Saturday, July 9, 2022

पावनखिंड.....रणजित देसाई

पावनखिंड.....रणजित देसाई 
मेहता पब्लिशिंग हाऊस
आतापर्यंत आपल्याला पावनखिंड म्हटली की फक्त बाजीप्रभू देशपांडे आठवतात. छत्रपती शिवाजी महाराजांना सिद्धी जोहरच्या वेढ्यातून शिताफीने बाहेर काढून त्यांना विशाळगडावर सुखरूप पोचविण्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर होती आणि आपल्या प्राणांची आहुती देऊन त्यांनी ती पार पाडली.
पण  बाजीप्रभू देशपांडे कोण आहेत ?? त्यांचा परिवार ,त्यांची हुशारी, त्यांची दूरदृष्टी या पुस्तकात लेखकाने सांगितली आहे .
बाजीप्रभू  हे बादलांचे सचिव .महाराजांनी खलिता पाठवून बांदलाना स्वराज्यात सामील होण्याची विनंती केली.पण त्यांनी ती नाकारली . नाईलाजाने महाराजांनी रोहिडा किल्ल्यावर हल्ला केला आणि बाजींचे मन जिकले त्यांना स्वराज्याचे महत्व सांगितले. तेव्हापासून बाजीप्रभू देशपांडे महाराजांचे भक्त झाले.
बाजींच्या मार्गदर्शनाखाली जासलोक गडाची दुरुस्ती केली गेली. अफझलखानाच्या मोहिमेत त्यांनी मोलाची कामगिरी बजावली . त्यांना माणसांची चांगली पारख होती. कोणत्या जागी कोणता माणूस उपयोगी पडेल याची त्यांना जाण होती.
भीमा झुनके मावळा लंगडा होता पण झाड तोंडणीत कोणीही त्याचा हात धरू शकत नव्हता. अफझलखानच्या स्वारीत त्यांनी इतकी बेमालूनपणे झाडे कापली होती की लहान मुलांच्या धक्क्याने ही ती पडतील आणि रस्ते बंद होतील.
 सिद्धी जोहरने पन्हाळ्याला वेढा दिला तेव्हा  बाजीप्रभू देशपांड्यांनी  महाराजांना पन्हाळ्यावरून  विशाळगडावर पोचविण्याची जबाबदारी घेतली .रात्रीच्या अंधारात भर पावसात त्यांनी महाराजांना गडाबाहेर काढून विशाळगडाकडे कूच केले पण शत्रूला त्याचा सुगावा लागताच पाठलाग सुरू झाला .विशाळगड काही अंतरावर असतानाच शत्रू जवळ आला आणि त्यांना घोडखिंडीत अडविण्याची जबाबदारी बाजींनी आपल्या खांद्यावर घेतली. बाजींनी आपल्या बांदल सेनेसह सिद्धी जोहरच्या सेनेला घोडखिंडीत अडवून धरले. महाराज गडावर पोचेपर्यंत ते लढत राहिले .शेवटी तोफेचा आवाज ऐकून त्यानी प्राण सोडले.त्यांच्या पराक्रमाला वंदन करून घोडखिंडीचे नाव पावनखिंड करण्यात आले .
लेखकाने अतिशय बारकाईने आणि अचूकतेने बाजीप्रभूंचे चरित्र लिहिले आहे . महाराजांच्या निष्ठावान शिलेदाराची ही कादंबरी वाचायलाच हवी.

No comments:

Post a Comment