Tuesday, October 25, 2016

परदेश

छानपैकी आडवा पडून पेपर वाचत होतो तेवढ्यात अचानक बंड्याचे वडील आता शिरले. चेहरा पाहूनच लक्षात आले बंड्याने काही नवीन भानगड केली आहे.

सौ. ना चहाची ऑर्डर देऊन सरळ विचारले 'बोला काका, काय नवीन ??  ते वैतागूनंच म्हणाले," त्या बंड्याला समजवा, परदेशातली नोकरी चालून आली आहे. चांगला पगार, फुकट जेवण, राहायला जागा, आणि येण्याजाण्याला गाडी. पण हे आमचं कार्ट नाही बोलतंय. आता तुम्हीच समजवा त्याला. पोराला पोटाला चिमटा  काढून शिकवले, ते काय हेच बघण्यासाठी का ?? त्याच्या लहानपणापासून हे एकच स्वप्न उराशी बाळगलं, की ह्याचं सगळं चांगलं व्हावं. आणि आता जेव्हा समोरून चांगलं भवितव्य दारावर टकटक करतय तर हा दारच उघडायचं नाही म्हणतो. माझं तर डोकंच काम करत नाही."

माझ्या लक्षात आले काय घडले ते. प्रत्येक आई वडिलांना आपल्या मुलाची प्रगती बघायची असते. मी बाबांशी सहमत होतो म्हणून त्यांना सांगितले बोलेन बंड्याशी. रात्री जेवण  झाल्यावर निरोप दिला "खाली ये"  तो अर्ध्या तासात हजर झाला. "काय रे बंड्या ?? काय चालू केलेस तू ? परदेशातील नोकरी नको का म्हणतोस? अरे तुला शिकविण्यासाठी काय काय केले बाबांनी माहित आहे ना तुला ? मग आता हि सोन्याची संधी का सोडतोस??" बंड्याने दोन फालुदा ऑर्डर केले, माझ्या खांद्यावर हात ठेवून हसला आणि म्हणाला बाबांची बाजू ऐकलीत? आता माझं म्हणणं ऐका.

"भाऊ पहिली गोष्ट म्हणजे मला जे काही तिथे मिळणार आहे त्यापेक्षा डबल मेहनत ते माझ्याकडून करून घेणार. मग ज्या देशाने मला शिक्षण दिले, संस्कार दिले त्या देशासाठी मी मेहनत का करू नये? मला मान्य आहे कि तिथे मला सर्व काही माझ्या गरजेपेक्षा जास्त मिळते आहे, मग मला जेवढी गरज आहे तेव्हडे मला इथे मिळत असेल तर मी तिथे का जावे ?? दुसरी गोष्ट, तुम्हीच म्हणता ना बाबांनी खूप कष्ट करून मला शिकवले मग आज त्यांच्या कष्टाचे फळ मी त्यांना परदेशात नोकरी करून देऊ का? लहानपणापासून माझ्या प्रत्येक गरजेला ते माझ्यासाठी माझ्यासोबत होते, अजूनही आहेत मग त्यांच्या उतारवयात मी त्यांचा आधार बनू की त्यांना सोडून माझे सुख शोधायला जाऊ?? गाडी तर मी इथेही घेईन भले ती छोटी असेल पण त्यातून फॅमिलीला फिरायला तरी घेऊन जाईन. भले इथे घर जरा छोटं असेल पण मी माझ्या माणसांसोबत असेन. इथे नुसतं खुट्ट झालं तरी सर्व आपलेपणाने धावत येतात परदेशात कोण येईल. रोज रात्री लेट आलो तरी घरी जेवायला मिळते, आई झोपेतून उठून काय हवे नको ते बघते तिथे कोण विचारेल मला?" आणि मी तिथे खोर्यानी पैसा कमवून आई-बाबांच्या आजारपणात त्यांच्या गरजेला त्यांच्याजवळ नसलो तर काय करू त्या पैशाचं??? इतके बोलून बंड्या थांबला.

मीही विचारात पडलो पण मध्यमवर्गीय सुखाची कल्पना मला सोडवेना. परदेशात नोकरी हे बहुसंख्य तरुणांचे स्वप्न, त्यासाठी तर प्रयत्न करीत असतात सगळेच. तरीही "बंड्या हे स्पर्धेचे युग आहे अंतीम ध्येय गाठाण्यासाठी सगळेच जिवाच्या आकांतानी धावत असतात, अधिक पैसे कोणाला नको आहे?? आज माझेही बरेसचे मित्र परदेशात आहेत त्यांना हा प्रोब्लम नाही" मी माझेच घोडे पुढे दामटवले."
हो भाऊ कबूल आहे शेवटी हा प्रत्येकाचा प्रश्न आहे. मला माझ्या फॅमिली बरोबर राहायचे आहे त्या शर्यतीत भाग घ्यायची माझी इच्छा नाही. आरामात काम करू जो वेळ मिळेल तो कुटुंबियांबरोबर घालवू. त्यांना संपूर्ण भारत फिरवायची माझी इच्छा आहे. बिचारे आमचे सर्व करता करता गाव सोडून कुठेही गेले नाहीत.तर आता आमच्या बरोबर फिरतील. मला यापुढे काही सुचेना. ते पटतही  होतं, पण सुवर्णसंधी जात्ये याचा खेदही वाटतं होता. शेवटी म्हटले "ठीक आहे, तुला जे योग्य वाटते ते तू कर मी सांगेन तुझ्या बाबांना. शेवटी तू विचार करूनच निर्णय घेतला असशील. "असे बोलून आम्ही निघालो.

घराखाली येताच बंड्या म्हणाला "भाऊ दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे,वृद्धाश्रमातील अनाथ लोकांचे अंत्यसंस्कार करायला जाणारा मी,  उद्या माझ्याच घरातील लोकांच्या अंत्यसंस्काराला हजर राहू शकलो नाही तर कधी सुखाने झोपू शकेन का???"

मी सुन्न.........

No comments:

Post a Comment