Saturday, May 19, 2018

पहिला पाऊस ( सत्य परिस्थिती )

पहिला पाऊस ( सत्य परिस्थिती )
पहिला पाऊस
नेहमीप्रमाणे संध्याकाळी उशिराच बंड्या ऑफिसमधून बाहेर पडला.ट्रॅफिकमधून बाईक चालवायचा  त्याला खूप कंटाळा यायचा.अंगातून घामाच्या धारा वाहत असतानाच तो बाईक घेऊन रस्त्यावर आला.अर्ध्या वाटेत असतानाच आभाळ भरून आले." बापरे ....!! आता पाऊस कोसळणार "असे म्हणत त्याने वेग वाढविला.काही क्षणात त्याच्या अंगावर पावसाच्या धारा कोसळू लागल्या."आईचा घो ....!त्याने खच्चून पावसाला शिवी घातली . घराजवळच्या एक वळणावर त्याने बाईक वळवली आणि पहिल्या पावसाच्या शिडकाव्याने ओल्या झालेल्या रस्त्यावरून त्याची बाईक घसरली. त्या बाईकबरोबर घसरतच तो पाच फूट पुढे गेला .गुढग्याच्या कळा सोसत पावसाला शिव्या घालत  त्याने बाईक उभी केली.
पहिला पाऊस
अचानक सुरू झालेल्या पावसाने अमित चौगुले केबिनमधून धावतच बाहेर पडला.आपल्या नशीबातच ही धावपळ का ...??  असे मनात बोलत आणि पावसाला शिव्या देत तो प्लांटमध्ये फिरू लागला . दुसरी पाळी असल्यामुळे मनुष्यबळही फार नव्हते त्याच्याकडे .अचानक एक मोठा धमाका त्याच्या कानावर पडला नंतर काही अंतरावर ठिणग्या उडालेल्या दिसल्या . क्षणात एका भागाची लाईट बंद झाली. कोसळणाऱ्या पावसाची तमा न बाळगता अमित चौगुले पावसाला शिव्या देत जनरेटरकडे धावू लागला.
पहिला पाऊस
अचानक पडलेल्या पहिल्या पावसाला शिव्या देत विक्रमने आपली गाडी ताजसमोरच्या रस्त्यावर पार्क केली . पावसामुळे ताजचे पार्किंग फुल होते गाड्या रस्त्यापर्यंत आल्या होत्या.आज त्याची महत्वाची मीटिंग होती. परदेशी पाहुण्यांसमोर त्याला प्रेझेन्टेशन करायचे होते.आता पावसात भिजत जाण्याशिवाय पर्याय नव्हता .नाईलाजाने त्याने धावायला सुरवात केली . पण समोरून येणाऱ्या बाईकला चुकविता आले नाही त्याला.स्वतःला सांभाळत तो उभा राहिला आणि सर्व पाणी अंगावर उडाले . पावसाला आणि बाईक वाल्याला शिव्या देत तो ताजमध्ये शिरला . घाईघाईने तो मीटिंग हॉलमध्ये शिरला समोर बसलेल्या पाहुण्यांची माफी मागत त्याने बॅगेतून कागदपत्रे काढली आणि भिजलेल्या कागदपत्रांकडे हताशपणे पाहत बसला .
पहिला पाऊस
रेल्वे स्टेशनमधून मोठ्या कष्टाने हातातले समान सावरत शंकरने टॅक्सी बोलावली. गावावरून आणलेल्या तांदळाच्या आणि ज्वारीच्या दोन गोणी कॅरियरवर टाकल्या. बायकोवर खेकसत सर्वाना टॅक्सीत बसविले . आणि खुशीत घरी निघाला . पंधरा दिवस आपल्या कोकणातल्या घरी जाऊन आला होता. उद्यापासून पुन्हा कामावर जाणार होता तो . सिग्नलवरून टॅक्सी सुटली आणि अचानक आभाळ भरून आले काही कळायच्या आत पाऊस सुरू झाला . वर ठेवलेल्या धान्याच्या गोणीची आठवण झाली त्याला आणि संतापाने पावसाला शिव्या देऊ लागला .
पहिला पाऊस
ती संध्याकाळी ऑफिसमधून सुटली आणि धावतच स्टेशनमध्ये शिरली .पावसाची लक्षणे दिसत होतीच अडकले तर सोनूली घाबरुन जाईल या विचाराने ती बैचेन झाली होती . लोकलमध्ये शिरताच पाऊस सुरू झाला आणि तिने सुटकेचा निश्वास सोडला . पण पाऊस पडल्यामुळे दर स्टेशनवर गर्दी वाढतच होती.तिचे स्टेशन आले . गर्दीच्या प्रचंड लोंढ्यात ती बाहेर पडली आणि अचानक त्या पाण्यात तिचा पाय घसरला . स्टेशनवरच ती आडवी झाली . काही बायका तिच्या अंगावर पाय देऊन बाहेर पडल्या. पावसाला शिव्या देत ती लंगडत स्टेशनबाहेर पडली.
पहिला पाऊस
स्वनिर्मित असलेल्या आपल्या नवीन चित्रपटासाठी सुपरस्टार खान फारच उत्साहात होता . लाखो रुपयांचा सेट त्याने उभारला होता. रेहानाने दिलेले नवीन जॅकेट घालून तो शूटिंगसाठी तयार झाला होता. इतक्यात अचानक आभाळ भरून आले . आणि पाऊस सुरू झाला . स्वतःचा सेट वाचवायला तो पुढे झाला त्या धावपळीत त्याचे प्रिय जॅकेट फाटले . पावसाळा शिव्या देत तो आपल्या व्हॅनिटी व्हॅन मध्ये शिरला .
पहिला पाऊस
हातातील ओल्या भेळेची पुडी सावरत तो घाईघाईने घराकडे निघाला . गेले काही दिवस तिला भेळ खायची इच्छा होत होती . पण काहींना काही निमित्त होऊन तो बेत पुढे ढकलला जात होता. आपण साधी एक भेळ बायकोला देऊ शकत नाही या विचाराने तो चिडलेला होता पण आज संधी मिळाली आणि एक भेळ विकत घेतली होती . अचानक आभाळ भरून आले. पावसापासून वाचण्यासाठी त्याने भराभर पावले उचलली पण  पावसाने त्याला गाठलेच . अंगावर पाऊस घेत तो धावू लागला . शेवटी कसाबसा सोसायटीच्या आवारात शिरला . जिन्याजवळ येताच त्याने भेळेची पुडी पहिली आणि संतापून पावसाला शिव्या घातल्या . त्याच्या हातातील भेळेच्या पुडीचा पावसाच्या पाण्याने लगदा झाला होता .
© श्री. किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment