Wednesday, March 28, 2018

भय इथले ...तालिबानी सावट :प्रत्यक्ष अनुभव

भय इथले ...तालिबानी सावट :प्रत्यक्ष अनुभव
लेखक ...आतिवास सविता
राजहंस प्रकाशन
लेखिकेला कामानिमित्त चार महिने काबुलमध्ये राहण्याची संधी मिळाली . त्या वास्तव्यातील तिचे अनुभव इथे मांडले आहेत .जागोजागी वाळूच्या पोत्याआड दडलेले सशस्त्र सैनिक. त्यांच्या करड्या नजरा . हॉटेलच्या स्वच्छतागृहात झालेला गोळीबार  आणि तिच्या आजूबाजूला पडलेल्या काचांचा खच . सतत जाणवत असलेली कोणाची तरी नजर . ऑफिसमध्ये कडकपणे पाळण्यात येणारे सुरक्षेचे नियम याचे लेखिकेने अचूक वर्णन केले आहे .

उसबा…......दिनेश कानजी

उसबा…......दिनेश कानजी
चंद्रकला प्रकाशन
उसबा म्हणजे दहापेक्षा जास्त तरुणांचा गट.भटकळमध्ये स्थापन झालेल्या या गटाने भारताविरुद्ध अघोषित युद्धच पुकारले. परवेझ मुसा नावाच्या इंडियन मुजाहिदीनच्या कट्टर अतिरेक्यांला  आयबीने नेपाळमध्ये पकडले . त्याच्या कबुलीजबाबमधून अनेक सनसनाटी गौप्यस्फोट होत गेले .अनेक रहस्ये उलगडली गेली . शेकडो तरुणांची धरपकड झाली.भारतातून मुजाहिदीन संपली असा सर्वांचा समज झाला.तरीही डीसीपी रामसिह नेगी अस्वस्थ होते . मुसा काहीतरी लपवितोय असे त्यांना राहून राहून वाटत होते .काहीतरी मोठे कारस्थान शिजत होते . कोण आहे भारतातील मुजाहिदीनचा सूत्रधार ज्याने मुसानंतर सारी सूत्रे हाती घेतली आहेत. कोणता कट रचला आहे ...??? एक  कल्पनाशक्ती आणि सत्य यांचा अनोखा मिलाफ वेगवान असलेली कादंबरी.

Sunday, March 25, 2018

रेल रोको

आजचा दिवस किती मस्त आहे.सगळे काही छान जुळून येतेय.पोराची परीक्षा संपल्यामुळे त्याची लुडबुड चालू नाही त्यामुळे आरामात आवरता आले.चला म्हणजे आज नेहमीची ट्रेन मिळणार हे नक्की. जाताजाता केबिनमधल्या गणपतीसाठी हारही घेता येईल.
आज महिन्याचा शेवटचा दिवस आहे .या महिन्यात तसे दोन लेट झालेत पण आज वेळेवर निघालोय म्हणजे वेळेवर पोचेनच.निघताना बायको छान हसली म्हणजे आज दिवस नक्कीच चांगला जाईल. बाकी काहीही म्हणा हो.... तिच्या हास्यावरच आपण फिदा आहोत.फारच कमी वेळा बिचारीला हसायची संधी मिळते.पण हसते तेव्हा दिल खुश होतो.नाही.....नाही ...ती रागीट नाही किंवा गंभीर चेहऱ्याचीही नाही हो.... आहो कामाच्या रगाड्यात आणि आमच्या कटकटीतून तिला वेळ कुठे मिळतो हसायला. चला आज लिफ्ट पण आपल्यासाठी थांबली आहे.
अरे वा .....!!आज दीक्षित बाईही जास्तच सुंदर दिसतेय.ऑफिसमध्ये प्रोग्रॅम असेल. गुड मॉर्निंग बोलतानाही जरा जास्तच हसली. आज ट्रेनही चक्क वेळेवर आहेत . जाऊदे ही ट्रेन ..आपली नेहमीचीच ट्रेन पकडू .ही  दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाते आणि तिकडून परत बाहेर पडेपर्यंत मागची लोकल आलेली असते.ती बरी पडते डायरेक्ट स्टेशन बाहेर जाता येते.
चला नेहमीची ट्रेन आली .देशपांडेला आज विंडोसीट मिळाली वाटते. म्हणजे दोन स्टेशननंतर आपल्याला मिळेल.च्यायला.... हे काय ...?? इथे कसा सिग्नल मिळाला हिला?? पुढचे स्टेशन तर जवळ आलेय आणि बाजूच्या फास्ट ट्रॅकवर शताब्दी ही थांबलेली दिसतेय.अरे बापरे ...!! हे काय सगळी माणसे ट्रॅकवरून चालत जातायत.लफडं झाले वाटते ....बोंबला ..सत्यानाश ...माझ्याच ट्रेनच्या नशिबात हे यावे. बघूया तर काय चालले आहे.
दरवाज्यावर किती गर्दी...?? लोकपण खूप हौशी.दरवाजावर गर्दी करून उभे आणि काय झाले ते ही सांगत नाही .ती बाई बघा... एक तर पुरुषांच्या डब्यात चढली आणि आता त्या दरवाजाच्या गर्दीत घुसून काय झाले ते बघतेय . तो मागचा तरुण सोडणार आहे का तिला... . बघा त्याचा हात कुठे कुठे फिरतोय.तो गेला की दुसरा आहेच नंबर लावून .आणि तिला तर बाहेरचे बघण्यात इंटरेस्ट...माझी नजर पाहून बघा कसा चपापला.साले हे असले लोक अशी परिस्थिती पाहतच असतात आणि संधी घेतात . पण तिला समजायला नको.
काय ....???? आंदोलन चालू आहे ..??? रेल रोको.. ?? देवा संपले सगळे. आता दोन तीन तास तरी काही घडत नाही.साली कंपनीही लांब. बस टॅक्सीने वेळ लागणार .टॅक्सीसाठी पैसे कोणाकडे आहेत.आजही लेट . तिसरा लेट. म्हणजे  एक कॅज्युअल गेली.वर्षात दोन रजा रेल्वेला द्याव्या लागतातच.बसा आता गूपचूप.
काय आजी..??? खाली उतरायचे आहे का.. ? चालत परत मागे जाणार का ..?? तीन तास तरी हलणार नाही ट्रेन. थांबा उतरवतो तुम्हाला .. सावकाश हळू उतारा .ए भाऊ... आजीला सोड स्टेशनला.
हळू हळू सगळे उतरले.चला विंडो सीट पकडून पुस्तक तरी वाचू . ऑफिसला जावेच लागेल . महिना संपतोय . सगळे रिपोर्ट्स बनवायचे आहेत . पुढचे प्लॅनिंग करायचे आहे . सायबाला या सबबी चालणार नाहीत .तो काय चोवीस तास ड्युटीवर.अरे पण प्रत्येकाला आंदोलन करायला रेल्वेच सापडते का ?? आमचेही प्रॉब्लेम आहेत . आम्ही कुठे जायचे..??आज कोणाचा इंटरव्ह्यू असेल. कोणाच्या नातेवाईकांचे ऑपरेशन असेल. कोणाला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी जायचे असेल तर कोणाची परीक्षा असेल. कितीतरी महत्वाची कामे आज अडली गेलीत. सांगून तरी आंदोलन करा आम्ही ऍडजस्ट करू काहीतरी .
काय झाले काका... ??? बापरे... आता इथे कशी करणार तुम्ही . दरवाजात उभे राहून करणार का ..??हो बाहेर गर्दी आहेच . मग काय करायचे ??? थांबा माझ्याकडे पाण्याची बाटली आहे . अर्धी बाटली पाणी आहे . पिऊन टाकूया मग यात मोकळे व्हा. कसले उपकार हो . बाटल्या आहेत घरात भरपूर . रोज पोराला कोल्ड ड्रिंक पिण्यावरून शिव्या देतो पण आज तीच बाटली कामाला आली . ठेवा बाटली बाजूला अजून कोणाला तरी उपयोगी पडेल. होईल पाण्याची सोय कुठूनही . बघा त्या मुलाने दिली बाटली पाण्याची .काका ही मुंबई आहे . अश्यावेळी सर्वच एकत्र येतात . ही बघा बिस्किटे पण आली.आता बसा आरामात . मलाही फ़ोन आलाय ऑफिस मधून ..आरामात ये . घरीही सांगितले आहे सुखरूप आहे ट्रेनमध्ये . करा आता पाहिजे तितका वेळ आंदोलन . मी माझे पुस्तक वाचून संपवितो.
© श्री. किरण कृष्णा बोरकर

Friday, March 23, 2018

लग्न

"अजूनही लग्नासाठी माझ्या मनाची तयारी झाली नाही असे मला वाटते ....?? मावशीच्या प्रश्नाला वैदेहीचे हे उत्तर ऐकून आम्ही चमकलोच.
"अरे..!! पण लग्न ठरले आहे ना तुझे ...?? आणि गेले दोन महिने त्याच्या बरोबर फिरतेस ही तू ..? तरीही अजून तयारी झाली नाही म्हणजे काय ..?? सौ.ने आवाज चढविला.
वैदेही तिची भाची.बऱ्याच प्रयत्नांनी तिचे लग्न ठरले होते. ती स्वतः एक चांगल्या कॉर्पोरेट कंपनीत मोठ्या पोस्टवर कामाला होती. तर होणारा नवरा छोटा उद्योग करीत होता. अर्थात घरची श्रीमंती होती.अनेक स्थळे नाकारणाऱ्या वैदेहीने या स्थळाला होकार का दिला हे आम्हाला पडलेले कोडेच होते . पण वैदेहीही त्याचे उत्तर देऊ शकत नव्हती . वैदेहीची घरची परिस्थिती बेताची होती . खाऊन पिऊन सुखी परिवार म्हणतात ना ....तेच .लग्नाची बोलणी करून आम्ही तिच्या घरी आलो होतो.नेहमीप्रमाणे मी शांतपणे बसून ऐकण्याचे धोरण स्वीकारले होते . तर सौ. भाचीचे लग्न म्हणून फारच उत्साहात होती.पण बोलणी काही तिच्या मनासारखी झाली नाहीत . नवऱ्याकडील मंडळींनी आपल्या श्रीमंतपणाचा दबाव टाकून बऱ्याच गोष्टी कबुल करून घेतल्या असे तिचे म्हणणे.म्हणून शेवटी तिने हा प्रश्न विचारला.
गेले दोन महिने तुम्ही गावभर फिरतायत तरीही त्यांच्याबाबतीत तुला काहीच माहिती नाही ..?? तिने चिडून वैदेहीला प्रश्न विचारला."मग काय करता काय तुम्ही.... ?? काय बोलणी होतात तुमच्यात ??
"तसे आम्ही जनरल बोलतो .हॉटेलात जाऊन खातो.त्याच्या बाईक वरून फिरतो. अजून सिरीयस असे काही विचारले नाही. तुम्ही जे काही ठरविणार त्याला आमची मान्यता असणार आहे"वैदेहीने शांतपणे उत्तर दिले.
" हो ...तरीही शेवटी लग्न तुला करायचे आहे.संसार तुला करायचा आहे.त्या कुटुंबात तुला राहायचे आहे . मग ती माणसे कशी आहेत ?? त्यांचा स्वभाव कसा आहे ?? नवऱ्याला काय आवडते ?? तो आपल्याबरोबर संसार करण्यास सक्षम आहे ना ?? या गोष्टी पाहायला नकोत का ?? सौ. चा सूर आता समजावणीचा झाला.
"मान्य आहे मावशी ह्या गोष्टी बोलायला हव्यात. पण आम्ही अजूनही तिथपर्यंत आलो नाही. सध्या असेच जनरल बोलून एकमेकांना समजून घेतोय. होतील इतरही बोलणी हळू हळू . सध्या तरी आमच्या आवडी निवडी जुळतायत बाकी पुढे"वैदेही आता बरीच सावरली होती.
" हे बघ मुलाकडून सांगितलेल्या काही गोष्टी आपल्याला पटत नाहीत . त्या गोष्टीवर अडून बसलो तर लग्न मोडायचा संभव आहे .म्हणून तुला विचारतेय मी" सौ.ने  निर्वाणीचे शस्त्रं बाहेर काढले.
" हरकत नाही ..ज्या गोष्टीवर कोणीही ऍडजस्टमेंट करणार नाही तेव्हा ते सोडून द्यावे लागेल . मी बोलेन त्यावेळी त्याच्याशी .मार्ग निघाला तर ठीक नाहीतर सोडून. देऊ दुसरा पाहू "वैदेही शांतपणे म्हणाली तसे सौ. ने हताश होऊन माझ्याकडे पाहिले .
ते पाहून मी समजून गेलो आता माझी पाळी आलीय.मी वैदेहीला म्हणालो "सगळे काही इतके सोपे नसते.आपण जेव्हा एकमेकांना पसंद करतो तेव्हा पूर्ण भावना त्यामध्ये गुंतलेल्या असतात .मनाने एकमेकांना वरलेले असते. सासरची माणसेही आपली वाटू लागतात.अश्यावेळी सगळ्या गोष्टीत मुलाचा आणि मुलीचा सहभागही तितकाच महत्वाचा आहे .मोठी मंडळी मुलांच्या पुढच्या आयुष्याचा विचार फार कमी करतात आणि लग्नाच्या प्रथेचा रितिरिवाजाचा विचार जास्त करतात .अश्यावेळी त्या दोघांनी खंबीर होऊन काही निर्णय घेतले पाहिजे.म्हणूनच तुम्हीही या गोष्टीत लक्ष घाला आणि काही निर्णय ठामपणे घ्या .लग्न म्हटले की खर्च आला ,मानपान आले ,रुसवे फुगवे आलेच . ते योग्यवेळी सोडविले नाहीत तर आयुष्यभर मागे लागतील तुमच्या".
" हो काका ...तुम्ही म्हणता ते खरे आहे . यापुढे मीही गंभीरपणे या विषयात लक्ष देईन आणि त्याच्याशी ही बोलेन . खरेच काही गोष्टी गंभीर बानू शकतात हे लक्षातच आले नव्हते माझ्या"असे म्हणून वैदेहीने सौ. ला मिठी मारली .
© श्री. किरण कृष्णा बोरकर

स्टिलबॉर्न... रोहिणी निलेकणी

स्टिलबॉर्न... रोहिणी निलेकणी
अनुवाद .... श्रावण मोडक
अमेय प्रकाशन
अपघात होऊन पूर्वा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते आणि दोन डॉक्टरांच्या चर्चेतून  नवीन संततीप्रतिबंधक लसीविषयी माहिती ऐकते . त्याचवेळी बंगळुरूच्या एम आर हिल्सच्या आदिवासीपाड्यात एक मुलाचा जन्म होतो. मूल जन्मतः विरुप, मृत असते . पूर्वा पंडित ही हाडाची पत्रकार आहे . ती या घटनेचा शोध घेण्याचे ठरविते. आणि पोचते डॉ. अंशुमन या तरुण डॉक्टरकडे. जो या संतती प्रतिबंधक लसीवर प्रयोग करतोय . विदेशातूनही त्याला अर्थसहाय्य मिळतेय . एम आर हिलवर आदिवासी स्त्रियांवर त्याचे प्रयोग चालू आहेत .पण लस दिलेल्या स्त्रियाही गरोदर राहातायत आणि त्यातून कृश ,विरुप ,मृत अर्भक जन्माला येतायत. का ...??? कशामुळे..??? यातील जीवघेण्या स्पर्धेमुळे बिचाऱ्या गरीब महिलांचा बळी जातोय.

क्लिओपात्रा.......... सुनिल जावळे

क्लिओपात्रा.......... सुनिल जावळे
मनोरमा प्रकाशन
जगातील पहिल्या दहा हुकूमशहापैकी एक म्हणून ओळखली जाणारी इजिप्तची राणी क्लिओपात्रा. इतिहासात एक बदनाम ,बदफैली राणी म्हणून तिला ओळखले जाते.आपल्या सुंदर ,मादक रूपाच्या जाळ्यात रोमच्या हुकूमशहाना गुंडाळून तिने इजिप्तचे साम्राज्य उभारले .  लेखकाने अतिशय सोप्या आणि ओळखीच्या भाषेत ही राणी आपल्यापुढे उभी केली आहे . युद्धात, तसेच राजकारणात ती एक हुशार राणी होती. ज्युलियस सीझर या रोमच्या हुकूमशहाला आपल्या प्रेमात पागल करून तिने इजिप्तचे राज्य हासिल केले. सिझरच्या मृत्युनंतर त्याच्या विश्वासू मित्राला जवळ केले आणि इजिप्तची भरभराट केली.लेखकाने युद्धाची वर्णने अतिशय अभ्यासपूर्ण रंगवली आहेत. सिझरच्या खुनाचा प्रसंग तर आपल्या समोर घडतोय असे वाटते. क्लिओपात्राची खरी ओळख होण्यासाठी हे पुस्तक वाचायला हवे .

Monday, March 12, 2018

मी महंमद खान शपथेवर सांगतो की

मी महंमद खान शपथेवर सांगतो की ...महंमद आमिर खान /नंदिता हक्सर
अनुवाद .......सुनीता लोहकारे
राजहंस प्रकाशन
जुन्या दिल्लीतील एक सालस मुलगा कराचीत राहणाऱ्या आपल्या बहिणीला भेटायला जातो. तेव्हा गुप्तचर अधिकारी असल्याचे सांगून एक व्यक्ती त्याला पाकिस्तानातून एक पाकीट आणून देण्याची कामगिरी सोपविते. ते पाकीट आणताना सीमेवर कडक तपासणी पाहून तो फेकून देतो.आणि रिकाम्या हाताने दिल्लीत परततो.मग सुरू होते त्याच्या दुर्देवाची कहाणी . पोलीस त्याचे अपहरण करतात.दहशतवादी म्हणून दिल्लीत घडलेल्या बॉम्बस्फोटातील एक आरोपी म्हणून त्याला अटक होते . एकोणीस गुन्हे त्याच्यावर ठेवले जातात .त्यातील चौदा खटल्यातून त्याची निर्दोष म्हणून सुटका केली जाते .प्रचंड शारीरिक ,मानसिक छळ केला जातो .खोटे साक्षीपुरावे उभे करून तिहार जेलमध्ये पाठवणी होते .चौदा वर्षाची कोठडी आणि एकांतवास त्याच्या पदरी पडतो. पण महंमद खान हार मानीत नाही . तो त्या अनुभवातून खूप काही शिकतो . चांगुलपणावर त्याचा अजूनही विश्वास आहे . आज आपल्या या अनुभवाचा वापर तो सामाजिक कार्यासाठी करतो आहे .

Thursday, March 8, 2018

गुलजार पटकथा .......गुलजार

गुलजार पटकथा .......गुलजार
अनुवाद ............अंबरीश मिश्र
मेहता पब्लिकेशन
गुलजारांच्या सशक्त लेखणीतून उतरलेल्या खुशबू ,मासूम आणि इजाजत या तीन सुंदर चित्रपटांच्या पटकथा .या वाचत असताना संपूर्ण चित्रपट डोळ्यासमोर उभा राहतो . मी खुशबू पहिला नाही पण वाचताना चित्रपट पहिल्याचा आनंद मिळतो .छोट्या छोट्या तुकड्यातून त्यांनी पटकथा मांडली आहे . वाचताना आपण त्यात गुंतून जातो .

Tuesday, March 6, 2018

डेथ ऑफ अ कॅड...... एम. सी. बीटन

डेथ ऑफ अ कॅड...... एम. सी. बीटन
अनुवाद .........दीपक कुलकर्णी
मेहता पब्लिकेशन
इंग्लंडमधील प्रसिद्ध नाटककार आपल्या नियोजित पत्नीसमवेत स्कॉटलंडमधील छोट्याश्या खेडेगावात तिच्या आईवडिलांना भेटायला येतो . तिच्या आईवडिलांनी त्यांच्या स्वागतासाठी एक मेजवानी आयोजित केलेली असते. गावातील काही मान्यवरही त्याठिकाणी हजर  असतात. हॅमिश मॅकबेथ हा आगंतुक पोलीस इन्स्पेक्टरही हजर असतो. पण दुसऱ्या दिवशी त्यातील एका पाहुण्यांचा खून होतो. हजर असलेल्या प्रत्येक माणसावर संशय घेतला जातो . प्रत्येकाला त्याचा खून करायची संधी आणि कारण असते . अतिशय नाईलाजाने हॅशिमला त्या प्रकरणात लक्ष घालण्याची सूचना देण्यात येते . तेव्हाच दुसराही खून होतो.काय आहे त्यामागचा हेतू ?? कोण करतंय खून?? मोठ्या कौशल्याने हॅशिम खुन्याला शोधून काढतो.

Sunday, March 4, 2018

आमचा हरी

आमच्या हरीला मी जेव्हा जेव्हा पाहतो तेव्हा मला पु. ल.च्या नारायणाची आठवण होते.फक्त नारायण लग्न कार्यासाठी पुढे असायचा तर हरी लोकांच्या अंत्यसंस्कारासाठी पुढे असतो. काहींच्या अंगात एखादी गोष्ट भिनलेलीच असते तशी याला अंत्यसंस्काराला जायची हौस . अगदी रस्त्यातून जाताना कोणाचीही अंत्ययात्रा दिसली की हा पाच पावले तरी त्याच्याबरोबर जाणार आणि वेळ असेल तर सगळे सोपस्कार पूर्ण करून येणार .सर्व धर्माच्या अंत्ययात्राना त्याने उपस्थिती लावली असेल.
हरी उर्फ हरीचंद्र तसा साधारण माणूस . एक छोट्या फॅक्टरीत तिन्ही पाळ्यांत काम करणारा .पण कुठूनही त्याला कोणाच्या मृत्यूची खबर आली की हा  फॅक्टरीतून निघालाच. हा  सर्व रजा लोकांना पोचवण्यातच संपवतो की काय...?? असा विक्रम नेहमी विचारायचा .बरे मयत  झाले तिथे हा वादळासारखा यायचा आणि सारी सूत्रे आपल्या ताब्यात घ्यायचा .मग सतत आजूबाजूच्याना सूचना. एक मात्र खरे त्याला बघून सगळ्यांना हायसे वाटायचे . घरातल्याना तर आता मयतावर सर्व विधी काळजीपूर्वक होतील याची खात्री व्हायची . तर आलेल्या सर्वाना एक मोठ्या जबाबदारीतून सुटलो याची खात्री व्हायची.
त्याचे सर्व पद्धतशीरपणे ठरले होते . बंड्या म्हणतो अंत्यसंस्काराची SOP  बनवायची झाली तर हरिकडे जावे लागेल.
ह्याला कोणी गेल्याचा फोन केला की हा विचारणार "किती वाजता काढणार... ?? मग घरी जाऊन त्याप्रसंगी घालायचे कपडे बाहेर काढणार. नाही हो ........ ते पांढरे कपडे नाही . एक काखेखाली फाटलेला टी शर्ट . त्यावर कोणत्यातरी मंडळाचे नाव लिहिलेले होते . अर्थात ते मंडळ कुठे आहे हे अजूनपर्यंत आम्हाला कळले नाही .एक काळी थ्रीफोर्थ. हे कपडे घालून हरी निघाला की समजावे कोणतरी गेलाय.
हा माणूस सतत माणसांच्या अंतिमयात्रेचाच विचार करत असतो का ...?? हा आम्हाला पडलेला अजून एक प्रश्न . एके दिवशी हा आमच्याबरोबर चहा पियाला बसला होता तेव्हा समोरून चव्हाण मास्तर आले . मास्तर निवृत्त. वय साधारण सत्तर असेल पण अंगाने भारी . हा बराच वेळ त्यांच्याकडे निरखून पाहत बसलो होता.शेवटी ते गेल्यावर मी चिडून विचारले "काय  पाहत होतास रे म्हाताऱ्यांकडे इतके.. ?? त्याने हळूच सांगितले "मास्तर शांतीसदनमध्ये चौथ्या मजल्यावर राहतात .बरे तिथपर्यंत गाडी जात नाही . खाली जागा ही कमी .उद्या म्हातारा मेला तर ह्याला चौथ्यां मजल्यावरून खाली आणताना किती हाल होतील रे आणि नंतर त्या गल्लीतून बाहेर काढताना तिरडीही थोडी तिरपी करावी लागेल . ह्यांच्यासाठी सामान आणताना साधारण यांचे वजन किती असेल ते मयताचे सामान आणाऱ्याला सांगायला विसरू नकोस"...झाले विक्रमने ताबडतोब हात जोडले."हरी ..किती पुढचा विचार करतोस".
"अरे तुमचे काय जाते ....मलाच सगळे पाहावे लागणार. माझा त्रास कमी व्हावा म्हणून बघावे लागते सर्व.आम्ही आदराने मान डोलावल्या.
ज्या ठिकाणी मयत होते तेव्हा घरच्यांना काही सुचत नसते पण हा हजर झाला की सगळ्यांना कामाला लावतो ."ए तुम्ही दोघे सामान आणायला जा आणि हो हार फुले मिळतील तिथूनच आणा उगाच दहा ठिकाणी फिरू नका .  प्रेताची नीट माहिती घेऊन जा तिथे काही उलट सुलट सांगू नका . मागच्यावेळी नारूआप्पा गेले तेव्हा टोपीच आणायची विसरलात . बरे ती गावावरून माणसे आली होती त्यांच्या डोक्यावर टोपी होती . त्यातली एक कामाला आली नाहीतर रात्री कोण धावेल त्या टोपीसाठी ???  मग घरात घुसून मोठ्याने विचारेल सर्टिफिकेट कोणाकडे आहे . त्याला तिथे रडत असणारी माणसे बाया कोणीच दिसत नाही फक्त कर्तव्य दिसते . कोणतरी सर्टिफिकेट त्याच्या हातात देतो.ह्याची सुरनळी करून कोणाच्यात घालायला ठेवलीस . स्मशानात कोण गेलाय ? समोरून उत्तर येते कोणी  नाही .तसा हा बाहेर जातो आणि समोर येईल त्याच्या हातात ती देऊन ऑर्डर सोडतो ज स्मशानात देऊन ये ?? वय मृत्यूची वेळ ,नाव नीट चेक कर आणि हो ती पाच नंबरची चिता माग .तिथे वारा छान लागतो एकदा आग पेटली की बघायला नको. सामान येईपर्यंत तो मयताच्या सर्व चांगल्या वाईट आठवणी काढत बसतो. घरातलेही मयताचे एव्हडे पराक्रम ऐकून अचंबित होतात.
सामान आल्यावर याचा हात वेगात चालू लागतो . तिरडी बांधून झाली की ह्याची ऑर्डर सुटते बॉडी आणा बाहेर . एकदा बॉडी बाहेर आली की त्यावेळच्या परिस्थितीनुसार ह्याचे मयतावर क्रियाकर्म चालू होतात.कोणी म्हणते आंघोळ घालूया तर हा खेकसतो सकाळी आंघोळ करूनच गेला ना मग आता परत काय गरज..??  पाय धुवा फक्त .सगळे चूप.कारण परिस्थिती आता फक्त हरीच्या हातात असते . खांदेकरी ही तोच ठरवितो.स्मशानात गेल्यावर जणू आपणच इथले राजे अशी त्याची वागणूक असते . प्रेताला पाणी पाजायला समुद्रवरच घेऊन गेले पाहिजे असा त्याचा हट्ट असतो.मला आठवते एकदा तरुण मुलाच्या प्रेताला आम्ही गेलो तेव्हा अजून याचे लग्न झाले नाही तेव्हा आधी लग्न लावले पाहिजे असे बोलून रुईचे झाड शोधायला गेला तो अर्ध्यातासाने परतला . आमच्या विभागातील नगरसेवक तिथे हजर होता त्याला रागाने इथे रुईचे झाड लावा नाहीतर अविवाहितांच्या प्रेताला अग्नी नाही देणार असे ठणकावून सांगितले . चितेला अग्नी दिला की ताबडतोब नातेवाईकांशी बोलून दहावे बारावे तेरावे फिक्स करून  तारीख जाहीर करतो.आणि सर्वाना घरी जाण्याची परवानगी ही देतो . बाहेर निघताना आम्हाला खुणा करतो आम्ही समजून मान डोलावतो शेवटी उरलेले सर्व सोपस्कार करून अग्नी देणार्याच्या खांद्यावर हात ठेवून स्मशानाबाहेर पडतो. बाहेर येताच विक्रम त्याच्या हातात काळी पिशवी देतो आणि बरोबरीच्या माणसाला आपल्या सोबत घेऊन जातो .
© श्री . किरण कृष्णा बोरकर

Saturday, March 3, 2018

तिची ही होळी

खरे तर कोणताही सण जवळ आला की तिची चिडचिड सुरू व्हायची.मुले स्वतःचे पहायची त्यांचे मित्रमैत्रिणी यातच रमून जायची.तर नवरा कामावर असायचा. चुकून घरी राहिला तर घराबाहेर पडायचा नाही. त्यात सासूची कटकट आहेच .बिछान्यावर झोपूनच होती ती.सारखी बेल मारून बोलवायची आणि खुणा करून कामे सांगायची.तशीही तीच तिची मैत्रीण होती.मनातल्या सर्व गोष्टी तिला सांगून टाकायची.
काल होळी झाली आणि आज रंगपंचमी. मुले सकाळीच बाहेर पडली होती आणि नवरा अजून उठला नव्हता. हिची धुसफूस सुरू झाली.
"हे आवरण्यातच आयुष्य जाणार ..... कसलेच सण साजरे करता येत नाहीत".अशी पुटपुटतच सासूच्या खोलीत शिरली.सासूचा पडलेला चेहरा पाहुन तिला काल रात्रीच्या घटनेची आठवण झाली.
रात्री पुरणपोळ्या केल्या होत्या.सवयीने ती सासूला भरवायला गेली.तितक्यात नवरा ओरडला "कसल्या पुरणपोळ्या भरवतेस तिला... ?? चालत नाही माहितेय ना ...?? उगाच काय झाले म्हणजे.. ?? पथ्य पाळा जरा.."एक क्षणात सासूचा चेहरा पडला.मुकाट्याने बाकीचे घास गिळून ती झोपी गेली होती.
तिला सासूबाईंचा चेहरा पाहून कसेतरीच झाले. तिरमिरीत ती मागे फिरली आणि एक ताटात दूध आणि पुरणपोळी घेऊन आली."च्यायला म्हातारी एका पुरणपोळीने मरणार नाही.आणि अशी जगुन तरी काय करणार आहे.त्यापेक्षा मनासारखे खाऊन पिऊन जगू   दे तिलाआणि काही झाले तरी मलाच करावे लागणार तिचे....तसेही मीच करतेय ना ..? हौसेने पोळी खाईल आणि खुश होईल".असे मनात बोलत तिने तिला  उठवले . तिच्या हातातली पुरणपोळी आणि दुधाची वाटी पाहून  सासूबाईचे डोळे चकाकले.एका लहान मुलासारखे निरागस हास्य तिच्या चेहऱ्यावर पसरले . हातानेच छान अशी खूण करीत तोंडाचा आ वासाला. तिचे हावभाव पाहून हिला खुदकन हसू आले.मनातला संताप कुठच्या कुठे पळाला.
पुरणपोळी खातखात थरथरत्या हातानी सासूबाईंनी बाजूच्या टेबलातील ड्रॉवरमधून गुलालाची पुडी काढली.चार बोटे गुलालात बुडवून तिने तिच्या गालावर ओढले आणि बोटे ओठाजवळ नेऊन मुका घेतला .क्षणभर तिच्या लक्षात काही आलेच नाही .काहीवेळाने  दोन अश्रू तिच्या डोळ्यातून ओघळले .सासूबाईंनी थम्सअपची खूण करीत हॅपी होळी केले .मग तिनेही अश्रू पुसत गुलालाची चार बोटे सासूबाईंच्या गालाला लावली आणि डोळे पुसतच खोलीबाहेत पडली.
स्वयंपाकघरात भांडी धुताना अचानक मागून तिच्या कमरेभोवती हाताचा विळखा पडला आणि कानाशी चिरपरिचित आवाज आला "हॅपी होळी". नवऱ्याचा  आवाज ऐकून ती मोहरून उठली .हळुवारपणे त्याने तिच्या चेहऱ्यावर गुलाल फासला . खरेच यावर्षीची होळी तिच्यासाठी अविस्मरणीय होती.
© श्री. किरण कृष्णा बोरकर