Tuesday, January 8, 2019

संस्कार

संस्कार
प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या ट्रेनमध्ये तो धावत धावत चढला.ट्रेन रिकामीच होती.खिडकीजवळच्या सीटवर तो बसला . त्याचा शेजारी मस्तपैकी मोबाईल पहात समोरच्या सीटवर पाय ताणून बसला होता. नशीब चपला तरी काढल्या होत्या. त्याने एक नजर त्याच्याकडे टाकली आणि परत मोबाईलमध्ये डोके खुपसले . ट्रेन पुढच्या स्टेशनवर थांबली आणि एक वृद्ध जोडपे  त्यांच्या डब्यात शिरले . त्याच्या समोरची मोकळी जागा पाहताच त्या दिशेने आले.त्यांना पाहून मोबाईलवाल्याने पाय खाली घेतले पण डोके मात्र मोबाईलमध्येच होते.ते बसणार इतक्यात त्याने  थांबवून खिश्यातून रुमाल काढला ती सीट साफ केली आणि त्यांना बसण्याचा इशारा केला . मोबाईलवाला ते पाहून ओशाळला आणि मुकाटपणे उठून दरवाजाजवळ उभा राहिला .
आज छोट्याला गार्डनमध्ये घेऊन जायचा दिवस होता . घरी आला तेव्हा छोटू तयार होऊनच बसला होता . पटापट आवरून तो त्याला घेऊन गार्डनमध्ये शिरला.संध्याकाळची वेळ असल्यामुळे गार्डन गर्दीने फुलून गेले होते. छोटूला पाळण्याजवळ सोडून तो रिकाम्या बेंचवर बसला . सहज आजूबाजूला नजर टाकली असता भेळेचे कागद,कुल्फीच्या कांड्या, फ्रुटीचे पाऊच विखरलेले दिसले . काही न बोलता त्याने तो कचरा गोळा करण्यास सुरवात केली. आजूबाजूचे त्याच्याकडे नुसते पाहू लागले . थोड्यावेळाने त्याचा बाजूला अजून काही छोटी पावले दिसून आली मान वर करून पाहिले तर छोटू आणि त्याचे दोन मित्र जमिनीवरचा कचरा गोळा करून पेटीत टाकत होते .
मार्गशिषाचा शेवटचा गुरुवार ती आणि तिची सासू जेवणाचे पान घेऊन गाय शोधायला नाक्यावर निघाले .एकमेव गाय तिथल्या झाडाखाली बांधली होती .गायीची मालकीण सर्वांच्या हातून पान घेत होती . त्यातील नेमके  जिन्नस ती बाजूला काढून ठेवत होती आणि थोडेच गायीच्या पुढ्यात ठेवत होती . सुनेने सासुकडे पाहिले. सासूने आपल्या हातातील पान थोड्या अंतरावर बसलेल्या कुत्र्याच्या पुढ्यात ठेवले तर सुनेने त्यातील मोतीचुराचा लाडू काढून कोपऱ्यात बसलेल्या लहान मुलाच्या हाती दिला .
रेल्वे स्टेशन मधून बाहेर पडल्यावर प्रत्येकाला घरी जायची घाई होती . तोही इतरांसारखाच घाईघाईने घराकडे निघाला होता. आज त्याला जास्तच  उशीर झाला होता .रस्त्यातून चालताना एका ठिकाणी मध्येच काहीजण उद्या मारून जात होते . जणू तिथे एक खड्डा किंवा घाण असावी. तर रिकामटेकडे नुसते त्याठिकाणी पाहत उभे होते. तो त्यातिथे आला आणि पाहिले एक कावळ्याचे छोटे पिल्लू पडले होते. क्षीण आवाजात ते ओरडत होते . जाणारे येणारे फक्त त्याच्याकडे नजर टाकून जात होते तर काही ओलांडून. इतरांसारखा तोही त्याला ओलांडून गेला पण काही केल्या त्याच्या मनातून त्याचा विचार जाईना. काही अंतर जाताच तो थांबला आणि मागे फिरला . पुन्हा त्या पिल्लाजवळ आला . लोकांची पर्वा न करता ते किळसवाणे पिल्लू त्याने हळुवारपणे उचलले आणि बंद दुकानाच्या कोपऱ्यात ठेवले . शेजारच्या चणेवाल्याकडून दोन रुपयांचे कुरमुरे विकत घेऊन त्याच्या बाजूला पसरले आणि पुन्हा घराच्या दिशेने वळला .आज रात्री त्यालाछान झोप लागणार होती हे निश्चित.
नेहमीप्रमाणे ते बार मधून बाहेर पडले . दिवसभर कष्ट करायचे आणि रात्र झाली की थोडी पोटात ढकलून उशीरा घरी जायचे हा नेहमीचा शिरस्ता. आज रस्त्यावर जास्त काळोख दिसत होता बहुतेक अमावस्या असावी . त्या सुनसान रस्त्यावरून आरामात चालत ते निघाले . काही अंतरावर ती उभी होती . प्रत्येक ऑटोला हात करीत होती पण कोणतीही ऑटो थांबायला तयार नव्हती. ते जवळ येताच तिच्या चेहऱ्यावर भीती पसरली .अंग चोरून ती मागे झाली . ते काही न बोलता रस्त्याच्या मध्ये उभे राहिले . येणाऱ्या ऑटो ला थांबविले. "ए बेवड्यानो....निघा असे म्हणत तो ऑटोवाला बाहेर आला . एका क्षणात त्यातील एकाने त्याच्या कानाखाली जोरदार आवाज काढला ." या ताईला पाहिजे तिथे सोडून ये नाहीतर गाठ आमच्याशी आहे" असे म्हणत तिला आत बसण्याचा इशारा केला .ती थँक्स म्हणत ऑटोत शिरली आणि ते काहीच न घडल्यासारखे पुढे चालू लागले .
© श्री. किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment