Sunday, February 25, 2018

सिझरिंग

आज एका थोर नेत्याची जयंती असल्यामुळे ऑफिसला सुट्टी होती.बाहेर सारे व्यवहार बंद असल्यामुळे घरातच बसून होतो.इतक्यात विक्रमचा फोन आला"भाऊ ....रोहनला मुलगा झाला. ताबडतोब दिवेचा नर्सिंग होमला ये.मीही निघतोय".
रोहन विक्रमचा लाडका भाचा.त्याला पहिलेच अपत्य झाल्यामुळे विक्रम खुश होता.मीही ताबडतोब हॉस्पिटलमध्ये जाण्याची तयारी केली. सौ. कौतुकाने बोलली"पोरगा भाग्यवान दिसतोय.. आज छान दिवस आहे हो.मोठेपणी हा थोर नेता बनेल".मी हसून मान डोलावली आणि निघालो.
हॉस्पिटलमध्ये मला पाहताच विक्रमने आनंदाने मिठी मारली"भाऊ ..आजचा दिवस खूप भाग्यचा.आजच या थोर नेत्याचा जन्मदिवस आणि रोहनला ही आजच मुलगा व्हावा किती भाग्याची गोष्ट".
मी रोहनचे अभिनंदन केले आणि बाळाला पाहायला आत शिरलो.फारच गोंडस बाळ होते पण खूप अशक्त वाटत होते.बाळाची आईही थकलेली भासत होती . अजूनही तिची गुंगी उतरली नव्हती .मी शंभर रु नोट बाळाच्या हाताजवळ ठेवली आणि बाहेर पडलो.
बाहेर येताच अचानक विक्रमने "हाय अरु ....!! असे ओरडत एक लेडी डॉक्टरला मिठी मारली तिनेही हाय विकी म्हणत जोरदार उत्तर दिले. मी आश्चर्याने पाहत असतानाच त्याने ही माझी जुनी मैत्रीण अरुंधती अशी ओळख करून दिली.बोलताना असे कळले ती इथेच डॉक्टर होती . पुढच्या डिलिव्हरीसाठी एक  तास अवकाश आहे तोपर्यंत कॉफी पिऊ असे म्हणत आम्हाला खाली घेऊन गेली .
"आज खूप लोड आहे कामाचा.अजून चार डिलिव्हरी बाकी आहेत.तरी बरे आज त्या नेत्यांची जयंती आहे म्हणून कमी लोड.चांगला सण ,मुहूर्त असेल तर  जेवायला वेळ मिळत नाही"असे बोलून कॉफीचा एक घोट घेतला.
"म्हणजे नक्की काय... ??आज गर्दी का. ?? विक्रम न समजून म्हणाला.
"अरे मित्रा.... हल्ली तुला माहीत नाही का आपल्याला पाहिजे तेव्हा डिलिव्हरी करायची पद्धत सुरू  झालीय...?? तिने आमच्याकडे डोळे मिचकवत म्हटले"हल्ली नैसर्गिक डिलिव्हरीची कोण वाट पाहत नाही . चांगला मुहूर्त असेल तर दोन तीन दिवस आधीच सिझरिंग करून मोकळे होतात. काहीजण त्यातही ज्योतिष्याकडून मुहूर्त काढून येतात आणि त्याच वेळी डिलिव्हरी झाली पाहिजे असे सांगतात.चौदा फेब्रुवारी.सव्वीस  जानेवारी ,एक मे या दिवशीही डिलिव्हरी झाली पाहिजे असे मागणी करणारे आहेत.आता एक डिलिव्हरी आहे ती त्यांनी सांगितले वेळीच करायची आहे म्हणून मी इथे बसली आहे ".
"बापरे ..!! हे कठीण आहे ?? म्हणजे हल्ली नॉर्मल डिलिव्हरी होतच नाही का.. ?? मी विचारले
"होते ना....? जे सर्वसामान्य आहेत. अशी नाटके परवडत नाहीत ,प्रसूतीवेदना सहन करायची ताकद आहे त्या नॉर्मल डिलिव्हरी करतात . पण ज्यांना आपला तो मार्ग जसा आहे तसा ठेवायचा आहे . प्रसूती वेदना नको.बाळाची योग्य आणि चांगली जन्मवेळ आणि भरपूर पैसा असेल ते सिझरिंगचा मार्ग स्वीकारतात. मित्रानो हल्ली विज्ञान खूप प्रगत झाले आहे . त्याचा कोणीही कसाही वापर करून घेते . काहीजण आपल्याला योग्यवेळी मूल कसे होईल ते कसे असेल याची प्लॅनिंग करून संभोग करतात . त्यासाठी योग्यवेळ ,योग्य ठिकाण ही कोणती हेही ठरवून घेतात".तिने गंभीरपणे आम्हाला सांगितले .
"म्हणजे ...!! आज जो माझ्या भाच्याला मुलगा झालाय तोही सिझरिंग करून ठरवून झालाय का" ?? विक्रमने उत्सुकतेने  विचारले
"हो ..असेलच ...कारण आज येथे कोणाचीच नॉर्मल डिलिव्हरी झाली नाही" अरूने उत्तर दिले .
"मग यात धोका काही नाही ना ...??? विक्रमने काळजीने विचारले.
"हे बघ विकी..... धोका कशात नाही.. ?? ते प्रत्येकाच्या वयावर आणि तब्बेतीवर अवलंबून आहे . पण एक नक्की जे नैसर्गिक ते नैसर्गिक . आपण हल्ली बऱ्याच गोष्टी निसर्गचक्राविरुद्ध करतो . सिझरिंग ही नैसर्गीक पद्धत नाहीच . बाईचा त्रास कमी व्हावा आणि डिलिव्हरीवेळी काही अडचण येते तेव्हा सिझरिंग चा पर्याय वापरला जातो. पण हल्ली कोणालाच वेळ नाही कोण थांबायला तयार नाही .हातात पैसा आहे मग करा सिझरिंग .केवळ हीच गोष्ट नाही तर हल्ली अनेक गोष्टी निसर्गनियमाविरुद्ध चालू आहेत . भविष्यात त्याचा योग्य उपयोग झाला तर ठीक नाहीतर फार मोठे भयंकर परिणाम भोगावे लागणार आहेत हे नक्की. रजनीकांतचा रोबोट चित्रपट पाहिला ना.. ?? तुम्ही एका रोबोटच्या मनात भावना फीड केल्या की किती गंभीर परिणाम होऊ शकतात  ते पहिले . आणि हल्लीच एक देशाने एक रोबोटला नागरिकत्वाचा हक्क दिला .मला तर वाटते काही वर्षांनी डॉक्टर ही संकल्पनाच निघून जाईल . काहीही झाले की तुम्ही एक मशीनमध्ये शिराल आणि ती मशीन तुमचे आजार शोधून तिथेच ट्रीटमेंट करेल कदाचित छोटेमोठे ऑपरेशन ही करेल . औषध देईल आणि जेव्हा बाहेर पडाल तेव्हा पूर्ण बरे झाले असाल". तिने उठत उठत आम्हाला मोठा धक्का दिला.आमच्या आ वासलेल्या तोंडाकडे बघून ती हसत हसत निघून गेली.
© श्री. किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment