Friday, May 31, 2019

आमचा मुलगा

आमचा मुलगा
"आहो..... झाली का तयारी...?? की अजून काही बाकी आहे ...."?? तिने नवऱ्याला लटक्या रागाने विचारले.
"हो.. हो ....झाली सर्व तयारी .. आणि असे काय मोठे सामान आहे माझ्याकडे....?? तुझेच जास्त ...".त्यानेही हसून उत्तर दिले .
" वाटले नव्हते हो... हा दिवस येईल ..कोणी वीस बावीस वर्षांपूर्वी तुम्ही परदेशात जाल असे सांगितले असते तर विश्वास बसला असता का... ???  ती भूतकाळात हरवून गेली.
"हो ग.... लग्न तरी होईल का आपले..?? यावर ही विश्वास नव्हता .."तो पुन्हा हसत म्हणाला.
" पण आज लग्न होऊन मुलगा झाला आणि तो नुसता शिकला नाही तर उच्च शिक्षणासाठी परदेशात गेला आणि पदवीदान समारंभाला आपल्याला तिथे बोलाविले आहे हे सारे स्वप्नवत वाटतेय मला" ती भरल्या कंठाने म्हणाली.
"हो ना ...ही सर्व त्याचीच मेहनत आपण फक्त पाठिंबा देणारे ...दुसरे करूच काय शकत होतो आपण.. जन्माला आला तेव्हा  त्याने जोरात हातपाय हलविले ते पाहून किती खुश झाले होते मी ..."ती आठवणीत हरवून गेली होती .
"आणि तू जेव्हा सांगितलंस की लबाड बघा कसा बघून हसला तेव्हाच क्षण तर मी विसरुच शकत नाही". तो ही आता भूतकाळात रमून गेला.
" मग त्याला वाढविताना होणारी तारांबळ ..तू तर दिवसभर दुकानात आणि मी घरी हार बनवीत . आलटून पालटून त्याच्यावर लक्ष ठेवायचो . शाळेत नेताना त्याचे भोकाड पसरणे आणि मग तुझे घरी येऊन रडणे अजूनही विसरता येत नाही . पण तो हळू हळू मोठा कधी झाला ते कळलेच नाही .आपली अवस्था पाहून त्याने स्वतःलाच घडवायला सुरवात केली . आपण आपल्यापरीने त्याला कमी पडू दिले नाही . त्याला चित्रपट दाखवायची जबाबदारी माझी तर संगीताची रुची तुम्ही निर्माण केलीत. शारीरिक मेहनतीचे महत्व तुम्ही पटवून दिलेत त्याला".ती भावनाविवश झाली.
" तो मोठा झाल्यावर दुकानात बसून मला मदत करू लागला घरी आल्यावर तुला या सर्व कामात... तो अभ्यास कधी करायचा ते कळत नव्हते .दहावीला गेल्यावर त्याची हुशारी पाहून पुढे काय करावे यासाठी प्रिंसिपलने मला बोलावले होते .पण मला पाहून त्यांना धक्का बसला" तो हसत म्हणाला.
"मग आंधळ्या पालकाला समोर पाहून धक्काच बसणार ना ....?? तिने हसत विचारले आणि दोघेही हसू लागले.ह्याला कोणाची सहानुभूती आवडायची नाही . अजूनही स्वतःहून कोणाला सांगत नाहीत माझी आई हातापायाने अधू तर वडील आंधळे आहेत .
" मी आंधळा आणि तू अधू . चालताना तुला आधार लागतो .."तसे दोघेही एकमेकांना टाळी देऊन हसू लागले .
"पण आपल्या मुलाने तेअपंगत्व कधीही जाणवू दिले नाही . तो त्याच्यापरीने पुढे जात राहिला. जमेल तसे अभ्यास सांभाळून आपल्याला मदत करीत होता .शिक्षवृत्ती मिळवून पदवीधर झाला आणि पुढच्या शिक्षणासाठी परदेशी जायची संधी चालून आली पण आपले काय होईल या विचाराने त्याने प्रथम नकारच दिला होता ...."त्याने डोळे पुसत आठवणी जाग्या केल्या.
"हो पण त्याचवेळी तुम्ही सावरलात त्याला ...तो नसतानाही आम्ही जगत होतो की एकमेकांच्या आधाराने......मुलगा आयुष्यात आला आणि जगण्यासाठी नवीन प्रेरणा मिळाली . त्याला वाढविण्याच्या उर्मीनेच  नवे बळ मिळाले आम्हाला.. हे समजावले तेव्हा तो परदेशी गेला . पुन्हा आपण आपल्या पूर्वीच्या आयुष्यात परत गेलो . पण आताचे आयुष्य पूर्वीपेक्षाही कठीण होते . कारण त्याच्या असण्याची सवय झाली होती .थोडे परावलंबी झालो होतो. त्याच्या जाण्याने आयुष्यातील मरगळ झटकलीआणि पुन्हा उभे राहिलो. पुन्हा ही दोन वर्षं कशी गेली हे कळलेच नाही...."त्याचा स्वर पुन्हा उत्साहाने भरला.
" हो ना ....आणि चार महिन्यांपूर्वी त्याने पहिल्या श्रेणीत पास झाल्याची बातमी दिली त्याच बरोबर पदवीदान समारंभाला हजर राहण्याचे आमंत्रण ही. आपल्यासारख्या अपंग आईवडिलांच्या दृष्टीने यापेक्षा आनंदाचा क्षण कोणता ..?? बोलता बोलता तिला गहिवरून आले .
"अग वेडे रडू नकोस आता ... हे अश्रू त्याच्या पदवीदान समारंभासाठी जपून ठेव .. दाखवून देऊ सर्वाना ...माणसाचे शरीर अपंग असते मन नाही . मन  तरुण आणि उत्साही असले तर काहीही घडू शकते.." असे बोलून त्याने आपली लाल पांढरी घडीची काठी सरळ केली आणि बायकोचा हात धरून बाहेर पडला .
© श्री. किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment