Saturday, March 3, 2018

तिची ही होळी

खरे तर कोणताही सण जवळ आला की तिची चिडचिड सुरू व्हायची.मुले स्वतःचे पहायची त्यांचे मित्रमैत्रिणी यातच रमून जायची.तर नवरा कामावर असायचा. चुकून घरी राहिला तर घराबाहेर पडायचा नाही. त्यात सासूची कटकट आहेच .बिछान्यावर झोपूनच होती ती.सारखी बेल मारून बोलवायची आणि खुणा करून कामे सांगायची.तशीही तीच तिची मैत्रीण होती.मनातल्या सर्व गोष्टी तिला सांगून टाकायची.
काल होळी झाली आणि आज रंगपंचमी. मुले सकाळीच बाहेर पडली होती आणि नवरा अजून उठला नव्हता. हिची धुसफूस सुरू झाली.
"हे आवरण्यातच आयुष्य जाणार ..... कसलेच सण साजरे करता येत नाहीत".अशी पुटपुटतच सासूच्या खोलीत शिरली.सासूचा पडलेला चेहरा पाहुन तिला काल रात्रीच्या घटनेची आठवण झाली.
रात्री पुरणपोळ्या केल्या होत्या.सवयीने ती सासूला भरवायला गेली.तितक्यात नवरा ओरडला "कसल्या पुरणपोळ्या भरवतेस तिला... ?? चालत नाही माहितेय ना ...?? उगाच काय झाले म्हणजे.. ?? पथ्य पाळा जरा.."एक क्षणात सासूचा चेहरा पडला.मुकाट्याने बाकीचे घास गिळून ती झोपी गेली होती.
तिला सासूबाईंचा चेहरा पाहून कसेतरीच झाले. तिरमिरीत ती मागे फिरली आणि एक ताटात दूध आणि पुरणपोळी घेऊन आली."च्यायला म्हातारी एका पुरणपोळीने मरणार नाही.आणि अशी जगुन तरी काय करणार आहे.त्यापेक्षा मनासारखे खाऊन पिऊन जगू   दे तिलाआणि काही झाले तरी मलाच करावे लागणार तिचे....तसेही मीच करतेय ना ..? हौसेने पोळी खाईल आणि खुश होईल".असे मनात बोलत तिने तिला  उठवले . तिच्या हातातली पुरणपोळी आणि दुधाची वाटी पाहून  सासूबाईचे डोळे चकाकले.एका लहान मुलासारखे निरागस हास्य तिच्या चेहऱ्यावर पसरले . हातानेच छान अशी खूण करीत तोंडाचा आ वासाला. तिचे हावभाव पाहून हिला खुदकन हसू आले.मनातला संताप कुठच्या कुठे पळाला.
पुरणपोळी खातखात थरथरत्या हातानी सासूबाईंनी बाजूच्या टेबलातील ड्रॉवरमधून गुलालाची पुडी काढली.चार बोटे गुलालात बुडवून तिने तिच्या गालावर ओढले आणि बोटे ओठाजवळ नेऊन मुका घेतला .क्षणभर तिच्या लक्षात काही आलेच नाही .काहीवेळाने  दोन अश्रू तिच्या डोळ्यातून ओघळले .सासूबाईंनी थम्सअपची खूण करीत हॅपी होळी केले .मग तिनेही अश्रू पुसत गुलालाची चार बोटे सासूबाईंच्या गालाला लावली आणि डोळे पुसतच खोलीबाहेत पडली.
स्वयंपाकघरात भांडी धुताना अचानक मागून तिच्या कमरेभोवती हाताचा विळखा पडला आणि कानाशी चिरपरिचित आवाज आला "हॅपी होळी". नवऱ्याचा  आवाज ऐकून ती मोहरून उठली .हळुवारपणे त्याने तिच्या चेहऱ्यावर गुलाल फासला . खरेच यावर्षीची होळी तिच्यासाठी अविस्मरणीय होती.
© श्री. किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment