Monday, May 28, 2018

स्मशानातील कामगार

नाक्यावरच्या टपरीवर वसंताला चहा पिताना बघून आश्चर्यच वाटले.वसंत सहसा बाहेर पडत नाही. सुट्टीही फिक्स नसते.त्यामुळे ठराविक दिवशी भेटण्याची खात्री नसते.मला पाहताच हात दाखविला आणि अजून एका कटिंगची ऑर्डर सोडली. चहावाल्याच्या नाराज चेहऱ्याकडे त्याने जाणून बुजून लक्ष दिले नाही.
"वसंता..आज घरी कसा..?? मी विचारले.
" काही कामे होती .आज करून टाकली".त्याने उत्तर दिले.
"बरे .....मग कसे चालले आहे कामावर.. ?? मी चहाचा घोट घेऊन विचारले .
"चालले आहे बरे ....पण पूर्वीसारखी मजा नाही   भाऊ ..."त्याने चेहरा वाकडा करत उत्तर दिले.
" म्हणजे ...??मी जोरात ओरडलो ",अरे ..अंत्यसंस्कार करण्यात कसली मजा ....??
अरे हो ....मी सांगायचे विसरलो वसंत स्मशानात कामाला होता .प्रेतांच्या अंत्यसंस्काराची संपूर्ण तयारी करणे हे त्याचे काम.चिता उभारणे ,अग्नी दिल्यावर त्याचे दहन व्यवस्थित करणे हे त्याचे काम.दिवसभर स्मशानात असल्यामुळे त्याच्या अंगाला विशिष्ट दर्प येत असे त्यामुळे बरेचजण नाक मुरडत.अर्थात आम्हाला हे माहीत असल्यामुळे लक्ष देत नव्हतो.
" नाहीतर काय भाऊ ... पूर्वी स्मशानात प्रेत येत असत तेव्हा केव्हढि गर्दी व्हायची . . किती हार फुले असायची . लोकांची रडारड शेवटपर्यंत चालायची .प्रेताचे सर्व विधिनुसार अंत्यसंस्कार व्हावे  म्हणून नातेवाईकांची भांडणे सुरू व्हायची .अरे ...मी मारामाऱ्या देखील पहिल्या आहेत चितेजवळ. अग्नी लावताना.फेऱ्या मारून  मडके फोडताना त्या व्यक्तीचे बोंब मारून रडणे अंगावर काटा आणायचा .मन भरून यायचे. डोळ्यातून कधी पाणी वाहू लागायचे ते कळायचे नाही . आम्ही ही गुंतून जायचो त्यात . कवटी फुटेपर्यंत लोक थांबून असायचे . तुम्हाला कसे काम मनासारखे झाले की आनंद होतो तसेच आमचे व्हायचे.पण आता घाईघाईने प्रेत आणले जाते. मोजून चार माणसे असतात . कधी एकदा अग्नी लावतो आणि निघतो असे होते सर्वाना .जाताना माझ्या हातावर चार पैसे टेकवतात आणि बाकी तू लक्ष ठेव असे सांगतात . अरे पैश्यासाठी करतो का आम्ही हे..?पोटतिडकीने वसंत बोलत होता.
"खरे बोलतोस वसंता.... हल्ली सगळ्यांना घाई झाली आहे . दुःख सहन करण्याची ताकद नाही राहिली कोणाच्यात "मी थोड्या विषदाने म्हणालो.
"भाऊ ह्या नोकरीत खूप काही भोगले मी . माझ्या अंगाला येणारा हा स्मशानाचा दर्प संपूर्ण घरात पसरलेला असतो . लग्न झाले तेव्हा बायको जवळ येत नव्हती . हळू हळू तिला सवय झाली पण मनात बसले ते बसलेच . मुले कोणाला मित्रांना घरी आणत नाहीत . मी बाहेर फिरायला बाहेर पडलो की आजूबाजूचे विचित्र नजरेने पाहतात .तुम्हाला ऑफिसमध्ये भेटायला येतात तेव्हा तुमचे ऑफिस पाहून पाहुणे खुश होतात पण भेटायला कुठे येणार पाहुणे ..? स्मशानात .?? पण मला त्याचे काही वाटत नाही . मी माझ्या कामाशी प्रामाणिक आहे आहे.पण अजूनही लोक अत्यसंस्कारासाठी लाकडे वापरतात याचे दुःख होते बघ. माझ्यासमोर कित्येक मण लाकडांची राख झाली आहे . बाजूला विद्युत दाहिनी आहे पण त्याचा वापर फारच कमीजण करतात.
"हो.. रे... मान्य आहे पण आपल्यात अजूनही विद्युतदाहिनीचा वापर रितीच्या विरुद्ध मानले जाते . निर्णय कोण घेणार ?? भावकी पुढे काही चालत नाही.पण आपणच आपल्यापासून सुरवात केली तर फरक पडेल ".मी गंभीर होऊन बोललो .
"खरेच भाऊ ....असे झाले तर कित्येक झाडे वाचतील. पर्यावरणाची हानी होणार नाही . मुख्य म्हणजे आम्हाला यातून सुटका मिळेल . हा दर्प निघून जाईल.वाट बघतोय कधी तो दिवस येतोय "असे म्हणून तो उठला .
मी नको नको म्हणत असताना चहाचे पैसे दिले आणि निघून गेला .
"कौन है ये आदमी भाऊ... ??? कैसा बास आता है उसके शरीर से ..?? अण्णा चेहरा वाकडा करून मला म्हणाला.
त्या माणसाचे महत्व अण्णाला सांगायची गरज भासली नाही मला . मुकाट्याने मीही चालू पडलो.
© श्री. किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment