Saturday, December 10, 2016

गुरुवारची संध्याकाळ

गुरुवारची संध्याकाळ .... नुकताच 2 रा कप चहा झाला होता आणि विक्रम आत शिरला ."चल बे बोलत त्याने हातच धरला ."अरे विक्रम आज गुरुवार आहे ,आज नको "मनातून खुश होत मी वरवरचे बोललो "च्यायला तात्या ,ढोसायला नाही . गाय शोधायला जायचे आहे . आमच्या हिची ऑर्डर आहे गाय शोधून या ,पान ठेवायचे आहे तिला ." मनातून खट्टू होत मी वरवर हसलो. पण आता नकार देण्याचा प्रश्नच नव्हता . "चल ,म्हणत त्याच्या बाईकच्या मागे बसलो . "अरे इथे असतात ,त्या देवळाजवळ बघू", असे बोलत अर्धा तास गाय शोधत बसलो . शेवटी एके ठिकाणी सापडली. पण हायरे दैवा!!! तिथेही भलीमोठी बायकांची रांग होती . "विकी, अरे वहिनीचा नंबर बहुतेक उद्याच लागेल "असे म्हणून हसू लागलो . गर्दी बघून विक्रम हि भडकला होता  ."आता रे, "हताश होऊन त्याने मलाच विचारले  . मी हि गमतीने बोललो " गायीच्या मालकीणबाईची धमाल आहे ,तिची पिशवी बघ कशी भरलीय खाऊ ने" ." ते जाऊदे काय करायचे ते बोल ,एकतर आधीच गायी सापडत नाहीत आणि अश्यावेळी त्यांना डिमांड येतो . म्हटले "तुला राग येत नसेल तर माझे ऐकशील  तर हो म्हणाला " मी म्हटले चल घरी जाऊ तुझ्या . घरी आलो आणि वहिनीला म्हटले बाजूला ठेवा ते ताट आणि 20/25 जणांना पुरेल इतका चहा बनवा गरम गरम आणि 10 मारी बिस्किटचे पुडे घ्या . वहिनी अचंबित झाली तेव्हा तिला विक्रमने सर्व परिस्थिती समजावून सांगितली आणि आवाज चढवून बोलला", गप!" तो काय सांगतो ते ऐक "तिने चुपचाप चहा बनवून आणला आणि आम्ही परत तिघे बाहेर पडलो . नाक्यावरच्या गार्डनमध्ये गेलो तेव्हा तिथे 10/15 मुले अभ्यास करीत होते .विभागातील वेगवेगळ्या भागातून आणि घरात पुरेशी जागा नाही ,क्लासला जाण्यासाठी पैसे नाहीत म्हणून इथे बसून विविध क्षेत्रात शिक्षण घेणारी हि मुले .बाहेर नुसत्या रिकाम्या भीक मागणाऱ्या भिकार्याना सर्व काही मिळते पण याना साधा चहादेखील कोण विचारात नाही.आम्ही सर्वाना जवळ बोलवून प्रेमाने चहा आणि बिस्किटे दिली. सर्व मुले खुश झाली "काका योग्य वेळी आलात हो ,अभ्यास करून करून कंटाळा आला होता ,झोपही येत होती ,पण या चहा बिस्किटामुळे कंटाळा पळून गेला आणि परत उत्साह आला " खरेच तुमचे आभार कसे मानू तेच कळत नाही " त्यातील एका मुलाने हाथ जोडून म्हटले . आणि वाहिनीच्या डोळ्यातून आसवे गळू लागली.कधी नव्हे ते विक्रम हि भारावून गेला .  त्या सर्वांच्या चेहऱ्यावरील भाव पाहून मलाही आजचा दिवस सार्थकी लागल्यासारखा वाटला.

No comments:

Post a Comment