Saturday, June 18, 2022

एक वटपौर्णिमा

एक वटपौर्णिमा 
मनातल्या मनात शिव्या देतच ती ऑफिसमध्ये शिरली. "कंटाळा आलाय मला या आयुष्याचा ."ती मनात पुटपुटली. "हरामखोर नवरा दिलाय देवाने मला .रात्री उपभोगायचे, सकाळी उठून पर्समधून पैसे चोरायचे आणि दारू पियाला जायचे हेच काम आहे त्याचे"
 आज सकाळी चांगलेच वाजले होते दोघांचे त्यावरून .पण भांडणाचे परिणाम तिच्या मार खाण्यात झाले होते. गालावरची बोटे दिसू नयेत म्हणून तिने दुसऱ्याही गालावर थोडी लाली चढवली होती. पण ऑफिसातील इतरांच्या नजरेतून काहिच सुटले नव्हते. 
काही हळहळले, तर काहींनी छद्मीपणे पाहिले , तर काहीच्या नजरेत लबाडपणाची सहानुभूती आली. अनेकजण या ना त्यानिमित्ताने तिच्याशी बोलून गेले. तिच्या घरी काय चालू आहे ते सगळ्यांनाच माहीत होते.
ऑफिसमधील सहकारी स्त्रियांच्या वेशभूषेकडे पाहून तिला पहिल्यांदा  आश्चर्य वाटले पण नंतर आज वटपौर्णिमा आहे याची आठवण झाली आणि ती स्वतःशीच हसली.जन्मोजमी हाच पती लाभावा यासाठीच का हे व्रत करायचे ..?? तिने स्वतः ला प्रश्न विचारला . उत्तर अर्थात तिलाच माहीत होते.
संध्याकाळी ऑफिस सुटतात ती घाईघाईने वडाच्या शोधात निघाली.
यशवंत मनोहर राज  उर्फ यमराज नेहमीप्रमाणे आज बाहेर जाण्याच्या तयारीत होते . तर चिंतामणी त्रंबक गुप्त उर्फ चित्रगुप्त  गालातल्या गालात हसत त्यांची तयारी पाहत होते.त्यांच्या या छद्मी हास्याला पाहून यमराज  चिडले."तुम्हाला हसायला काय होतंय."
"सर, आज वटपौर्णिमा. गेली कित्येक युगे फक्त आजच्या दिवशी तुम्ही  खाली जाता. हातून घडलेल्या त्या चुकीचे प्रायश्चित्त घेता का "? गालातल्या गालात हसत चित्रगुप्त म्हणाले.
"मुळात ती चूक नव्हती. तिची सत्वपरीक्षा होती  आणि त्यातूनच एक पतिव्रता स्त्री कशी असावी याचा आदर्श ठरणार होती ती. त्यानंतरच वटपौर्णिमाचे महत्व स्त्रियांना कळले आणि आपल्या पतीच्या दीर्घायुष्याची आणि सुखी संसाराची प्रार्थना होऊ लागली आणि तेच चेक करायला मी दरवर्षी यादिवशी खाली जातो." रागारागाने चित्रगुप्तकडे पाहत यमराज म्हणाले आणि आपल्या आवडत्या काळ्या बुलेटवर किक मारून हातातली साखळी बोटाने गरगर फिरवीत ते निघून गेले .
रस्त्यावरच्या वडाची पूजा करून ती घरी निघाली. वडाभोवती फेऱ्या मारताना ती स्वतःशीच विचार करीत होती. इतका काही आपला नवरा वाईट नाही . लग्न झाले तेव्हा खूप चांगला होता . तिला फुलासारखे जपत होता .गरोदर होती तेव्हा किती आनंदी होता . पण मुलगी होणार हे कळताच तो संतापला . तसेही बऱ्याच पुरुषांना पहिली मुलगी नकोच असते . हा काही वेगळा नव्हता . त्या दिवशी पहिल्यांदाच खूप पिऊन घरी आला आणि रागात दोन कानाखाली वाजवल्या त्यानंतर दुसऱ्या दिवशी दवाखान्यात घेऊन गेला आणि गर्भपात करून घेतला. दुसर्यावेळी मुलगा नक्की अशी स्वतःची समजून काढत घरी आलो. पण दुसरी वेळ आलीच नाही . मग पिणे वाढले त्यानंतर मारहाण . सतत संशय घेणे . नोकरी सुटली .पण तो आहे म्हणून सौभाग्यवतीचा आदर आहे . इतर पुरुष दूर राहतात . एक आधार आहे त्याचा नाहीतर या समाजात माझे काय झाले असते .नवरा आहे म्हणून मान आहे .असे स्वतःला समजावत ती घरी आली.
"कुठे गेली होतीस xxx "? हातातील तांब्या तिच्या दिशेने फेकत तो ओरडला .दरवाजा उघडताच समोर वेगाने येणारा तांब्या ती चुकवू शकली नाही .कपाळावर आदळताच ती खाली कोसळली .पण पडता पडता हातातील लांब छत्री तिने त्याच्या दिशेने जोरात ढकलली. गळा आवळत खाली पडताना तो तिला दिसला आणि तिचे भान हरपले.
शुद्धीवर येताच तिला समोरच्या बेडवर तो दिसला .काळ्याकुट्ट वर्णाचा , भरदार देहाचा, चेहऱ्यावर एक मिस्कील हासू ,हातातील साखळी बोटाने गरगर फिरवत तिच्याकडेच पाहत होता. 
"झाली का पूजा" ? त्याने हसत विचारले .काहीच न उमजून तिने होकारार्थी मान डोलावली. 
"आपण "? तिने कापऱ्या आवाजात विचारले. "ओळखले नाहीत का "? दरवर्षी वडाची पूजा करता त्या कथेचा मीच तो खलनायक अर्थात यमराज . आज तुमच्या घरी आलोय .चला निघुया" असे बोलून तिच्या नवऱ्याकडे नजर टाकली .
तिने ओठापर्यंत आलेली किंकाळी कशीबशी आवरली. तुम्ही याना न्यायला आलात का ? बरे झाले . घेऊन जा . सुटेन एकदाची .खूप सहन केले आता सुटका हवीय ."असे बोलून  तिने हात जोडले .
"खरंय .सुटकाच करायला आलोय.चला" असे म्हणत त्याने तिचा हात धरला.
"हे काय ? आहो मला कुठे नेताय .ते मेलेत ना ? त्यांना घेऊन जा ."ती हात सोडवून घेत ओरडली.
 "अरेच्चा, आता तर तू त्याच्यासाठी वडाची पुजा करून आलीस आणि ताबडतोब त्याला घेऊन जा म्हणतेस. स्त्रियांनी पुरुषांच्या बरोबरीने जगावे ,समाजात ताठ मानेने वावरावे यासाठी किती योजना  आम्ही या पृथ्वीतलावर आणल्या .ज्या सावित्रीने कष्ट करून आपल्या पतीचे प्राण परत आणले तितके कष्ट करून समाजात स्वतःचे स्थान निर्माण करावे याहेतूने विविध स्त्रियांचे आदर्श तुमच्यासमोर उभे केले. पण अजूनही तुम्ही आपल्या पतीचा  छळ सहन करतायत. तुम्ही त्याला कितीही शिव्या घाला पण तो तुम्हाला जवळ हवाय.त्याचा आधार तुम्हाला हवासा वाटतो.  रोज तू आपल्या पतीपासून सुटका हवीय अशी प्रार्थना करतेस पण वट पौर्णिमेला मात्र सात जन्म हाच पती पाहिजे यासाठी पूजा करतेस .कमाल आहे . म्हणूनच यावेळी तुलाच घेऊन जाणार आहे मी . तुझीच सुटका करतो .चल निघुया .असे म्हणून आपल्या हातातील साखळी तिच्या गळ्यात अडकवली .
© श्री.किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment