Wednesday, March 8, 2023

महिला दिन

महिलादिन
ती संध्याकाळी रोज प्लॅटफॉर्मवर भेटणारी. मला पाहून हसणारी .दिवसभर स्टेशनवर उभे राहून सतत सावधपणे सगळीकडे लक्ष ठेवून अडलेल्याना मदत करायला तत्पर असणारी पोलीस इतकी प्रसन्न कशी राहू शकते ??
ती सकाळी रस्त्यावर झाडू मारून कचरा काढणारी. एका कोपऱ्यात तिचे लहान मूल तिच्याकडे बघतय.त्याच्या शेजारी पाण्याची बाटली आणि खुळखुळा .एक डोळा त्याच्यावर आणि एक डोळा रस्त्यावर चालणाऱ्या माणसांवर ठेवून ती संपूर्ण रस्ता कसा झाडू शकते.ते ही सतत आडवे येणाऱ्या व्यक्तींसाठी थांबत हातातील झाडू त्यांच्या पायात येऊ नये याची काळजी घेत ...??
ती रात्रभर आय सी यू वॉर्ड ला .सरकारी हॉस्पिटलचे आय सी यू म्हणजे पन्नास ते साठ पेशंट. प्रत्येक पेशंटला दर तासांनी चेक करायचे .पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे ती फिरत असते.पेशंट रोज किमान दोन मृत्यू तिच्यासमोर होतात. पेंगुळेल्या अवस्थेत ती घरी पोचते आणि मुलांची तयारी करते .त्यांना शाळेत सोडताना तिचा चेहरा इतका प्रसन्न कसा ??
यावेळी बीएसएफ च्या स्पेशल तुकडीत तिची निवड झाली .गेली तीन वर्षे ती या तुकडीत निवड होण्यासाठी खडतर प्रयत्न करत होती. दोन वर्षे झाली घराचे तोंड पाहिले नव्हते तिने.आता ती सीमेवर जाणार होती जिथे फक्त बर्फ होता .पण मायभूमी चे असे रक्षण करण्याची संधी प्रत्येकालाच मिळत नाही .यातून सुखरूप परत येऊ याची खात्री नसतानाही तिने हसत हसत हे आव्हान स्वीकारलेच कसे ?
जिथे अन्याय होतोय तिथे जाऊन ती लढायची.आज इथे तर उद्या तिथे.कपड्यांची शुद्ध नाही.खाण्यापिण्याची शुद्ध नाही.भर उन्हापावसात उभे राहून अन्यायाविरुद्ध घोषणा द्यायच्या .विजय मिळाला की समोरच्याला नमस्कार करून दुसरीकडे पळायचे. ह्या बाईला घर दार कुटुंब आहे की नाही .पण सतत आजूबाजूची गर्दीने तिला याची जाणीव कधीच करून दिली नाही .
या सर्व आपल्या आजूबाजूला आहेत .फक्त आपण त्यांच्याकडे फारसे लक्ष देत नाही. हरकत नाही . रोज नाही पण कधीतरी त्यांच्या कर्तुत्वाला सलाम करू .
महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐

© श्री.किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment