Sunday, April 1, 2018

डान्स

घरात हसतहसत शिरलेल्या विक्रमकडे पाहूनच मी समजून गेलो ह्या माणसाच्या डोक्यात काहीतरी शिजतेय.त्याने नजरेनेच मला बाहेर निघायची खूण केली. सौच्या रागीट नजरेकडे लक्ष न देता आम्ही बाहेर पडलो.
नटराजमध्ये नेहमीच्या टेबलवर बसताच विक्रमने एक विडिओ क्लिप मला दाखविली .त्या क्लीपमध्ये वहिनी आपल्या दिराच्या लग्नात नाचत नाचत त्यांना स्टेजवर घेऊन येते अशी होती.
" हे बघ .....आता ती बाई मस्त नाचते हे सांगू नकोस. या पेक्षा कितीतरी सुंदर नाचणाऱ्या बायका आपण पहिल्या आहेत".. मी विक्रमवर खेकसलो.
"च्यायला ...!! भाऊ ....प्रत्येकवेळी बाईबद्दलच बोलायला पाहिजे का.... ?? विक्रम चिडून बोलला.
त्याचे चिडणे पाहून मला बिलाची काळजी वाटू लागली आणि मी नरमाईच्या सुरात म्हटले ,"ठीक आहे बोल...
"अरे भाऊ ...आता ही नवीन पद्धत चालू झाली आहे . नवरानवरीला वेगवेगळ्या पद्धतीने स्टेजवर घेऊन येणे . आपल्या वेळी असे काही होते का ...??? वाहिनीचा हात हातात घेऊन स्टेजवर येताना तुला किती घाम फुटला होता.दोनवेळा हात झटकून टाकलास.आठवण काढली की अजूनही वहिनीचा चेहरा रागाने फुलतो"..विक्रम हसून म्हणाला.
"पुरे ...पुरे... मुद्द्याचे बोल .मी वैतागून म्हणालो.
"अरे या पुढे प्रत्येकाला नाचावे लागेल .तुला आणि वहिनीला ही मुलांच्या ,पुतण्याच्या लग्नात असेच नाचावे लागेल .विचार कर . विक्रम एखादी कडू गोळी  तोंडात घेतल्यासारखे बोलू लागला.
"ठीक आहे ना.... ?? करू नाच ..त्यात काय "?? मी सहज म्हणालो.
"भाउ तो विसर्जनाच्या मिरवणुकीतला नागीण डान्स नाही करायचा आहे .दोन पेग पोटात गेल्यावर करतो तो. शेकडो लोक बघत असतात आपल्याला . व्यवस्थित डान्स केला पाहिजे" विक्रम कुजबुजला.
"आयला ....म्हणजे तुझ्या डोक्यात काहीतरी प्लॅन आहे म्हणजे.."मी दचकून म्हणालो .
"होय तर.....  हातावर टाळी देत विक्रम उत्साहाने म्हणाला आणि बिलाची काळजी मिटली म्हणून मीही खुश झालो .
" हे बघ भाऊ ....आपण सर्व कॅटरर्सकडे जाऊ आणि डान्स शिकवायला आमच्याकडे शिक्षक आहेत असे सांगू . आपण वेगवेगळ्या ग्रुपला नवरानवरी समोर डान्स करायला लावू.थोडक्यात नवरानवरी स्टेजवर येताना आधी त्यांच्या फॅमिलीचीही ओळख होईल . उदा. प्रथम नवरानवरीचे छोटे भाचे ,पुतणे नाचत येतील. मग भाऊ बहीण,मग काका काकी ,मामा मामी ,शेवटी आई वडील .यांच्या मागून नवरा नवरी येतील.म्हणजे कसे एक इव्हेंट होईल तो . त्यातही कोणाचे जुळले तर फायद्याचे आहेच ना".
" अरे पण सर्वांनाच नाचायला येते का .. पुढच्या महिन्यात दिनूच्या मुलाचे लग्न आहे . दिनूचा पायाचा प्रॉब्लेम आहे ,तो नाचायला लागला की सर्व हसू लागतात . अश्यांचे कय करणार तू .."?? मी न चिडता विचारले .
"त्यासाठीच तर शिक्षक ठेवायचे ना ..!! हे बघ ..लग्न ही सहा महिने आधीच ठरलेली असतात . आणि हल्ली सगळी तयारी हॉलवर कॅटरर्स करतो.खरेदीही ऑनलाइन होते . पत्रिका कोण वाटत फिरत नाही . व्हाट्स अप वर आमंत्रण दिली जातात . आपण महिनाभर आधी त्यांना डान्स शिकवायला बोलवायचे . त्यांच्या शरीर आणि वयोमानानुसार त्यांना डान्सच्या काही स्टेप शिकवायच्या . पाहिजे तर आपले शिक्षक घरी जाऊनही त्यांच्या सोयीनुसार शिकवतील . कॉन्ट्रॅक्टरशी आधीच डील करून घेऊ त्याला किती आपले किती .  लग्न आहे लोक खर्चाला मागे पुढे बघसत नाहीत . आणि हो नवरा नवरीला ही नाचत नाचत स्टेजवर यायला सांगू .  त्यानापण आपले लग्न एन्जॉय करू दे की .  लग्न एकदाच होते आयुष्यात . आठवणीत राहण्यासाठी ते काहीही करतील".विक्रमच्या चेहऱ्यावर तर उत्साह ओसंडून वाहत होता.
समोरून बिल घेऊन येणाऱ्या वेटरला बघत मी म्हणालो"विकी तू दूरदृष्टी असलेला माणूस आहेस . तुझ्या डोक्यातून कधी काय निघेल सांगता येत नाही. तुझ्यासारखा मित्र माझ्या आयुष्यात आहे म्हणून स्वतःला भाग्यवान समजतो मी". असे ऐकताच त्याने वेटरच्या हातातील बील झडप मारून हातात घेतले आणि खिशातून कार्ड काढून त्याला दिले.
"बसक्या भाऊ.... तुझ्याशिवाय कोण माझे ऐकते का ..?? चल निघुया .उद्यापासुन या नवीन बिझनेस ला सुरवात करतो.आणि हो आपण नवरा नवरीला स्टेजवर किस करायला लावले तर ?? निघता निघता भाबडेपणाने विक्रमने मला प्रश्न केला .मी काही न बोलता हात जोडले .
© श्री. किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment