Friday, September 25, 2020

गिफ्ट

गिफ्ट 
"तुझ्या वयाची मला दोन मुले आहेत.." ग्लासाने चियर्स करून तो हे नेहमी म्हणायचा. मी ही हसून मान डोलवायचो. कारण रंगात आला की शेवटी बिल तोच भरणार याची खात्री असायची आम्हाला.
 तो डिपार्टमेंटमधील सर्वात जुना वर्कर.
 फॅक्टरी चालू झाली तेव्हापासून तो आहे असे इतर विनोदाने म्हणायचे.
अशिक्षित होता ...पण सही करायला यायची . पगाराचे आकडे ही समजायचे.
कोणतीही मशीन रिपेयर करण्यात त्याचा हात कोणीच धरू शकत नव्हते.
प्रॉब्लेम काय आहे आणि तो का आला हे त्याच्याइतके अचूक कोणी सांगू शकत नव्हते . तीन जणांची टीम होती त्यांची .
माझे आणि त्याचे पहिल्या दिवसापासून ट्युनिंग जुळले . मला तो साहेब कधीच म्हणाला नाही . अर्थात माझी ती अपेक्षा नव्हती म्हणा.
 पहिल्या दिवसापासून तो मला सांगत होता .." या पाच सहा वर्षात रिटायर्ड होईन.... पण माझी सर्व्हिस तेरा वर्षे झाली तरी तो रिटायर्ड झाला नव्हता. शेवटी रिटायर्ड झाला... तरीही कंपनीने त्याला कॉन्ट्रॅक्टवर ठेवले. 
त्याची मेमरी खूप शार्प होती . जवळच्या मित्र नातेवाईकांचे वाढदिवस तर लक्षात असायचेच . पण कोणते समान कुठे ठेवले आहे हेही त्याच्या डोक्यात पक्के बसलेले असायचे . म्हातारा वर गेला तरी स्वप्नात येउन कुठल्या भंगारात काय मिळेल हे सांगेल असे आम्ही गमतीत म्हणायचो .
आमच्यावर त्याचा खूप जीव होता . अनुभवाचा खजिना होता त्याच्याकडे .
शेवटी ती वेळ आली . कंपनीने त्याला जबाबदारीतून मुक्त केले . सर्वांचा हसत हसत निरोप घेतला त्याने. 
माझा हात हाती घेऊन म्हणाला." आठवण ठेव माझी"
 मी नेहमीसारखे हसून होय.. म्हटले.
मी दिलेले गिफ्ट त्याने घेतले नाही.
" देशील रे कधीही .. तुझ्याकडून असल्या गिफ्टची अपेक्षा नाही....." काही न कळून मी गप्प बसलो .
मला मिठी मारताना अलगद  पुसलेले डोळे बऱ्याच जणांनी पाहिले .
पुन्हा रुटीन सुरू झाले. काही दिवस त्याची कमी जाणवली.
पण म्हणतात ना कोण कोणासाठी थांबत नाही . काम तर मुळीच नाही..काही दिवस आमचा कॉन्टॅक्ट होता मग कामाच्या आणि इतर गडबडीत त्याला विसरून गेलो.
आता या लॉकडाऊनमध्ये अचानक त्याचा फोन आला . काहीसा थकलेला... चिंताग्रस्त...
 मी खुश झालो . लॉकडाऊनमध्ये हाचतर सहारा होता . छान गप्पा मारल्या आम्ही. पण कुठेतरी काही सतत खटकत होते . 
इतरांचे नंबर मागितले त्याने . त्यांना व्हाट्स अँप वापरता येत नाही म्हणून एसएमएस केले.
सध्या ते मुलीसोबत राहत होते . त्यानंतर त्यांचे वेळीअवेळी फोन सुरू झाले . सुरवातीला बरे वाटत होते पण नंतर थोडा कंटाळा येऊ लागला . तेच तेच बोलणे काहीसे असंबद्ध मग कधी कधी टीव्ही बघत असताना ,वाचन करताना फोन आला की कट करू लागलो. कधी त्यांचा मिस कॉल आला की मी फोन करायचो पण त्यांच्या लक्षात राहायचे नाही .
त्या दिवशी पुन्हा त्याने फोन केला . त्याच्या पेन्शनच्या काही अडचणी आल्या होत्या . चौकशी कर अशी विनती केली . पुन्हा काही वेळाने फोन ...पुन्हा तेच..
 आज पुन्हा त्याचा फोन... मी त्याला पेन्शनविषयी सांगितले..... तो विसरला होता.
 आता मात्र मी थोडा चिडलो .आवाज चढविला . इतक्यात फोनमधून एका स्त्रीचा आवाज ऐकू आला.
" भाऊ... मी त्यांची मुलगी बोलतेय . सॉरी बाबांची मेमरी लॉस होते कधी कधी ..त्यामुळे काय बोलले ते विसरतात. पण अजूनही तुमची आठवण आहे त्यांना . खूप बोलत असतात तुमच्या विषयी .तुमचे गिफ्ट बाकी आहे म्हणे . कधीतरी नक्की द्याल असे म्हणतात . फक्त तुम्हालाच फोन करतात हो ते . बोलत राहा अधून मधून ....
 काही न बोलता मी फोन बंद केला . माझ्या डोळ्यातील दोन अश्रू मोबाईल स्क्रिनवर पडले . कदाचित हेच ते गिफ्ट होते ज्याची त्याला अपेक्षा होती.
© श्री. किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment