Monday, December 19, 2016

अण्णा

घरात पाऊल टाकताच सौ. म्हणाली ",आहो ,अण्णा येऊन गेले ".तसे  एकदम आठवले ",अरे!!  हो आज 11 डिसेम्बर ,आजची संध्याकाळ अण्णांसोबत घालवतो दरवर्षी . गेली 6 वर्षे असेच चालू आहे .
अण्णा आमच्या वरच्या मजल्यावर राहतात ,वय वर्षे 72 असेल.. पूर्वी मिल कामगार ,मग छोट्या कंपनीत कारकुनी ,नंतर मोठ्या कंपनीतून अकाउंट ऑफिसर म्हणून निवृत्त .7 वर्षापूर्वीच पत्नी म्हणजे माई वारल्या ,मुलाने शेजारीच रूम घेतली. हे एकटेच पण मुलगा आणि सून व्यवस्थित काळजी घेतात . 11 डिसेंबर ला पत्नी देवाघरी गेली त्या नंतर दरवर्षी 11 डिसेम्बरला संध्यकाळी माझ्याकडे येतात आणि मला त्यांच्याकडे घेऊन जातात .मी फ्रेश होऊन त्यांच्या घरी गेलो, ते वाटच पाहत होते ."ये भाऊ ,बस."मी मुकाटपणे बसलो त्यांनी ग्लास भरला आणि चिअर्स केले . पुढे काय होणार ते ठाऊक होते मला . 3 ऱ्या घोटाने त्यांचे चालू झाले . "च्यायला कशाला लग्न केले मी भाऊ ?? का त्या भल्या बाईच्या आयुष्याची ससेहोलपट केली . कोणी अधिकार दिला मला??  आज फक्त ऐकायचे काम करायचे होते मला. मनात वर्षानुवर्षे साचलेले आज ह्या दिवशी बाहेर पडत होते . जाऊ द्या हो अण्णा  आता कशाला उगाच त्या आठवणी ?? मी बत्ती दिली तसे अण्णा उसळले उगाच ?? काय उगाच ?? अरे किती सहन करावे तिने मला ?? असे काय होते माझ्यात ? साधा मिल कामगार मी ,त्या चाळीतल्या खोलीत राहायला आली आणि त्यात संप झाला खायचे वांधे मी नुसता संपाच्या जोशात ,घरात काय आहे ,जेवण कुठून येते हे विचारलेच नाही ,मग एकदा कोणीतरी बोलले", अरे वहिनी दुसर्याकडे धुणी भांडी करते ,तेव्हा कुठे दुसरी नोकरी शोधली ,घर बदलले पण तिची मते ,तिला काय वाटते हे विचारातच घेतले नाही . पुरुष या नात्याने सर्व निर्णय मीच घेत होतो .एका मुलानंतर थांबण्याचा निर्णय हि माझाच तिलाही निर्णय घेण्याचा अधिकार आहे हे मनातही आले नाही माझ्या . दिवसा जेवण आणि रात्री बिछाना जणू यासाठीच घरात आणली होती तिला. अण्णाचा आवाज चढला मी म्हटले "अण्णा आवरा स्वतःला "
.अरे भाऊ कसा आवरू . आज तिची कमतरता भासते मला . जिवंत असताना कधी विचारले नाही. अरे, सिनेमाही  माझ्या आवडीचा बघायचो मी . एव्हाना पहिला पेग संपला होता .मी ताबडतोब दुसरा भरला . 
आता अण्णा रंगात आले होते "पण खरे सांगतो भाऊ ,माझेही खूप प्रेम होते रे तिच्यावर पण ,साल व्यक्तच करायला जमले नाही ,आडून आडून कधी गजरा घेऊन या म्हणाली कि हातावर 5 रु टेकवून मोकळा व्हायचो . मुलाला शिल्पकार करायचे होते तिला ,मनातील भावना मातीच्या गोळ्यात गुंतवून आकार द्यायचे तिचे स्वप्न होते पण मी दगड होतोच ,टाकला मुलाला इंजिनीरिंगला . परत नोकरी बदलली आणि खोलीहि ,पण काही न बोलता ती सर्व संसार घेऊन या खोलीत आली . मुलाने प्रेमविवाह केला तेव्हा घरात आलेल्या सुनेचा प्रेमाने स्वीकार केला नशिबाने सून हि चांगली मिळाली .कदाचित हे तिच्या चांगुलपणाचे फळ असेल . मध्ये मध्ये तब्बेतीची तक्रार करायची तेव्हा मी डॉक्टरकडे जा असे बोलून जायचो . आणि एक दिवस झोपली ती सकाळी उठलीच नाही . लक्ष न देण्याच्या सवयीमुळे पहिले 2 तास लक्षातच आले नाही.सून उठवायला गेली तेव्हा कळले गेली ती. त्याक्षणी जाणवले मला ,काहीतरी गमावले मी . बोलता बोलता अण्णाचा चेहरा रडवेला झाला ,भावना काबूत ठेवणे जमेना . मी काही न बोलता बसून राहिलो ते शांत होण्याची वाट पाहत .थोड्या वेळाने ते शांत झाले .उरलेला पेग एका झटक्यात संपविला आणि म्हणाले "भाऊ खरेच का माझ्याशी लग्न करून ती सुखी झाली असेल ?? मी उठलो प्रेमाने त्यांचा हात हाथी घेतला आणि मान खाली घालून बाहेर पडलो .

No comments:

Post a Comment