Sunday, May 12, 2019

मातृदिन


मातृदिन
नेहमीप्रमाणे तिला आधार देत तो हॉस्पिटलच्या लिफ्टमध्ये शिरला आणि लिफ्टमॅनने त्याला पाहून ओळखीचा हात दाखविला.तिला घेऊन तिसऱ्या मजल्यावरील डॉक्टरांच्या रूमजवळ येईपर्यंत बरेच  ओळखीचे चेहरे समोर येऊन हसून गेले.तो सर्वांशी हसून ओळख दाखवीत होता फक्त तिच्या चेहऱ्यावर कसलीच ओळख नव्हती.हातात छोटी बाहुली घेऊन ती फक्त तिच्याशीच खेळत होती .मधेच तिच्या छोट्या पर्समधून जेम्सची गोळी हळूच तोंडात टाकत होती . आधाराला तिने त्याचा हात घट्ट धरून ठेवला होता.
"कश्या आहात आजी...."???? रिसेप्शनवरील नर्सने गोड हसत तिला विचारले.
"तूच आजी .....असे म्हणत तिने तिला जीभ काढून वेडावले. त्याने हसत तिला वेटिंग रूम मध्ये बसविले.
तिच्याकडे बघताना त्याचे मन भूतकाळात गेले. गेली तीन  वर्षे तो हिला घेऊन हॉस्पिटलमध्ये इलाजासाठी येत होता.तिचेही वय झाले होते आणि त्यादिवशी ती बाथरूममध्ये पडली . त्यानंतर जणू ती सर्व विसरूनच गेली.आपले वय काय ...?? आपल्याला मुले आहेत..??? जावई आहे... नातवंडे आहेत ..सर्व काही विसरून ती बालपणात रमू लागली.मग तिची सर्व जबाबदारी ह्याच्यावरच पडली.काय करणार हा तरी .. पत्नी लवकरच देवाघरी गेली. मुलगा शिक्षणासाठी परदेशात गेला तो परत यायचे नाव घेत नाही . मुली लग्न करून सासरी गेली . तिलाही तिच्या सासू सासाऱ्यांची काळजी आहेच . मग राहिला कोण ....?? तर हाच .  पण ह्याने तिला टाकले नाही . जमेल तिचे सर्व करत होता . ती आता लहान बाळच झाली होती . मध्येच तिला वर्तमान आठवे पण परत भूतकाळात जायची . यानेही तिची अवस्था पाहून स्वेच्छा निवृत्ती घेतली होती . तसेही पैश्याची आता फार गरज नव्हती होता तो पुष्कळ होता . मग आता तिला सांभाळणे हेच त्यांचे काम . तिला आंघोळ घाला..जेवण भरवा गोष्टी सांगा ,तिच्या विविध प्रश्नांची उत्तरे द्या . जीव नुसता भंडावून जात असे . कधी कधी विचार करायचा आपल्या पत्नीने कसे मुलांना आणि आपल्याला सांभाळत संसार केला असेल....?? मनोमन तिच्या पाया पडत असे . कामाच्या गडबडीत आपण कधी या गोष्टीकडे लक्षच दिले नाही . त्याचेच हे फळ आहे की काय ....???
विचार करीत असतानाच डॉक्टरने आत बोलावले . चेकिंग करून झाल्यावर काही सुधारणा नाही या अर्थाने मान डोलावली .
"विचार कर ....तिला वृद्धाश्रमात ठेव. पुढे पुढे परिस्थिती गंभीर होणार आहे ... नाही झेपणार तुला .." डॉक्टर त्याला समजावत होता.अर्थात तो त्याचा लहानपणापासूनचा मित्र त्यामुळे त्याला बोलायचा अधिकार होताच . त्याने हसून नकारार्थी मान डोलावली.
" जमेल तितके करेन ...पण मीच करेन "तसा डॉक्टर वैतागला.
"अरे तिला तिचे इतर नातलग आहेत ना ...?? तुझी ती सासू आहे मान्य ...पण वहिनी गेल्यावर तसा फारसा संबंध राहतो कुठे ..??  कोण आले का तुला मदत करायला तिकडून . उलट हिला ही तुझ्याकडे सोडून गेले . आता विचारत ही नाहीत आई जिवंत आहे की गेली"....तो हसला. स्वतःच्या धुंदीत निरागसपणे बहुलीशी खेळत असलेल्या आपल्या सासूबाईकडे पाहत म्हणाला "मग मी ही तेच करायचे का ....?? अर्ध्या संसारातून बायको सोडून गेली . मुले नुकतीच तारुण्याच्या उंबरठ्यावर .अश्यावेळी ही माझी सासू पुढे आली . मुलांचा सांभाळ केला .त्यांना योग्य वळण लावले . आज हिच्यामुळेच ती योग्य मार्गाला लागली आपले आयुष्य जगतायत .अरे फक्त तीनच वर्ष झाली तिची अशी अवस्था होऊन . आणि  त्रास होतो जमत नाही म्हणून वृद्धाश्रमात सोडायचे . तिची मुलगी म्हणजेच माझी बायको गेल्यावर तिने मुलांना हॉस्टेलला ठेव असा सल्ला नाही दिला तर त्यांना स्वतःच्या पंखाखाली घेतले.. वाढविले .मला सावरले . तसे मलाही मातृसुख नाहीच . बायको ही नाही . मुले आपापले पाहतायत . मग मी का तिला सोडू .सासूच आहे रे ती ......कोणी परकी दूरची नातलग नाही . करेन मी जमेल तितके"असे बोलून तो तिला घेऊन बाहेर पडला. रस्त्यात त्याने मोबाईल चेक केला . मुलाचा आणि मुलीचा हॅप्पी मदर्स डे चे व्हाट्स अप मेसेज होते . त्याने तिला त्यांचे मेसेज दाखविले . मुलांचे फोटो पाहून तिच्या चेहऱ्यावर आनंद पसरला आणि ती टाळ्या वाजवू लागली . तिचा चेहरा पाहून तो सुखावला . घरी येतानाच तो छोटासा केक घेऊन आला .तिची तयारी करून बायकोच्या फोटोजवळ केक घेऊन उभा राहिला .हॅप्पी मदर्स डे म्हणत केक कापला आणि छोटा तुकडा सासूच्या तोंडात भरविला.
© श्री. किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment