Monday, March 27, 2023

दराज

काही महिन्यांपूर्वी अचानक नाविद इनामदारचा मला फोन आला "दादा घरी येतोय सगळ्यांना भेटायला .मी ही नेमका घरी होतो .नाविद इनामदार म्हणजे बाबांचा आवडता शिष्य .अकॅडमी ऑफ थिएटर आर्टस् च्या  पहिल्या बॅचचा विद्यार्थी. 
मुंबई युनिव्हर्सिटीने पहिल्यांदाच अकॅडमी ऑफ थिएटर आर्टस् सुरू करून नाट्यविषयक अभ्यासक्रम सुरू केला होता.  पद्मश्री प्रो. वामन केंद्रे प्रमुख होते आणि त्यांनी माझे वडील कै. कृष्णा बोरकर याना रंगभूषेचे प्रशिक्षण देण्यासाठी आमंत्रित केले होते.त्यानंतर बाबा जवळजवळ दहा ते बारा वर्षे अकॅडमी ऑफ थिएटर आर्टसशी संबंधित होते.
नाविद इनामदार आणि बाबांचे चांगलेच ट्युनिंग जुळत होते.नाविद हा हरहुन्नरी कलाकार.केवळ अभिनय या गोष्टीवर अवलंबून न राहता बाकीच्या क्षेत्रात ही आवडीने लक्ष घालत होता. तो एक चांगला कवी आहे .उत्तम लिहिणारा आहे. एक हुशार आयोजक आहे.
 पु.ल.कला अकादमीमध्ये होणारे बरेचसे कार्यक्रम तोच आयोजित करतो . तसेच सांस्कृतिक कार्य संचनालयाच्या सहकार्याने महाराष्ट्रभर हौशी राज्य नाट्यस्पर्धाही आयोजित करतो. 
पण त्याला अजून काहीतरी करायचे होते. आपली स्वतंत्र ओळख व्हावी असे त्याचे स्वप्न होते आणि त्यासाठीस त्याचे प्रयत्न चालू होते.
त्या दिवशी तो घरी आला आणि त्याच्या पुढच्या प्रोजेक्टची माहिती आम्हाला दिली.त्याला चित्रपट बनवायचे होते पण त्या आधी एक शॉर्ट फिल्म बनवायची होती आणि त्याचा मुहूर्त त्या दिवशी रविंद्र नाट्य मंदिर म्हणजेच पु. ल.देशपांडे कला अकादमीमध्ये होणार होता.त्यापूर्वी बाबांचे स्मरण आणि आईचे आशिर्वाद घेण्यासाठी तो घरी आला होता. माझी शॉर्ट फिल्म पूर्ण झाली तर नक्कीच तुम्हाला सर्वाना यावे लागेल असा प्रेमळ आग्रह करून तो बाबांच्या फोटोला नमस्कार करून बाहेर पडला.
काल रविवार 26 मार्च ला रविंद्र नाट्य मंदिरच्या मिनी थिएटरमध्ये त्याच्या 'दरज' या शॉर्ट फिल्मचा खाजगी शो आयोजित करण्यात आला होता.त्याने दोन तीन वेळा मेसेज पाठवून आग्रहाचे आमंत्रण दिले .त्या वेळी झालेल्या कार्यक्रमात पद्मश्री प्रो.वामन केंद्रे आणि कुटुंबीय ,सुप्रसिद्ध नाटककार शफाअत खान , कला अकादमीचे संचालक श्री.रोकडे ,माजी संचालक आशुतोष घोरपडे हजर होते.त्यावेळी केलेल्या भाषणात नाविद इनामदारने बाबांची आठवण काढली आणि मलाही स्टेजवर बोलावून बाबांच्या वतीने सत्कार केला .
हा आमच्या कुटुंबाच्या दृष्टीने खूप आनंदाचा क्षण होता.बाबांना जाऊन आता सहा वर्षे होतील पण अजूनही त्यांचे काही शिष्य आठवणीने वेळात वेळ काढून घरी येतात त्यांच्या नावाने कार्यक्रम करतात .
नाविद तुझ्या या शॉर्ट फिल्मला भरघोस प्रतिसाद लाभो आणि यापुढे तुला चित्रपटक्षेत्रात खूप यश मिळो यासाठी बोरकर कुटुंबियांच्यातर्फे खूप खूप शुभेच्छा .
असाच मोठा हो यशस्वी हो.
© श्री.किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment