Wednesday, May 30, 2018

जमाना बदल गया

गेले काही दिवस ती फार अस्वस्थ होती.अर्थात सिंगल पॅरेन्ट असणे किती कष्टदायक असते याची तिला माहिती आणि अनुभव होताच. सोसायटीतील वॉचमनपासून ते ऑफिसमधील सहकाऱ्यांपर्यंतच्या नजरा ती ओळखून होती.सोनूलीही आता मोठी होतेय. तिचीही काळजी होतीच.
फेसबुकवर रोज तिला रिक्वेस्ट यायच्या.बहुतेक करून पुरुषच असायचे. मेसेंजरही नेहमी चालूच असायचा .याना कसे कळत असेल ही एकटी आहे ...?? विरंगुळा म्हणून ती फेसबुक ,व्हाट्स अप वापरायची. कधी कधी काही पुरुषांशी गप्पाही मारायची.शेवटी तीही एक स्त्री होतीच .किती दिवस सहन करेल.
असाच एक मेसेंजरवर भेटला . पहिल्यांदा खूपच सभ्य वाटला . हळू हळू बोलणी वाढू लागली .एकमेकांची माहिती देवाणघेवाण झाली . पण नंतर त्याचा बोलण्याचा ट्रॅक बदलू लागला . थट्टा मस्करी वाढू लागली .तरीही तिने फारसे लक्ष दिले नाही . मग द्विअर्थी बोलणे चालू झाले. तिने एक दोनदा आवडत नसल्याची हींट दिली पण त्याने लक्ष दिले नाही .गेले महिनाभर तिने त्याच्याशी बोलणे टाकले . फक्त गुड मॉर्निंग/ गुड नाईट चे मेसेज . परत  त्याने माफी मागितली आणि नेहमीसारखे पुन्हा बोलणे सुरू झाले.
पण परवा त्याने विचित्रच मागणी केली . अर्थात कधी न कधी अशी मागणी येणार हे अपेक्षित होतेच. तिने सरळ नकार दिला . मग त्याची विनवणी सुरू झाली . कमीत कमी तुझे फोटो तरी पाठव असे बोलू लागला . तिने त्यालाही नकार दिला.आता दिवसेंदिवस तो चिडखोर आणि हिंस्त्र बोलू लागला .परवा तर तो सोनूलीबद्दल बोलू लागला.तेव्हा मात्र तिचा राग उफाळून आला .वाटेल तसे बोलली त्याला . पण आता तिला चिंता वाटू लागली. काय करावे सुचत नव्हते. ब्लॉक केले तरी वेगवेगळ्या फोन वरून मेसेज पाठवीत होता . मेसेंजर ही अनब्लॉक करीत होता.
एकटीच विचारात बसली असताना निधी तिच्याजवळ आली.निधी आयटी डिपार्टमेंटमध्ये होती . सहज बोलत बोलत तिने एक अपघाताची क्लिप तिला दाखवली." शी .... ! अशी शूटिंग कोण करेल का..? अपघात घडत असताना.."? तिने चिडून विचारले . अग फेक आहे ही.... अश्या क्लिप बनवून विकल्या की पैसे मिळतात म्हणून तर बनविल्या जातात.निधीने माहिती पुरवली तिला . बोलताबोलता गाडी पॉर्नवर घसरली." अश्या साईट वर कोण विडिओ पाठवितात...???  तिने कुतूहलाने विचारले . कोणीही पाठवू शकतो.. पैसे मिळतात म्हणूनच असे विडिओ पाठवितात ना ..?? तुम्ही तुमच्या जुन्या वस्तू साईट वर विकता तसेच असे फोटो आणि विडिओ ही विकता येतात म्हणून तर स्त्रियांचे बळजबरीने विडिओ फोटो काढून ते अश्या साईटवर विकतात ".
निधीचे ऐकून तिला धक्काच बसला.म्हणुन तर तो आपले फोटो मागत नाही ना....?? हा विचार मनात येताच तिला घाम फुटला.कसेतरी काम संपवून घरी आली . व्हाट्स अप आणि मेसेंजर वर त्याचे मेसेज दिसत होते . ती शांतपणे बसून विचार करू लागली . अचानक तिला काही सुचले . घाईघाईने तिने लॅपटॉप ऑन केला आणि काही शोधू लागली . बऱ्याच वेळाने तिच्या चेहऱ्यावर समाधानाची खूण दिसून आली . मोबाईल हातात घेऊन तिने व्हाट्स अप वरून त्याला हाय केले . गोड बोलून त्याच्याकडेच त्याच्या न्यूड फोटोची मागणी केली . तिच्या असा पॉसिटीव्ह रिस्पॉन्स पाहून तो खुश झाला . ताबडतोब त्याने पंधरा वीस न्यूड फोटो आणि दोनतीन विडिओ तिला पाठवून दिले. आता तुझी पाळी असा मेसेज पाठविला .तिने काही उत्तर न देता व्हाट्स अप बंद केले . त्याचे फोटो वेगवेगळ्या साईट वर अपलोड करून त्याची लिंक त्याला पाठवून दिली.
च्यायला दरवेळी स्त्रियांचेच फोटो का अश्या साईटवर अपलोड करायची धमकी देतात एकदा पुरुषांचेही करूया की ..... बघू त्यांची किती बदनामी होतेय . मनाशी हसत तिने लॅपटॉप बंद केला .
© श्री. किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment