Friday, June 1, 2018

लिव्ह इन अँप

खरे तर दबकत घरात शिरणाऱ्या बंड्याला पाहूनच मला पुढच्या धोक्याची जाणीव झाली होती .पण नेहमीसारखा मी बेसावध राहिलो आणि येणाऱ्या संकटाला आत घेतले.
"भाऊ .....तुम्ही लग्न का केले .."?? हा प्रश्न होता की जाब हे कळण्याआधीच स्वयंपाकघरातून भांडी पडल्याचा आवाज ऐकू आला आणि संध्याकाळचे जेवण गेले याची खात्री झाली.
"काहीतरी काय विचारतोस बंड्या..... भारतीय समाजव्यवस्थेचा एक भाग म्हणून लग्न करावे लागते". मी मुद्दाम उच्च भाषेतून सांगायचं प्रयत्न केला आणि आत पाहून "चहा टाक ग...असे दबक्या आवाजात ओरडलो.
"दूध नासले आहे .. लस्सी करून देऊ का ..?? असा छद्मी आवाजात आतून प्रश्न आला आणि पुढचे परिणाम टाळण्यासाठी मी बंड्याला म्हटले "चल...बाहेरच चहा पिवू"..
अण्णाकडे दोन कटिंगची ऑर्डर देऊन मी बंड्यावर राग काढायची सुरवात केली.आज अचानक हे प्रश्न का.... ?? त्याने माफी मागितली.
"सध्या मी एक नवीन अँप काढतोय.लिव्ह इन असे नाव आहे अँपचे" बंड्या उत्साहात आला.
"आता हे कशासाठी ""??मी चिडून विचारले.
"भाऊ ....तुम्हाला माहितीय ..??हल्ली लग्नसंस्थेवर कोणाचा विश्वास राहिला नाही. लग्न करून आपले स्वातंत्र्य गमावतोय अशी भावना होतेय.बहुतेकजण लिव्ह इन मध्ये विश्वास ठेवतायत . माझ्या अँपमध्ये तुम्हाला सर्व काही मिळेल.
"म्हणजे ...?? मी उत्सुकतेने विचारले .
ह्या अँपमध्ये स्त्री पुरुषांना प्रथम रजिस्टर करावे लागेल . मग तीन टप्प्यात तुमचे प्रोफाइल भरावे लागेल . त्यात प्रथम तुमची वैयक्तिक माहिती .मग तुम्हाला कसा जोडीदार हवाय त्याबद्दल माहिती आणि नंतर तुमच्या अपेक्षा, अटी .कमीत कमी एक फोटो पोस्ट करावा लागेल . तो फोटो खरा आहे हे सिद्ध करावे लागेल."बंड्याची माहिती सुरू झाली.
"अरे वा .....! मग पुढे काय ..?? आता मलाही इंटरेस्ट वाटू लागला.
त्यानंतर आपला जोडीदार निवडावा आणि अडमीनला कळवावे . मग दोघांची संमती असल्यास काही पैसे भरून अडमीन कडून एकमेकांचे फोन नंबर घ्यावेत.अर्थात त्याचे चार्जेस कमी असतील . त्यानंतर ते एकमेकांना भेटतील आणि ठरवतील . आमचे  अँप त्यांना वकील देईल.भारतातील कोणत्याही शहरात विभागात त्यांना पाहिजे तशी रूम देण्याची जबाबदारी घेईल . यासाठी अँप वकील आणि इस्टेट एजन्सीशी कॉन्ट्रॅक्ट करेल.दोन्ही पक्ष आपल्याला किती महिने राहायचे ..? कसे राहायचे ..?काय नियम पाळायचे याची चर्चा वकिलाच्या पुढ्यात करतील त्यानुसार कागदपत्रे बनतील". बंड्याकडे पूर्ण प्लॅनिंग होते .
"आयला ....बंड्या हे भारीच .पण उद्या कोण आजारी पडले किंवा सेक्स नंतर काही प्रॉब्लेम आला तर ...?? शंका काढणे हे माझे कामच होते .
"भाऊ....  तुम्ही आजारी पडता तेव्हा वहिनी तुमचा इलाज करते का ...?? डॉक्टर करतात ना ?? वहिनी फक्त पैसे देते .आम्ही एक मेडिकल एजन्सी नेमणार आहोत . तिला फोन केला की घरी येऊन तुमची ट्रीटमेंट करेल. चोवीस तास तुमच्या सेवेसे एक व्यक्ती राहील. आणि संबंध झाल्यावर काही घडले तर कागदपत्रातील अटीनुसार कारवाई होईल"माझ्याकडे डोळे वटारून पाहत बंड्या म्हणाला.
"आता या साधारण अटी काय असतील ...?? माझा प्रश्न.
"काही नाही हो ...रूमचे भाडे ,केबल टीव्ही, गॅसचे बिल,आणि इतर बिल भरण्यासाठी पैसे किती काढावे. जेवणाचे नियम ,कोणाला सेक्सच्या बाबतीत काही नियम ठरवायचे असतील तर . सर्व बारीकसारीक गोष्टी ज्यावरून पुढे वाद होऊ शकतील त्यासाठी अटी." सहजपणे बंड्याचे उत्तर आले .
"बरे हे अँप कोण घेऊ शकतो ....?
"अठरा वर्षावरील कोणीही .कोणीही कोणाबरोबर राहू शकतो"" बंड्याने सर्व बाजूने विचार केलेला दिसतोय .
"बरे ..बंड्या यात अँप चा फायदा काय ?? मी फायद्यावर आलो.
"इस्टेट एजंट,वकील,आणि इतर सर्व्हिस हे अँपकडूनच घ्यावी लागेल . त्यातूनच अँपला कमिशन मिळेल. भाऊ ही सेवा फक्त कॉर्पोरेट आणि बिझनेसमन मोठ्या लोकांसाठी आहे . फक्त पैसे भरायचे आणि आवडत्या व्यक्तीबरोबर  मनाने न गुंतता राहायचे . म्हणून मी तुम्हाला विचारले लग्न का केलेत..?? सेक्ससाठी अधिकृत परवाना मिळतो म्हणून..?? वंश वाढवा म्हणून..?₹ हे सर्व करताना तेव्हढ्या जबाबदाऱ्या ही अंगावर घ्या . हल्ली मुलांची जबाबदारी कोणाला नकोय . चोवीस तास कामावर असतात बरेच जण .त्यात मुल सांभाळा,एकमेकांना सांभाळा,सासू सासरे सांभाळा या सर्व जबाबदाऱ्या कोणी  घेत नाहीत . त्यातही दुसरा पुरुष किंवा स्त्री आवडल्यास व्यभिचार मानला जातो.मग लिव्ह इन मध्ये बरे .ह्या सर्व जबाबदाऱ्या नाहीत .शिवाय दुसरा जोडीदार आवडला तर पहिल्याला सोडून द्या आणि हे सर्व कायदेशीर . तुम्ही फक्त आयुष्यभर चार्जेस भरा. उद्या एकटे मेलात तरी तुमचे अंत्यसंस्कार करायची जबाबदारी हे अँप घेईल. इतकेच नव्हे तर ते कसे करायचे ,किती माणसे हवीत,दिवस कुठे करायचे याचीही जबाबदारी हे अँप घेईल".बंड्याचा उत्साह वाढू लागला होता.मी खाली वाकून त्याच्या पायाला स्पर्श केला."धन्य आहात तुम्ही ..असे म्हणून घरी निघालो.
घरी येताच सौ. नेहमीप्रमाणे रागावून म्हणाली "किती उशीर हो यायला....?  तुम्ही जेवल्याशिवाय मी जेवत नाही हे  माहीत आहे ना तुम्हाला ....?? चला लवकर भूक लागलीय .तुमच्या आवडीची ओल्या काजूची भाजी केलीय" हे ऐकूनच मन भरून आले . तसाच फोन उचलून बंड्याला मेसेज केला तुमच्या अँपमध्ये मन भरून येणाऱ्याआणि डोळ्यातून पाणी आणणाऱ्या गोष्टीसाठी काय अटी आहेत ..??आणि त्याचे चार्जेस काय आहेत ???
© श्री. किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment