Thursday, February 8, 2018

गुंतवणूक

सोमवारी सकाळीच बंड्याला दारात हजर पाहून आश्चर्य वाटले.मी ऑफिसला निघायच्या गडबडीत होतो.तरीही त्याला बसवून सौ.ला चहाची ऑर्डर देऊन त्याच्या समोर बसलो.
"बोला...!! बंडूशेठ काल रात्री जास्त झालेली दिसते.पिताश्रीची बोलणी खायला नको म्हणून इथे हजर झालात का..."?
"तसे नाही हो भाऊ...माझ्या पार्ट्या सतत चालू असतात हे बाबाना माहीत आहे .कालही होती. पण काल वेगळीच गोष्ट घडली .रविवारी संध्याकाळी आमचा एक मित्र एका गृहस्थाला घेऊन आला. त्याने आमच्यासोबत दारू पिता पिताआमचे किती सेविंग आहे ??कोण कुठे सेविंग करतो?? ते विचारले.गंमत म्हणजे आमच्यापैकी बऱ्याच जणांना सेविंग कसे करायचे हे माहीतच नव्हते.आलेला पैसे पार्टीत उडवा,शॉपिंग करा ,गाड्या घ्या यातच जातो.मग इन्कमटॅक्स कापला जातो तेव्हा कुठे थोडे गुंतवणूतिच्या मागे लागतो .काही मोजक्याच योजना सोडल्या तर आम्हाला काहीच माहीत नसते.पण काल जे गृहस्थ आले त्यानी अतिशय सोप्या भाषेत आम्हाला गुंतवणुकीचे फायदे समजावले .आहो अगदी पाचशे रुपयापासूनही आपण गुंतवणूक करू शकतो हे काल मला कळले". बंड्या उत्साहाने बोलत होता .
"अरे ....वा..! मग चांगलेच आहे की. पण पैसे उरतात का तुमच्याकडे महिन्याच्या अखेरीस ?? मी थोड्या उपहासानेच विचारले .तसा बंड्या थोडा खजील झाला.
"बरोबर आहे हो भाऊ...खरेच कसे पैसे जातात तेच कळत नाही. आता कालच तीन हजार खर्च झाले तेही फक्त दोन दिवसात.म्हणून  विचार केला असे पैसे आपण घालवतो तर त्यातले कमीतकमी पाचशे रु. तरी गुंतवणुकीसाठी खर्च का करू नये .... ?? काल रात्री खूप विचार केला आणि तुमच्याकडे यायचे ठरविले. तो गुंतवणुकीचा सल्ला आणि मदत करणारा तुमचा मित्र आहे ना त्याचा नंबर द्या .आज संध्याकाळी त्याला भेटतो आणि दर महिना काहीतरी पैसे गुंतवता येतील अशा योजना स्वीकारतो "
मी खुश होऊन त्याच्या पाठीवर थाप मारली आणि म्हटले "यावर्षीचा पहिला योग्य निर्णय तू घेतला आहेस.चल चहा पी."
© श्री. किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment