Monday, January 28, 2019

दगड ग्रुपमधून ज्ञानसेवा

दगड ग्रुपमधून ज्ञानसेवा

सिद्धिविनायक मंदिराशेजारचे साने गुरुजी उद्यान म्हणजे आमच्यासारख्यांसाठी अभ्यासिकाच होती. इतरांसाठी ते आठ वाजता बंद व्हायचे पण आमच्यासाठी मात्र  दिवसरात्र चालू असायचे.
उद्यानातील लाईट बंद झाले म्हणून काय झाले ....जाहिरातींच्या होर्डिंगवरील मोठे लाईट तर चालू असायचे. मग आम्ही तिथे रात्रभर अभ्यास करायचो . तिथे सर्व क्षेत्रातील मुले अभ्यासाला यायची . कोण कॉमर्स तर कोण मेडिकल तर कोणी इंजिनियरिंग.पण त्यामुळे मैत्रीत काहीच फरक पडत नव्हता .
तिथेच आम्ही एकत्र आलो. काही कॉमर्सचे तर काही इंजिनियरिंगचे . आमच्यातले काही पार्ट टाइम जॉब करून शिकायचे . साने गुरुजी उद्यानच आमचे दुसरे घर झाले होते . तिथे ठेवलेल्या दगडांवर बसून आमचा अभ्यास चालायचा . म्हणूनच आमचा ग्रुप दगड ग्रुप ओळखला जाऊ लागला .शिक्षण पूर्ण झाले तरी एकाच विभागात रहात असल्यामुळे भेटीगाठी चालूच होत्या . प्रत्येकजण छोटी मोठी नोकरी करीत होते . नंतर सर्वच लग्नबांधनात अडकले . मग काहीजण दुसरीकडे राहायला गेले त्यामुळे थोडे दुरावले . भेटीगाठी कमी झाल्या.
मग काही वर्षांनी अचानक महेंद्र भेटला . त्याने माझ्यासारखेच इतरांनाही गोळा केले होते. पुन्हा दगड ग्रुप एकत्र झाला . पुन्हा पिकनिक ..पार्ट्या चालू झाल्या . पण महेंद्रच्या मनात काही वेगळेच होते.
अचानक त्याने एक दिवस आम्हाला विचारले रात्र शाळेतील विद्यार्थ्यांसाठी काही करूया का ...?? त्याच्याकडे प्लॅन होता . शाळा होत्या. प्रसिद्धीत कोणालाच इंटरेस्ट नव्हता.मुलांना मदत करायची आणि निघायचे असे ठरले.
पहिल्या वर्षी काळाचौकीच्या दोन शाळा घेतल्या . शाळा शोधण्याचे काम ही त्याचेच . रात्रशाळेतील विद्यार्थ्यांना वह्या पुस्तके मिळत नाहीत . आम्ही नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना वह्या पुस्तके दिली. तेथील मुख्याध्यापकांनाही आमची नावे.. संस्थेचे नावही माहीत नव्हते . केवळ अर्ध्यातासात एका शाळेतील विद्यार्थ्यांना वाह्यापुस्तके वाटून पुढच्या शाळेत निघालो . तेथेही तेच झाले . संध्याकाळी दीड तासात कार्यक्रम आटपला .बाहेर येऊन हॉटेलात चहा पियाला बसलो आणि सगळा हिशोब काढला.त्याचे आठ भाग केले आणि त्याप्रमाणे पैसे काढले . दुसर्यावर्षी ही त्याच शाळा पुन्हा घेतल्या पण यावेळी अजून एक शाळा स्वतःहून आमच्याकडे आली . आम्ही त्याही शाळेला मदत करण्याचे ठरविले.यावेळी बाहेरून दोन जणांनी मदत केली.
अश्यातऱ्हेने गेली सात वर्षे आमचा हा उपक्रम चालू आहे .दुसऱ्या वर्षी आम्हाला संस्थेचे नाव विचारण्यात आले . आम्ही नावाचा कधीच विचार केला नव्हता . मग सर्वानुमते ज्ञान वाढविण्यासाठी हा उपक्रम आहे म्हणून ज्ञानसेवा असे नाव ठरविले . आमचा हा उपक्रम आम्ही सोशल मीडियावर फेसबुक वर पोस्ट करायचो .गेल्यावर्षी दहावीचा अभ्यासक्रम बदलला आणि सर्व शाळांची नवीन पुस्तकांची मागणी येऊ लागली . आमचे हे कार्य पाहून एका मित्राने नाव कुठेही जाहीर न करण्याच्या अटीवर 25 मुलांना पुस्तकांचा नवीन सेट देण्याचे कबूल केले . त्याचवेळी फेसबुक वरील मित्रयादीतील सौ. सुनीता खेबुडकर मॅडमनी आम्हाला नुसतीच मदत नाही तर कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे इच्छा प्रदर्शित केली. आणि त्याप्रमाणे त्या वरळी येथील दोन शाळांच्या कार्यक्रमाला उपस्थित देखील राहिल्या .खरे तर या मॅडम तश्या कोणाच्याही प्रत्यक्षात ओळखीच्या नाहीत . पण फेसबुक वरील पोस्ट आणि फोटो पाहून त्या प्रभावित झाल्या आणी ज्ञानसेवेत सहभागी झाल्या . आमच्या जुन्या साहेबांनी ही यावर्षी मदत केली. सर्वांच्या मदतीमुळे आणि सहकार्याने आम्ही एकूण सात शाळेना वह्या पुस्तके वाटली . साधारण 300 मुलांना नवीन साहित्य ज्ञानसेवा मार्फत मिळाले .
तुम्ही जर खरोखरच निस्वार्थीपणे कार्य करीत असाल तर बाहेरूनही तुम्हाला तितकाच पाठिंबा मिळतो हे सिद्ध झाले .
© श्री. किरण कृष्णा बोरकर
ज्ञानसेवा फौंडेशन
K.borkar1@gmail.com

No comments:

Post a Comment