Thursday, May 19, 2022

मुंबईकर आणि मोबाईल

मुंबईकर आणि मोबाईल
काही म्हणा पण मोबाईलवर  बोलणे ही एक कलाच आहे .  हो...! आता मला जमत नाही म्हणजे ती कलाच नाही का ...??  तुमच्यात कोणतीच कला नाही असे सौ म्हणते ते बरोबरच आहे .
जाऊ दे , उगाच विषयांतर नको . तर ...त्याचे काय झाले. मी आपला नेहमीसारखा 8.40 ची  फास्ट पकडायला घाईघाईत निघालो आणि  अण्णाच्या टपरीसमोरच मागून बाईकवाला  कट मारून गेला . समोरच्या रेणू निवासमधील  ज्युलि फर्नांडिसकडे मी बघत चाललो होतो म्हणून तो बाईकवाला मला दिसला नाही.असे भाऊ आणि विक्रम चार लोकांना दुसऱ्या दिवशी सांगणार हे नक्की.  मी अश्या फालतू गोष्टीकडे लक्षच देत नाही . पण मला कट मारून जाताना त्या बाईकवाल्याने कान आणि खांद्यामध्ये पकडलेला  मोबाईल सोडला नाही याचे जास्त आश्चर्य वाटले.
कसे जमते हो याना असे फोनवर बोलायला..?? .त्या दिवशी स्टेशनबाहेर  गोखले बाई माझ्याकडे पाहून हसत येत होत्या .च्यायला.. !  मीच की मागचा, या विचाराने दोनदा तीनदा मागे , आजूबाजूला वळून वळून पाहिले तर कोणीच नाही . मग मीही हसलो. जवळ आल्यावर लक्षात आले त्यांनी कानात पॉड टाकले होते आणि फोनवर हसत बोलत होत्या .तश्या त्या मूडमध्ये असल्यावर हसतात कधीकधी . आम्ही रोजचे प्रवासी ना ...एकमेकांकडे पाहून समजते राईट टायमात आहोत.
हल्ली स्मार्टफोनचा जमाना आलाय .माझ्याकडेही आहे म्हणा . हो..हो.. माझ्या पैश्यानेच घेतलेला  तोही हप्त्यावर .मेव्हणाने एकदा नोकियाचा बटनाचा फोन दिला म्हणून काय प्रत्येकवेळी तो देईल का ...?? 
8.40 ला नेहमीप्रमाणे उभे राहायला मिळाले .पण हल्ली पूर्वीसारखी भांडणे होत नाही .मारामारी होत नाही .एकमेकांच्या सात पिढ्या खाली येत नाहीत. जोतो स्वतः ला ऍडजस्ट करून मोबाईलमध्ये डोके खुपसून बसतो . कोणी व्हाट्सअप , कोणी चित्रपट , तर कोणी गेम खेळत बसतो. मी आपला चौथी सीट कधी कुठे मिळेल याचाच शोध घेत असतो. 
पण या घारपुरेला अजूनही फोनवर व्यवस्थीत बोलता येत नाही . आज डब्यात पावटे दिलेत आणि सॅलेड घरी विसरला म्हणून बायकोशी भांडत बसलाय फोनवर. तर तो चव्हाण बघा... चुलतसासरे वरती गेल्यावर इस्टेटीचे वाटे कसे करायचे याचे सल्ले देतोय. आख्खा डब्बा त्यांची बोलणे ऐकतोय . 
पण त्या कोपऱ्यातल्या कॉलेज तरुणावर  काही फरक पडत नाही . तो आपला स्वतःशी गालातल्या गालात हसत फोन ओठांच्या जवळ नेऊन बोलतोय. बाजूला बसलेला आमचा प्रभू कान लावून त्याचे बोलणे ऐकायचे प्रयत्न करतोय पण काहीच ऐकू येत नसेल त्याला  आणि तो म्हातारा बघा , चेहऱ्यावरील भाव पाहूनच काय बघत असेल ते कळते.
खरच फोनवर बोलणे ही एक कलाच आहे . सौ एका सुरातच सगळ्यांशी बोलत असते अगदी बिनधास्त . पण हळू आणि प्रेमाने बोलत असली की समजावे माहेरचा कॉल आहे.पोरगा बऱ्याचवेळा सांगतो हळू बोल माझे ऑनलाईन काम सुरू आहे पण काहीच फरक पडत नाही तिला . 
पोरगी इतकी  हळू बोलते की तिचे तिलाच कळत असेल की नाही याची शंका वाटते .पोरगा तर केविलवाणा चेहरा करूनच बोलत असतो.वर्क फ्रॉम होमचा परिणाम असेल. 
माझे काय म्हणता .... ?? आहो मी फक्त हो ..बरे, चालेल ,बाकी काय, इतकेच बोलतो .समोरचा संधीच देत नाही बोलायला आणि मला कोण फोन करणार म्हणा ....एक बॉस किंवा घरचेच  आता त्यांच्यापुढे कोणाची हिंमत असते का बोलायची .
 लोकल  शेवटच्या स्टॉपवर आली तरी त्या कोपऱ्यातल्या तरुणांचे बोलणे संपले नाही .चालता चालता बोलत निघाला बघा .
ओ ताई .! रस्ता ओलांडताना  मोबाईल कश्याला बघता . तो कारवाला बघा तुम्हाला शिव्या देतोय.थोडक्यात वाचलात तुम्ही. चालताना तरी मोबाईल पर्समध्ये ठेवा .
आणि हे काय ...दाते मॅडम सुट्टीवरून लवकर परतल्या .च्यायला... गळ्यातील मंगळसूत्र कुठे गेले ..?? हल्ली मोबाईलमध्ये सतत लक्ष घालून होत्या . विचारुयाच काय झाले ...?? झाले,  मानकामे घुसला सवयीप्रमाणे पुढे . अरे देवा ...सकाळी निघताना  नेहमीप्रमाणे नेकबँड घातला आणि  मंगळसूत्र काढून ठेवले आणि पुन्हा घालायला विसरली म्हणे ..
धन्य आहे तो फोन 
© श्री.किरण कृष्णा बोरकर 

No comments:

Post a Comment