Tuesday, February 14, 2023

एका लेखकाचा मृत्यू

एका लेखकाचा मृत्यू 😀
संतोष दिघेला उदास चेहऱ्याने घरात शिरताना पाहून मी आश्चर्यचकित झालो.जवळचे कोणी गेलंय असाच त्याचा चेहरा होता.पण तो आमच्याशिवाय जवळचे कोण मानीत नाही.
 तो नाईलाजाने आणि गरजे पुरता आम्हाला जवळचे मानतो असे सौ. म्हणते . अर्थात त्यावर चर्चा करून मी माझा अपमान कधीच करून घेत नाही आणि उगाच या दिघ्यावरून वाद करायला आम्हाला वेळ नाही .
तरीही नेहमी भाऊ .! अशी आरोळी ठोकून घरात प्रवेश करणाऱ्या दिघेचे हे वेगळे रूप पाहून मी घाबरलो.माझ्या खिश्यात नक्की किती रक्कम आहे हे आधी आठवून पाहिले आणि ती न देण्यासाठी मी वेगवेगळी कारणे शोधून ठेवली.
"अरे मित्रा संतोष ये रे ...मी उसने अवसान आणून म्हणालो. "ही बाहेर गेलीय, त्यामुळे चहा काही बनला नाही आपण ती आल्यावर बाहेर जाऊन पिऊ.
इतक्यात सौही मागोमाग घरात शिरली . स्वयंपाकघरात शिरता शिरता तिने संतोषकडे जो तीव्र कटाक्ष टाकला ते पाहून मी चरकलो.
" देवा काही खरे नाही .या दिघ्यामुळे मीही शिव्या खाणार हे नक्की."
"भाऊ कसा आहेस "? थकलेल्या स्वरात दिघेने विचारले.
"आतापर्यंत उत्तम होतो .तू आलास आणि समीकरणे बिघडली" असे स्वयंपाकघरात पाहत हसत म्हटले.
"तुझ्या या विनोदावर हसायची इच्छा नाही माझी" संतोष पडलेल्या आवाजात म्हणाला.
"हरामखोर ,सुंभ जळाला तरी पीळ जात नाही" मी मनात म्हटले.
"हल्ली काय नवीन लिखाण ?? मालिका ??"मी विचारले.काहीतरी विचारायला हवेच.
"काही नाही भाऊ.सध्या बेकारच आहे" तो दीर्घ श्वास घेत म्हणाला . बोंबला म्हणजे मला फटका .
"लोकांना फसविले तर त्यांची हाय लागणारच "आतून आवाज आला आणि मला पुढील धोक्याची सूचना मिळाली.
"काय रे ? काय झाले ?"मी काही न समजून विचारले .
"ते काय बोलतील ?? तोंड आहे का बोलायला ?? सौ तरातरा बाहेर आली ."त्या दिवशी एका सिरीयलच्या शूटिंगला घेऊन गेले .कोणाच्या तरी मृत्यूचा सिन होता .मी नायिकेच्या खांद्यावर हात टाकून तिला समजावते मग फोटोला पाया पडून बाहेर पडते असा सीन होता .."
"अरे हा तर तुझा आवडता सीन. कितीतरी जणांना तू हाक मारायला जातेस" मी कौतुकाने म्हणालो.
"मान्य, पण काही दिवसांनी जो भेटेल तो बोलतो.वहिनी हल्ली बऱ्याच सिरीयल मध्ये दिसता ते ही मृत्यूच्या सीन मध्ये .फेमस झालात हो हाक मारण्यात .." सौ संतोषकडे बघत चिडून म्हणाली 
"अरे किती सिरीयल मध्ये आहेस तू आणि कधी करतेस शूटिंग?? पैसे देतात की नाही वेळेवर ??" मी ताबडतोब प्रश्नांची फैर सुरू केली.
"गप्प बसा हो! हेच ओळखले का मला ? या तुमच्या मित्राला विचारा काय खरे आहे ते ?" सौ चिडून म्हणाली.
" दिघ्या ही काय भानगड ? "सौला कोणी फसवावे ही गोष्टच मी सहन करू शकत नाही.
"अरे भाऊ ! सध्या हेच तर चालू आहे मराठी मालिकेत .सगळ्या सिरीयलमध्ये लग्न सोहळे ,अपघात,मृत्यू, चालू आहेत.त्या दिवशी तीन मालिकेत मृत्यूची घटना होती.यांनी वाहिनीचा तो सीन घेऊन विडिओ एडिटिंग करून बाकीच्या मालिकेत वापरला .अजून काही मालिकेत वापरता येईल " संतोष चिडून म्हणाला .
"अरे देवा म्हणजे मालिकेत आता स्टोरी कथा हा प्रकारच शिल्लक राहिला नाही का ?"मी आश्चर्याने विचारले.
"छे रे ! उठबस हल्ली एकाच टाईपच्या कथा पाहिजे त्यांना .नायिका सोज्ज्वळ सालस सगळ्याना मदत करणारी ,दुष्टांवरही दया करणारी त्यांना माफ करणारी ,त्याग करणारी हवीय .तिला एक हतबल बाप किंवा सतत रडणारी आई हवी .तसेच तिला चार पाच बेकार भावंडे हवी .दुष्ट नणंद किंवा दिर हवा .पन्नास एपिसोड तरी  तिच्यावर छळ हवा .तिचे कोणतेच काम कमीत कमी वीस एपिसोड तरी पूर्ण झाले नाही पाहिजे.पण ती फक्त दोन एपिसोडमध्ये सत्य शोधून काढून सगळ्यांना माफ करायला पाहिजे म्हणजे पुढील पन्नास एपिसोड तिच्याविरुद्ध कट कारस्थान दाखविता आले पाहिजे.अशी निर्मात्यांची मागणी आहे .भरीस भर म्हणून मालिकेत बाल कलाकार हवेत .त्यांना तुझे आई किंवा बाबा किती दुष्ट आहेत आणि कशी कटकारस्थाने करायची याची शिकवणी द्यायची ."संतोषचा राग बाहेर पडत होता.
त्याला कमीतकमी चहा पाजावा या अपेक्षेने मी सौ.कडे पाहिले .पण तिचा चेहरा पाहून मला रात्रीचे जेवण मिळेल का याची खात्री वाटेनाशी झाली आणि चहाचा विचार मी ओठावर येऊ दिला नाही.
"पण दिघ्या तू काहीतरी वेगळे लिहू शकतोस ?" मी त्याचे मनोबल वाढविण्याच्या उद्देशाने म्हटले.
"मी लिहिलेला एक सीन होता .दिघेने सुरवात केली ,नायिकेला लग्नाच्या दिवशी पळवून नेले जाते आणि  दिर तिच्यावर हात उचलतो . यामागे तिचा सासराच असतो .पण ती हुशारीने सुटका करून लग्नमंडपात हजर राहते .त्यानंतर ती एका खोलीत सगळ्या दुष्ट लोकांना बोलावून कानउघडणी करते. मी फक्त ती चिडून सासऱ्याच्या कानाखाली मारते असा सीन लिहिला."संतोष रंगात येऊन म्हणाला. 
" देवा..! मी कपाळावर हात मारला 
"अरे हल्लीची नायिका अशीच हवी .का तिने इतका अन्याय सहन करायचा ?.पण निर्मात्याला आवडले नाही आणि मला डच्चू मिळाला ".रडवेल्या चेहऱ्याने संतोष म्हणाला .
"जाऊ दे भाऊ ,हे आपले क्षेत्र नाही .मी पुन्हा त्या नेहमीच्या शृंगार कथा लिहितो .माझे टॅलेंट तिथेच लागते बघ" तो जोशात म्हणाला 
म्हणजे हा पुन्हा त्या रेल्वे ब्रिजखाली मिळणाऱ्या पिवळ्या पुस्तकात लिहिणार तर .मी मनात म्हटले  खरे आहे शेवटी वळणाचे पाणी वळणावरच जाणार हे विक्रम म्हणतो ते खोटे नाही .
मी मुकाटपणे त्याला चहा पाजायला बाहेर घेऊन गेलो.
© श्री.किरण कृष्णा बोरकर 

No comments:

Post a Comment