Saturday, February 18, 2023

टार्गेट असद शाह

टार्गेट असद शाह....वसंत वसंत लिमये 
इंद्रायणी साहित्य पुणे
अरबी भाषेत सिंहाला असद शाह म्हणतात .
काश्मीरमधील कुपवाडा सेक्टरमध्ये पहाटे चार वाजता भारतीय लष्कराने दहशतवाद्यांविरुद्ध एक मोहीम राबिवली .त्यामध्ये सर्व दहशतवादी मारले गेले .लष्कराला त्यांच्याकडे दोन मोबाईल  मिळाले.कॅप्टन अजयचे त्यातील एका मोबाईलवरचा मेसेज वाचून डोळे फिस्करले . असद शाह को गुलशन दिखाना है असा तो मेसेज होता .
शिलॉग येथील आसाम रायफल्सच्या मेजर मोहंतीला एका खबरीने फोन केला .शस्त्रांस्त्राची मोठी कंसाईनमेंट इंफाळ जाणार आहे .भारत आणि म्यानमार सीमेवर तामु गाव असून शेजारीच मोरे ही भारतातील मोठी बाजारपेठ आहे. ती गाडी याच मार्गाने जाणार होती. पहाटे चार वाजता मेजर मोहंतीने त्या वाटेवर आपल्या तुकडीसमवेत सापळा लावला.त्या हल्ल्यात त्यांचा एक साथीदार मारला गेला तर  सर्व दहशतवादी मारले गेले. त्या गाडीतून अमाप शस्त्रे हाती लागली. मेजरला दहशतवाद्यांकडून मोबाईल सापडले.त्या मोबाईल वर असद शाह को गुलशन दिखाना है हा मेसेज होता.
पीएमओ ऑफिसमधून  या मोहिमेला ऑपरेशन कवच कुंडल हे नाव दिले गेले आणि सगळी जबाबदारी ले.कर्नल पिनाकीन नारायण गद्रे  उर्फ गम्बो या हुशार अधिकाऱ्यावर सोपविण्यात आली .
कबीर राजाध्यक्ष  पुण्यातील एक तरुण सॉफ्टवेअर इंजिनियर आणि छोट्या आयटी कंपनीचा मालक .तो भारतीय सैन्याचा डिफेन्स कॉन्ट्रॅक्टरही आहे . त्याच्या वडिलांचा नानासाहेब राजाध्यक्षचा पाच वर्षांपूर्वी काही अज्ञात मारेकऱ्यांनी गोळ्या झाडून खून केला होता. त्यांचा शोध अजूनही लागला नाही. त्याने सैन्यदलासाठी नुकतेच एक सॉफ्टवेअर विकसित केले होते आणि त्याचा डेमो दाखविताना आपल्या मशीनद्वारे ऑपरेशन कवचकुंडल हॅक केले .
त्याच्या प्रामाणिकपणाची परीक्षा घेऊन गम्बोने त्यालाही ऑपरेशन कवचकुंडलमध्ये सामील करून घेतले.
आता एक संपूर्ण टीम असद शाहच्या मेसेजची पाळेमुळे खणून काढण्यास सिद्ध झाली .पण सुरवात कुठून करायची ??? 
लॉक ग्रीफिन आणि विश्वस्त प्रमाणेच एक गुंतागुंतीची थरारक कादंबरी वसंत वसंत लिमयेनी आपल्यासमोर सादर केलीय.
लेखकाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी प्रत्येक गोष्टीचा खोलवर अभ्यास केलेला दिसतो.भारतीय सैन्यदलाची माहिती.त्यांची युनिट्स, अधिकाऱ्यांचे ऑफिस, घर याची अतिशय तपशीलवार माहिती त्यांनी दिलीय.इतकेच नव्हे तर अत्याधुनिक कॉम्प्युटर प्रणाली ,वापरण्यात येणारे सॉफ्टवेअर आणि त्यांची टेक्निकल नावे यासर्वविषयी अचूक ज्ञान त्यांना आहे . 
ऑपरेशन कवचकुंडल यशस्वी होईल का ? असद शाह को गुलशन दिखाना है या मेसेजचा अर्थ शोधून काढून त्यावर काय कारवाई होईल.?? गम्बो आणि त्याची टीम या प्रकरणाचा कसा छडा लावतात हे वाचणे खरोखरच उत्कंठावर्धक आहे .

No comments:

Post a Comment