्यात्माची आवड आहे त्यांनी नक्की वाचावे
Saturday, January 5, 2019
आपला तो
"चल..! निकल बाहर... साला. जेब में पैसा नही और आता है सोने.."अश्या शिव्या देतच तिने त्याला बाहेर ढकलून दिला आणि तो जिन्यावरून गडगडत त्यांच्या पुढ्यात पडला.
त्यांनी घाबरून वर पाहिले तर समोर ती उभी होती .अंगावर फक्त परकर आणि ब्लाउज .तिची भरलेली छाती पाहून त्यांचे डोळे फिरले . रंगवलेल्या लाल ओठांचा चंबू करीत तिने त्यांच्याकडे पाहिले आणि खड्या आवाजात विचारले "क्या है ...?? बैठना है क्या ...?अर्थात त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव पाहूनच ती हे नवशिखे आहेत हे समजून गेली.
तिचा आवाज ऐकून ते अजून हडबडले. तिने नजरेनेच त्यांना वर येण्याची सूचना केली.भारावलेल्या अवस्थेत ते तिच्या खोलीत शिरले . समोरच्या डुगडुगणार्या खुर्चीत बसायचा तिने इशारा केला.
" बोल काय करायचे आहे ...??.दोघे ही येणार की एकालाच ....??तिने नजर रोखून विचारले.
"सॉरी....!! पण आम्ही दुसऱ्याच कामासाठी आलोय"त्यातला एकजण धीर धरून बोलला.
"कोणत्या..... ???? इथे दुसरे कुठले काम असते... ?? याच्याशिवाय ..हाताने मूठ खालीवर करत तिने विचारले. "आम्ही इथे कंडोम वाटायला आलोय .."एक जण कसानुसा हसत म्हणाला.
तशी तीही हसली .मग आत पाहत माई म्हणत मोठ्याने हाक मारली .
"ए माई... हा बघ इथे कंडोम वाटायला आलाय . पण त्यासाठी गिऱ्हाईक तरी येतात का ..?? हल्ली कंडोम जास्त गिऱ्हाईक कमी . काही दिवसांनी आम्हालाच बोटावर चढवून त्याचा वापर करावा लागणार . गिऱ्हाईकापेक्षा समाजसेवकच जास्त फिरत असतात इथे .."तिच्या बोलण्यात चीड जाणवत होती.
"अरे कशाला ओरडतेस माझ्या नावाने ...???असे म्हणत एक पन्नाशीची बाई बाहेर आली आणि त्या मुलांना पाहून चपापली.
"अरे बाळांनो काय काम आहे तुमचे ..?? तिने एकाकडे मायेने पाहत विचारले .
"कॉलेजचा प्रोजेक्ट आहे म्हणून आम्ही इथे मुलींना कंडोम वाटायला आलोय.." तो चाचरत म्हणाला . चेहऱ्यावर त्यांच्या कधी इथून निघतोय असे झाले होते.
"ठीक है .. मेरे पास दे और निकल .. माई हळुवारपणे म्हणाली आणि कंडोमचे पाकीट घेऊन आत शिरली. माई आत जाताच ती परत त्यांच्याकडे वळली .
"ह्या समाजकार्याच्या बदल्यात तुम्हाला काही नको का बक्षीस....??.तिने ब्लाउजच्या बटणाना हात घालत विचारले तसे दोघेही पळत सुटले .तीही हसत हसत आतमध्ये शिरली आणि अचानक थबकली .आतमध्ये फोनवर बोलणारा माईचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता "कशाला त्याला इथे पाठविले...??? इथली सावलीही त्याच्यावर पडायला नको म्हणून त्याला तुमच्याकडे पाठविले.."ती जागेवरच स्तब्ध झाली.
फोन कट करून माई वळली."वो तुम्हारा लडका है ना माई...?? तीक्ष्ण आवाजात तिने विचारले.मुकाटपणे माईने मान डोलावली.
"उसे क्यू नही भडवा बनाया माई..?? हमको तो रंडी बनाया... धंदे पे बिठाया..,खुद के लडके को बाहर भेजा.... तुम्हे लडकी होती तो उसे भी बाहर भेजती ना इस गंदगीसे ...???फिर हमे क्यू ...?? हमने क्या पाप किया है ...??
माई काही न बोलता आत शिरली आणि दरवाजा लावून घेतला.
© श्री. किरण कृष्णा बोरकर
Monday, December 31, 2018
मध्यस्थ ....... लीना सोहनी
द निगोशिएटर..... फेडरीक फॉरसिथ
मध्यस्थ ....... लीना सोहनी
मेहता पब्लिकेशन
रशियातील केजीबी चिंतेत आहे कारण आता त्यांच्याकडे जो तेलसाठा आहे तो फक्त सात ते आठ वर्षे पुरणार आहे .त्यानंतर रशियाचे दिवाळे वाजणार आहे . भरपूर तेलसाठा असणाऱ्या राष्ट्रावर आक्रमण करायची त्यांची योजना आहे . पण सध्याचा अमेरिकेचा अध्यक्ष जॉन कॉरमॅक असताना ते शक्य नाही .
अमेरिकेतील तेल व्यवसायिक सायरस मिलर चिंतेत आहे कारण जगभरातील तेलसाठे या वीस वर्षांत संपुष्टात येणार आहे आणि अरबी राष्ट्रांवर त्यांना अवलंबून राहावे लागेल .त्याला आता असे राष्ट्र पाहिजे की ते त्याच्या बोटाच्या इशाऱ्यावर नाचेल पण त्यासाठी अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष बदलायला हवा.
पीटर कॅब अमेरिकेतील मोठा शस्त्रास्त्र निर्माता.त्याने नवीन शस्त्राचा शोध लावलाय त्यासाठी लाखो डॉलर्स मोजलेत. पन्नास हजार माणसे कामाला लावली आहेत.पण अमेरिका आणि रशियाचा शस्त्रास्त्र कपातीचा करार झाला तर तो रस्त्यावर येणार आहे .कसेही करून हा करार होऊ नये यासाठी त्याचे प्रयत्न चालू आहेत त्यासाठी राष्ट्राध्यक्ष बदलायचीही त्याची तयारी आहे .
अमेरिका आणि रशियाचा शस्त्रास्त्र कपातीचा करार शेवटच्या टप्प्यात आहे . दोन्ही देशाचे अध्यक्ष सोडल्यास कोणालाही हा करार व्हावा असे वाटत नाही . देशातील संरक्षण खर्चात कपात करणे दोन्ही देशांच्या गुप्तचर संघटनाना आणि लष्करप्रमुखांना मान्य नाही.
त्याचवेळी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाच्या मुलाचे ऑक्सफर्डमधून अपहरण होते . त्याच्या सुटकेसाठी जगातील सर्वोत्तम मध्यस्थ निवडला जातो . क्वीन ही एकमेव व्यक्ती आहे जी सुटकेसाठी योग्य वाटाघाटी करू शकेल . क्वीन त्याच्या सुटकेत यशस्वी होतो पण सर्वांच्या समोर त्याची हत्याही होते . वाटाघाटी यशस्वी झाल्या तरीही हत्या का ???? कोण आहेत या हत्येच्या मागे . क्वीन हे रहस्य शोधून काढायचे ठरवितो . एक श्वास रोखून ठेवणारा पाठलाग,भयानक कटाचा हळू हळू होणारा उलगडा पाहून वाचक कमालीचे उत्तेजित होतो तर कधी आश्चर्यचकित .लेखकाने विलक्षण बुद्धिमत्तेनी लिहिलेली ही कहाणी वाचून तुम्ही स्तंभित होणार आहात .
Saturday, December 29, 2018
१४ , गारिबाल्डी स्ट्रीट .... माधव भंडारी
१४ , गारिबाल्डी स्ट्रीट .... माधव भंडारी
विराट प्रकाशन पुणे
अँडॉल्फ आईशमन हा हिटलरच्या ज्यू समस्येवरील अंतिम उपाय (final solution of Jewish problem )या यंत्रणेचा प्रमुख. मी साठ लाख ज्यूना मारले आहे असे हिटलरला अभिमानाने सांगणारा क्रूरकर्मा . युद्ध संपताच त्याने जर्मनीबाहेर यशस्वी पलायन केले आणि सुमारे बारा वर्षे अज्ञातवासात राहिला . तो अर्जेंटिनात आहे याची कुणकुण मोसादला लागली . मोसादच्या शत्रूयादीत त्याचे नाव वर होते . मग चालू झाला त्याचा शोध.आपल्याला हवा असलेला माणूस हाच आहे याची खात्री करण्यात तब्बल तीन वर्षे गेली.अर्जेंटिनाची ज्यूना सहानुभूती नव्हती उलट त्यांनी नाझी गुन्हेगारांना मदत केली होती. ते सहजपणे त्याला इस्त्रायलच्या ताब्यात देतील हे शक्य नव्हते . इस्त्रायल ते अर्जेंटिना यात तब्बल साडे नऊ हजार मैलाचे अंतर होते आणि त्यामध्ये इस्रायलच्या शत्रू देशांच्या सीमाच अधिक होत्या .पण मोसाद प्रमुख इसर हारेल यांनी त्याला इस्त्रायलला आणायचे ठरवलेच .आणि त्यात ते यशस्वी ही झाले.
1960 साली त्याच्यावर इस्त्रयालमध्ये जाहीर खटला चालविला गेला . त्यावेळी या खटल्याचे दूरदर्शनवर थेट प्रक्षेपण केले गेले .पण आईशमनला कसे शोधले . त्याला कसे इस्त्रायलला गुप्तपणे आणले गेले . यात कितीजण गुंतले होते .याबाबत फारच कमीजणांना माहिती होती.
1974 साली THE HOUSE ON GARIBALDI STREET या पुस्तकात सर्वप्रथम इसर हसेल यांनी या कारवाईचा वृत्तांत दिला . आणि त्या पुस्तकाचेच स्वैर भाषांतर माधव भंडारी यांनी केले आहे . इतिहासातील सर्वात थरारक आणि अकल्पनिय घटना म्हणून या अपहरणाची नोंद केली गेली आहे.
Friday, December 21, 2018
द तालिबान क्रिकेट क्लब... तिमिरी एन. मुरारी
द तालिबान क्रिकेट क्लब... तिमिरी एन. मुरारी
अनुवाद...... अमृता सुर्वे
मेहता पब्लिकेशन
रुखसना एक तरुण पत्रकार मुलगी. नजीबुल्ला सरकारच्या काळात ती काबुल न्यूजमध्ये पत्रकारिता करत होती.पण अचानक तालिबान सरकार आले आणि सगळी परिस्थिती पालटली. अध्यक्ष नजीबुल्ला आणि त्याच्या साथीदारांना भर रस्त्यात फाशी दिले गेले .मनात येईल तेव्हा तालिबानी धर्मविरोधी चुका शोधून डोक्यात गोळ्या घालू लागले .मग रुखसना टोपणनावाने हिंदुस्थान टाईम्ससाठी लिहू लागली . तिच्या घरी आजारी आई आणि लहान भाऊ आहे . तरीही ती धोका पत्करून काबुलमधील तालिबान विरोधी बातम्या जगभरात पोचवू लागली . सरकारचा तिच्यावर संशय आहे . पण अजूनही तिच्यावरचा संशय सिद्ध झाला नाही . अचानक तिला एक दिवस मंत्रालयात बोलावणे येते .तालिबान अफगाणिस्तान आणि स्वतःची प्रतिमा जगभरात उंच करण्यासाठी क्रिकेटचे सामने भरविण्याचे ठरविते. जी टीम जिंकेल तिला पाकिस्तानात प्रशिक्षणासाठी पाठविण्यात येईल असे घोषित करते. क्रिकेट हा खेळ अफगाणिस्थानात कोणालाच माहीत नसतो. तर रुखसना दिल्लीत शिकत असताना विद्यापीठाकडून काही सामने खेळलेली असते .तालिबान खऱ्या नियमानुसार आणि खिळाडूंवृत्तीने हा खेळ खेळणार नाही याची खात्री सर्वानाच आहे . टीम तयार करायची मुभा सर्वानाच आहे आणि त्यामार्गे पाकिस्तानात जाण्याची संधी ही .पण रुखसना स्त्री आहे आणि तिथे स्त्रियांना एकट्याने फिरायची ही बंदी आहे . तरीही कुठेतरी आशेचा एक किरण आहे . ती संधी रुखसनाला गमवायची नाही . आता काय करेल ती ......????? लेखकाने तालिबान राजवटीचे अंगावर शहारे आणणारे वर्णन केले आहे . किड्या मुंग्यांना मारावे तसे माणसांना मारणारे तालिबानी. स्त्रियांची घुसमट ,गरिबी,अध्यक्षांना भर चौकात दिलेली फाशी यांचे वर्णन भयानक आहे .