Saturday, November 5, 2016

मनःशांती

सकाळपासून थोडा अस्वस्थ होतो .थोडे उदासवाणे वाटत होते .त्यात कामावरही दिवस चांगला गेला नाही .
घरी आलो तरी कशातही मन लागेना . चला सिद्धिविनायकाच्या दर्शनाला जावे तिथे शांती मिळेल म्हणून बाहेर पडलो. कोपऱ्यावर बंड्या उभाच होता "काय भाऊ ?? कुठे ? खरे तर त्यालाही टाळायचे होते पण जमले नाही ."आज मूड दिसत नाही तुमचा भाऊ ?,मी मुकाटपणे हो म्हटले "चला तर मग !!,मारुया का 1/1 पेग?" त्याने हसत विचारले .पटकन तोंडातून हो बाहेर पडले .त्याने आश्चर्याने विचारले" काय बोलता हे ?".आहो उदासमनाने कधी दारू पिऊ नये हि तुमची शिकवण आणि आज तुम्हीच हो म्हणता" ?? नको ,त्यापेक्षा मी तुमच्यासोबत येतो ,जिथे जाल तिथे येतो".हा काही ऐकणार नाही याची खात्री होती.
दोघेही सिद्धिविनायक मंदिरात शिरलो ,दारातच एका मुलीने जबरदस्तीने हातात हार दिला आणि पळून गेली . "जाऊ दे ,"बंड्या म्हणाला .आत त्या गर्दीतून वाट काढत कसाबसा गाभाऱ्यात शिरलो आणि नुसते देवाचे तोंड बघितले इतक्यात सुरक्षा रक्षकाने "चला चला VIP आलेत म्हणून बाहेर काढले .  हिरमुसला होऊन बाहेर पडलो तोच बंड्या म्हणाला "चला गार्डन मध्ये ".बंड्याला पाहताच तिथे अभ्यास करणारी 5/6 मुले धावत आली .बंड्या त्या घोळक्यात घुसला,चहाची ऑर्डर सर्वांसाठी  दिली आणि त्यांच्यात रमून गेला .त्यांचे प्रॉब्लेम्स सोडविण्यात गुंतून गेला . मला माझे तरूणपणाचे दिवस आठवले .इथेच आम्ही  सगळे अभ्यास करायचो .अचानक माझ्याकडे वळून बंड्या म्हणाला " भाऊ मुलांना काही शिकवा ,तुमचे अनुभव सांगा त्यांना . भविष्यात काय करायचे ,तुमच्याकडून फार अपेक्षा आहेत यांच्या ".तसा मी पुढे झालो आणि त्यामुलांच्यात वेळ कसा निघून गेला ते कळलेच नाही .मग तो म्हणाला चला आता समुद्रावर जाऊ .थोड्या वेळाने दोघेही शांतपणे समुद्राच्या लाटांचा धीर गंभीर आवाज ऐकत कट्ट्यावर बसून होतो .निःशब्द ,कानावर दूरवरच्या मठात चालू असलेल्या आरतीतील टाळ मृदूंगचा आवाज ऐकू येत होता . लाटांच्या आणि आरतीच्या नादाने एक वेगळीच लय पकडली होती.वातावरणात एक उत्साह दिसू लागला.माझाही मूड परत येऊ लागला. बंड्याने अलगद खांद्यावर हाथ ठेवला . भाऊ फेकून द्या सगळा मनस्ताप ,चिंता ,काळजी या समुद्रात .शेवटी आपल्याला कुठे शांती ,आनंद मिळेल हे महत्वाचे .प्रत्येकाच्या आयुष्यात असे क्षण येतातच .मला कितीवेळा सावरले तुम्ही .चला घरी जाऊ उद्याचा दिवस नक्की वेगळा असेल" . खरेच आज जे काही क्षण आम्ही उपभोगले ते नक्कीच वेगळे होते त्यामुळे पुन्हा आयुष्याला नवीन उभारी मिळाली.

No comments:

Post a Comment