Sunday, September 27, 2020

डॉटर्स डे

डॉटर्स डे
"देवा... आज पुन्हा उशीर होणार तर ...."भिंतीवरील घड्याळाकडे पाहत ती पुटपुटली मग रागारागाने आपल्या झोपलेल्या नवऱ्याकडे पाहिले आणि बाहेर पडली.
तिची सातची ड्युटी त्यामुळे सकाळी सहाला बाहेर पडावे लागे. ट्रेन मग बस..करत ती धावत ड्युटीवर जायची.
काल रात्री नवऱ्याने नवरेगिरी दाखवली त्याचा परिणाम उठण्यावर झाला. लग्नाला दहा वर्षे झाली तरी मुलबाळ नव्हतेच.त्यामुळे एकप्रकारचा तुसडेपणा तिच्या स्वभावात होता. 
ती सरकारी हॉस्पिटलच्या एका विभागात साफसफाईचे काम करायची.तिच्या तुसड्या स्वभावामुळे सर्वांच्याच नजरेतून उतरली होती.परिणाम तिच्या कामावर झाला. 
कोणीही नाक मुरडेल असा वॉर्ड तिला दिला होता. त्या वॉर्डमध्ये  मतिमंद आणि अपंग रुग्णमुली होत्या. त्या वॉर्डची आणि पेशंटची साफसफाई तिच्या गळ्यात पडली होती.
मग तीही आपला राग पेशंटवर काढायची.काम करताना सतत चिडचिड चालायची. तरी बरे त्या मुलींना हीचा राग कळत नव्हता.एकूण काय ....?? दोन्ही बाजूने छान चालले होते . 
मस्टरवर सही करून अंगावर अप्रोन चढवून ती वॉर्डमध्ये शिरली आणि तो परिचित गंध तिच्या नाकात शिरला. 
देवा....!!  तीन नंबरच्या पेशंटने आज अंथरुणातच.. शी....??? मस्तकात संतापाची तिडीक घुसून ती त्या मुलीकडे तरातरा चालत गेली.
 "किती वेळा सांगितले डायपर काढू नकोस ...ऐकत का नाहीस. तू राहशील दिवसभर अशीच हसत या घाणीत ..असे पुटपुटत तिने तिला उचलून बाजूला ठेवले . बेड स्वच्छ करून तिला आंघोळ घातली. ती मुलगी तोंडात अंगठा ठेवून खुदूखुदू हसत होती.
तीला नाही बेडवर ठेवत तर चार नंबर पेशंटने हाक दिली "मावशी ... टॉयलेट ....जन्मतः पोलियो झालेली ती मुलगी मतिमंद नक्कीच नव्हती पण तिला जागेवरून हालताच येत नव्हते . काही दिवसासाठी ऍडमिट झाली होती . दुसरीकडे जागा नाही म्हणून इथे ठेवले होते .
"येते ग बाई .. ती डाफरली..
" लवकर या नाहीतर इथेच होईल ..आणि मग तुम्हालाच करावे लागेल सर्व.." तिने हसत उत्तर दिले.
"खरे आहे ग पोरी.."असे म्हणत तिला अलगद उचलून टॉयलेटमध्ये घेऊन गेली .
प्रत्येकीची स्वच्छता आणि वॉर्डची साफसफाई करण्यात वेळ कसा निघून गेला ते समजलेच नाही तिला.
जेवणाची वेळ झाली तेव्हा आपला डबा उघडून जेवायला बसली इतक्यात एक नंबरच्या पेशंटने हातातील जेवणाचे ताट फेकून दिल्याचे पाहिले .
"मला नकोय हे .. चपाती भाजीच हवीय.. हे नकोय.." एक नंबर किंचाळून म्हणाली. इतरवेळी शांत असणारी ही मुलगी जरा काही मनाविरुद्ध झाले की संतापायची आदळआपट करायची . हातात मिळेल ती वस्तू फेकून द्यायची.हि जेवण सोडून तिच्याकडे धावत गेली . आपला डबा तिला देऊन शांत केले .पुन्हा तिला साफ केले . बेड स्वच्छ केला . मग पेशंटचे जेवणच तिने पोटात ढकलले .
"मावशी पत्ते खेळणार का ....?? पाच नंबर बेडवरची मुलगी म्हणाली . अर्थात तिच्या हातात काही नव्हते . ती रागारागाने तिच्याजवळ जाऊन बसली.
" मी नेहमी खेळते मामाशी....जो हरेल त्याने कपडे काढायचे असे ठरलंय आमचे . मीच हरते नेहमी .. आज तुम्ही खेळा  माझ्याबरोबर ..."
"देवा... ती मनात म्हणाली .. काय रे हे .... !! बरे झाले मला मूल नाही. काय ही अवस्था एकेकींची.." ती काही न बोलता तिच्या बाजूला बसली . बघ मी हरली आता काढू कपडे .. . 
"नको ग बाळा..मी सोडले तुला. चहा पिऊन खेळू "ती म्हणाली. नेहमीचे होते ते .
तितक्यात दोन नंबरची पेशंट जवळ आली.
"मावशी...सगळे कपडे घडी घालून ठेवले.अजून काही आहेत का घडी घालायला .ती अतिशय व्यवस्थित दिसत होती . टापटीप राहायची आणि हाच तिचा अवगुण होता. स्वमग्न असलेली ही मुलगी अचानक झटका आल्यामुळे इथे गेले पंधरा दिवस ऍडमिट होती .
पाहता पाहता ड्युटी संपायला आली तसे तिने प्रत्येकीजवळ जाऊन त्यांची पुन्हा तपासणी केली . स्वभावानुसार काहीतरी टोचून बोलणे सोडले नाही तिने.
 वॉर्डबाहेर पडणार इतक्यात चार नंबर ने हाक मारली "मावशी जरा थांबा की ...
त्रासिक चेहऱ्याने तिने तिच्याकडे पाहिले ."आता काय ...??  टॉयलेटला जायचे का ...??  तिने विचारले . 
"नाही पण एक काम आहे ...असे म्हणून खुर्चीवर बसलेल्या नर्सला खूण केली . 
नर्सने हसत एक बॉक्स टेबलाखालून काढला आणि तिच्यासमोर ठेवला . 
"चला या सर्वजणी.... आपल्याला केक कापायचा आहे ....असे म्हणतात सर्वजणी टेबलाभोवती गोळ्या झाल्या. चार नंबर तिचा आधार घेत व्हीलचेयरवर बसली .
बॉक्समध्ये एक छानसा केक होता आणि त्यावर लिहिलं होतं हॅप्पी डॉटर्स डे.
"मावशी...आम्ही तुमच्या मुलीच नाही का ..?? एक आई घेते त्याप्रमाणे काळजी घेता आमची. चिडचिड करता.... ओरडता... पण कर्तव्यात चुकत नाहीत तुम्ही .आम्ही तुमच्या लेकीचं आहोत.कराल का आज आमच्या बरोबर डॉटर्स डे साजरा....."??
डोळ्यातील अश्रू वाहून देत तिने सर्वांच्या हाती हात देऊन केक कापला.
© श्री. किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment