Wednesday, February 14, 2018

व्हॅलेन्टाईन डे

तो आणि ती हातात हात गुंफून कट्ट्यावर बसून समोरच्या मावळणारा सूर्य पाहत होते . "आज काय संकल्प करायचा ...?? त्याने हसून विचारले आणि हातातील वेफर्सचे पॅकेट तिच्या हाती दिले.तिने एक वेफर तोंडात टाकला आणि किंचाळली " शी ...!!! तुला माहितीय ना. मला खारट वेफर्स आवडत नाही. तुला बघून घेता येत नाहीत का.... ???
तसा तो हसला "बघून...??  अग बाई... लोकांना घाई किती आज. सर्व व्हॅलेन्टाईनच्या मूडमध्ये . त्याने घाईघाईत माझ्या हातात पॅकेट कोंबले मग मीही तसाच घेऊन आलो.जाताना परत घेऊ .तो अगदी सहज म्हणाला.
"तरी बरे ..चाफा बरोबर आणलास" ती हसून म्हणाली.
"त्याचा वास येतो"..त्याने लटक्या रागात उत्तर दिले.
"आपण राहुल देशपांडेंच्या प्रोग्रॅमला जायचे का.... ??? त्याने लाडाने तिला विचारले.
" ह्या ...! तो नाही मला आवडत".. ती फणकार्याने नाक उडवून म्हणाली.
" अग बाई ....आपल्याला गाणी ऐकायला जायची आहे त्याला थोडेच बघायचे आहे".तो हसून उत्तराला.
इतक्यात शेजारून कुजबुज ऐकू आली . दोघेही शांत बसून त्यांची कुजबुज ऐकू लागले . ती त्याला म्हणत होती "इथून किती छान सूर्यास्त दिसेल पण सगळ्या जागा आज पॅक आहेत.आज तुझ्याबरोबर सूर्यास्त पाहताना किती मजा आली असती"
त्या दोघांनी एकमेकांकडे पाहिले आणि एकसुरात त्यांना आवाज दिला."या मॅडम ..इथे बसा आम्हाला काही फरक पडत नाही".असे बोलून ते उभे राहिले. त्या तरुणीने त्यांना थँक्स म्हटले.
त्याने उठून आपल्या हातातली पांढरी लाल फोल्डिंगची काठी सरळ केलीआणि  तिला आवाज दिला" चल निघायचे का..." ??
तिने हसून चल म्हटले आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवून दोघेही चालू लागले .
रस्ता ओलांडताना गर्दीमुळे तो थोडा पुढे गेला आणि ती मागे राहिली .अचानक जोरात ब्रेक मारल्याचा आवाज ऐकू आला आणि मागोमाग एकाचे जोरात ओरडणे" बघून चालता येत नाही का मॅडम..... ?? काय आंधळ्या आहात का...??  एक क्षणात काय घडले असेल याची जाणीव त्याला झाली. तो तसाच मागे वळला . आवाजाच्या रोखाने त्याच्याकडे गेला.
"हो सर ....आंधळीच आहे ती . माझ्यावर विश्वास ठेवून कधी काठी नाही वापरात ती.पण आज कळले की हा विश्वासही किती कुचकामी आहे. या वर्षीपासून एक नवीन संकल्प तुमच्यामुळे मिळाला . उद्यापासून आम्ही एकमेकांच्या आधाराशिवाय जगण्याचा प्रयत्न करू . पुढच्या व्हॅलेन्टाईन ला इथेच कदाचित आम्ही तुम्हाला भेटू तेव्हा दोघेही  इतरांसारखे स्वतंत्रपणे रस्ता क्रॉस करताना दिसू".
तिने मागून येऊन त्याच्या खांद्यावर हात ठेवला "आजचे गिफ्ट घ्यायचे राहिलेच.आज तू मला ही काठी घेऊन दे.मी तुला वचन देते पुढच्या व्हॅलेन्टाईनला मी तुझ्या बरोबरीने रस्ता क्रॉस करेन.
© श्री. किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment