Wednesday, December 7, 2022

चूप

चूप
त्या कमोडवरच बसलेला त्याचा मृतदेह सापडतो. तोंड प्लॅस्टिकच्या पातळ पेपरने गुंडाळलेले.संपूर्ण अंगावर पद्धतशीरपणे वार केले होते.त्याच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती. कोणीतरी अमानुषपणे त्याला मारले होते.पण तो तर एक साधा चित्रपट समीक्षक होता.दर शुक्रवारी  प्रदर्शित होणाऱ्या नवीन चित्रपटाचे समीक्षण लिहिण्याचे काम होते त्याचे. मग त्याचा खून कोण करेल आणि का ?? खुन्याने त्याच्या कपाळावर काही स्टार कोरलेले असतात .त्याचा खुनाशी संबंध असेल का ?? 
वरिष्ठ पोलीस अधिकारी अरविंद माथूरकडे ही केस येते. काही दिवसांनी दुसऱ्या समीक्षकाचा खून होतो.त्याचे प्रेत रेल्वे ट्रॅकवर सापडते .हा नक्कीच सिरीयल किलर आहे हे पक्के होते आणि तिसऱ्या समीक्षकाचा मृतदेह किकेटच्या मैदानात सापडतो .यावेळी त्याच्या शरीराचे तुकडे अनेक ठिकाणी पसरून ठेवलेले असतात .
अरविंद माथूर आता खुन्याला पकडण्यासाठी डॉ. झेनोबीया श्रॉफ या क्रिमिनल सायकॉलॉजी तज्ज्ञ स्त्रीची मदत घेतो. तिच्या मदतीने तो संपूर्ण केसचा अभ्यास करून एक योजना बनवतो .पण तो यशस्वी होईल का ?
डॅनी एक फुल विक्रेता तरुण.बांद्रामध्ये त्याचे घर आणि फुलांचे दुकान आहे . नीला मेननला हवी असलेली ट्युलिपची फुले फक्त त्याच्याकडेच मिळतात .डॅनी गुरुदत्तचा फॅन आहे .त्याचा शेवटचा चित्रपट कागज के फूल डॅनीला फार आवडतो आणि हाच चित्रपट फ्लॉप झालाय याची सल त्याला असते. त्याचे आणि नीलाचे एकमेकांवर प्रेम आहे. अरविंद माथूरने खुन्याचे सावज म्हणून नीलाचीच निवड केलीय. उद्या काय वाईट घडले तर डॅनीचे काय होईल..??
अरविंद माथूरची संयमित भूमिका सनी देओलने छान उभी केलीय. तर मामुटीचा मुलगा दुलकर सलमान डॅनीच्या भूमिकेत शोभून दिसतो. अतिशय सहज आणि सुंदर अभिनय आहे त्याचा . श्रेया धन्वंतरी नीला मेननच्या भूमिकेत भाव खाऊन जाते .तर डॉ. झेबोनिया श्रॉफच्या छोट्या भूमिकेत पूजा भट बऱ्याच वर्षांनी दिसलीय.
या चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर गुरुदत्तचा कागज के फूल व्यापून राहतो.त्याच्या चित्रफिती ,गाणी संपूर्ण चित्रपटात आपल्या सोबत राहतात.महान कलाकार गुरुदत्त याना ती एकप्रकारे आदारांजलीच आहे .
चित्रपट कुठेही वेडीवाकडी वळणे घेत आपल्याला चकित करत नाही. उलट खुनी कोण असेल याचा अंदाज आपण फार लवकर बांधतो .फक्त तो पकडला कसा जाईल याची उत्सुकता प्रेक्षकांना असते .

No comments:

Post a Comment