Friday, October 7, 2016

कर्तव्य

टेबलावरचा इंटरकॉम उचलला आणि विपुलला कॅबिनमध्ये बोलावून घेतले.विपुल वर्षभरपूर्वीच आमच्याकडे ज्युनियर इंजिनियर म्हणून जॉईन झाला होता. आम्ही फॅक्टरीच्या मेन्टेनन्स विभागात काम करतो. तो आत येऊन समोर बसला "विपुलशेठ ,मी गमतीने बोललो " चला दसरा दिवाळी आली, आता थोडी मोठी कामे काढा मेन्टेनन्ससाठी". विपुल  तोंडातून शब्द काढेना. "काय झाले??" थोडा आवाज चढवून विचारले मी. "काही नाही सर, पण यावर्षी मी दसरा आणि दिवाळीला कामावर येणार नाही". "का ???" माझा पारा हळू हळू चढू लागला. आम्हाला हि सण नाही का?"  प्रत्येक सण फॅक्टरीत साजरा करू का?"   त्यानेही आवाज थोडा चढविला. काय मिळते येवून ?? सगळे घरी मजा मारतात, फॅमिलीबरोबर सण साजरा करतात आणि आम्ही आपले इथे पडीक. बरं एवढं करून काही एक्सट्रा फायदा मिळेल तर तेही नाही. घरी बायकोच्या शिव्या मिळतात त्या वेगळ्या"  तो पोटतिडकीने बोलत होता. "मग बाळा कशाला आलास या क्षेत्रात? साधी सरळ पदवी घेऊन कारकुनी करत बसायचे ना?? नाहीतर अजून जास्त शिकून आमच्या डोक्यावर येऊन बसायचे, आणि उठता-बसता आमची मारायची होती" मी अस्सल आमच्या मेन्टेनन्स भाषेत बोललो. आता काही क्षणातच कॅबिनचे रण क्षेत्रात रूपांतर होणार होते हे नक्की. पण तो सावरला, आणि नरमाईच्या सुरात म्हणाला ,"तसे नाही सर, पण मलाही सोशल लाईफ आहे " मीही शांत झालो. मनात म्हटले बायकोने तासलेले दिसतेय याला, आणि हसू आलं मला. कारण माझे ते तरुणपणीचे दिवस आठवले. मीही तेव्हा चिडायचो,कंटाळायचो अशा सुट्टीच्या दिवशी कामावर यायला, पण नंतर कळू लागले कि आपण जे करतोय त्यामुळे आपल्याच लोकांचा, कंपनीचा फायदा होतोय. मी हे विपुलला समजावले. "हे बघ विपुल असे प्रत्येकजण बोलू लागले तर या देशाला, समाजाला सर्विस कोण देणार ? पाणी पुरवठा करणारे सुट्टी घेऊ लागले तर या दिवशी पाणी कोण देणार, फायर ब्रिगेड वाले सण म्हणून सुट्ट्या घेऊ लागले तर आग विझवायला कोण जाणार? देशाच्या सीमेवर कोण उभे राहील जर दिवाळीला सैनिकांना सुट्टी दिली तर ?? अनंत चतुर्थीला पोलिसांना सुट्टी दिली तर बंदोबस्त कोण पाहिलं,? कायदा सुव्यवस्था कोण सांभाळेल ??" त्याला बसवले आणि शांतपणे सांगितले " हे बघ मित्रा, तू जे हे क्षेत्र तुझ्या मनाने निवडले आहेस तर प्रत्येक परिस्थीतीला हसतमुखानी सामोरं जायची तयारी ठेव. असा त्रागा करुन काही साध्य होत नसतं. जो पर्यंत तू या क्षेत्रात राहशील तो पर्यंत तुला जे आहे ते स्वीकारावे लागेल. उद्या तू आला नाहीस तर कामे थांबणार नाहीत, मी येऊन काम करेन. पण तू त्यात नापास होशील. विपुल बर्यापैकी शांत झाला होता. कॅबीनमध्ये येतना कपाळावर आठ्या घेऊन आलेला तो जाताना स्मितहास्य घेऊन गेला.

No comments:

Post a Comment