Sunday, January 13, 2019

प्री शूट

प्री शूट
दादांची तब्बेत बरी नाही कळताच प्रकाश उर्फ पक्या ताबडतोब भारतात आला.तसा तो अमेरिकेत स्थयिक होता. तिथे त्याचे कुटुंब होते अर्थात बायकोही नोकरी करत होती आणि तिला सुट्टी घेऊन निघणे शक्य नव्हते . मुलांचाही शाळेचा प्रॉब्लेम होताच त्यामुळे यावेळी एकाने जावे असे ठरले.
दादा आणि आईला काहीही करून यावेळी इथे घेऊन ये असे बायकोने खडसावून सांगितले होते.इथे आल्यास त्यांचे उरलेले आयुष्य स्वतःच्या कुटुंबात सुखाचे जाईल इतकीच माफक अपेक्षा होती तिची.बघतो असे सांगून प्रकाश निघाला.
ऑफिसमध्ये सौचा फोन आला आणि प्रकाश आल्याचे सांगताच मी चमकलो. वाटले दादा गेलेच.पण तिने संध्याकाळी डायरेक्ट घरीच या पक्या भाऊजीना बोलायचे आहे असे सांगताच जीव भांड्यात पडला.
संध्याकाळी घरी फ्रेश होऊन बसलोच तर विक्रमही दारात हजर. नेमके डोसा, कांदेपोहे ,वडे असतानाच हा घरी कसा हजर होतो ..??याचे कोडे अजूनही उलगडले नाही मला.असो.... आज मला दोन डोसे कमी पडणार याची खात्री झाली .पण याने आल्याआल्या भाऊ आज नाश्ता इराण्याकडे असे सांगून मला उठवले आणि बाहेर  आणले.
इराण्याकडे बसतोय तोच प्रकाशही हजर झाला . दादांची तब्बेत नाजूक ही बातमी सोसायटीत पसरली होतीच .त्यामुळे तो येणार ही अपेक्षा होती.
"भाऊ ....आमच्या म्हाताराम्हातारीला समजाव तुमच्या भाषेत ...... सांगा त्यांना जा अमेरिकेत पोरा बरोबर . सुखात आयुष्य काढतील ती... सांगा ना त्यांना .या वयात बघवत नाही रे इथे एकटे राहताना ..पक्याने डायरेक्ट विषयाला हात घातला .
"तुझा बाप किती खडूस आहे माहितीय ना ..?? आजही सकाळी उठून दूध घेऊन येतो ...येताना पेपर असतोच ..किती वेळा सांगितले सकाळी सकाळी एकटे बाहेर पडू नका दूध पेपर घरी टाकायची सोय करतो पण नाही ऐकत .."विक्रम चिडून म्हणाला .
"पक्या...!  तुला माहितीय तुझे आईवडील कसे आहेत..आपला देश.. आपली माणसे त्यांना महत्वाची आहेत.तुझे चांगले व्हावे ही त्यांची इच्छा ...तुला कधीच कुठे रोखले नाही त्यांनी . अमेरिकेत स्थायिक होण्याचा निर्णय घेतलास तेव्हाही खुश होते ते . तुझ्या प्रगतीच्या आड येऊ नये असेच त्यांना अजूनही वाटते...." मी शांतपणे म्हणालो.
"हो ..आणि समजवायला जाईल कोण..? च्यायला अजूनही त्यांना वाटते आपण त्यांचे विद्यार्थीच आहोत. काही चुकीचे बोललो असे वाटले की अजूनही काठीने मारतात.." विक्रम चिडून म्हणाला .
"अरे यावर उपाय काय मग.. ?? मी नोकरी सोडून इथे येऊ ..?? चल.. तेही करेन पण बायको मुलांचे काय ?? पोरांना इथे कायमचे राहणे जमणार नाही ...".हताशपणे पक्याने विचारले
"हम्मम्म ..आम्ही माना डोलावल्या आणि मुकाटपणे समोरचा खिमा पाव खाऊ लागलो.
"दादाचे किती दिवस राहिलेत .....??अचानक विक्रमने विचारले .
"सांगता येत नाही .यातून बाहेर पडले तर तीन चार  महिने काढतील...पण मला अजून 15 दिवसच राहता येईल "पक्या शांतपणे म्हणाला.
"तुला त्यांची काळजी आहे ना... ?? आपण त्यांच्यासाठी चोवीस तास माणूस ठेवू.आहे माझ्या ओळखीच्या काही संस्था.." विक्रम म्हणाला .
अचानक काहीतरी सुचल्यासारखा पक्याचा चेहरा झाला."विकी.... माझ्या घरात सीसी कॅमेरे बसव . घरातील प्रत्येक हालचाल त्या कॅमेऱ्याने टिपली पाहिजे . त्यांचे आजारपण ..त्यांची शुश्रूषा सर्व काही रेकॉर्ड झाले पाहिजे आणि हो त्यांचे शेवटचे क्षणही रेकॉर्ड झाले पाहिजे . मग ते कुठेही असो . हॉस्पिटलमध्ये गेले तरी त्याचे रेकॉर्डिंग करायची जबाबदारी तुझी.कितीही पैसे लागो आपण भरू ..." पक्या आग्रही स्वरात म्हणाला .
"हे काय अचानक सुचले तुला ...?? हे काय मध्येच सी सी टीव्ही, दादाचे रेकॉर्डिंग ... ??? आणि हो उद्या ते शेवटचे क्षण मोजत असताना मी त्यांचे रेकॉर्डिंग करायचे .....?? मीच का.. ??? तर लोक मला हरामखोर भावनाहीन म्हणतात म्हणून ...?? हा भाऊ का नाही ...?? कारण हा सभ्यतेचा पुतळा म्हणून ??
अरे बापरे ...विक्रम एव्हडा चिडलेला कधी पहिला नाही मी. त्याच क्षणी नाश्त्याचे बिल मला दयावे लागणार हे पक्के झाले .मी मुकाटपणे खाली मान घालून खाऊ लागलो.पक्याचा हसरा चेहरा पाहून विक्रम निवळला.
"खरे बोललास विकी... हे तुलाच जमू शकते .फार फार तर बंड्याला.पण बंड्या पहिला त्यांच्या अंत्यसंस्काराच्या तयारीला धावेल म्हणून तो नको. तूच योग्य आहेस .."पक्या हसत हसत म्हणाला . मीही हसून त्याला साथ दिली तसा एक रागाचा कटाक्ष माझ्याकडे टाकला .
"विकी ... लोक लग्नाची रेकॉर्डिंग लोक का करतात ?? तर ते पुढच्या पिढीत किंवा कधीही ते क्षण जागवावे एन्जॉय करता यावे म्हणून ना ..? हल्ली प्रत्येक गोष्टीचे रेकॉर्डिंग चालू आहे .प्री शूटच्या नावाखाली सगळे शूट करतात . लग्न ठरले की फोटो शूट,साखरपुड्याचे फोटो शूट ,मग लग्नाचे रेकॉर्डिंग आणि फोटो शूट आणि आता तर गरोदर बाईंचे ही फोटो शूट करतात.काय तर म्हणे प्री डिलिव्हरी शूट .मग मूल जन्माला आले की प्रत्येक महिन्यात त्याचा जन्मदिवस साजरा करतात.,लोकांना आनंदाचे क्षण जपून ठेवायला आवडतात .दुःखाची फक्त आठवण काढतात रे ...पण मला ते क्षण अनुभवायचे आहेत . दादांच्या चेहऱ्यावरचे भाव बघायचे आहेत .आईच्या डोळ्यातील काळजी अनुभवायची आहे. च्यायला ...!! ज्या माणसाने माझ्यासाठी इतके काही केले त्याच माणसाला आयुष्याच्या  उत्तरार्धात मी काहीच देऊ नये ...त्यांना फक्त वेळ हवाय रे आणि तोच नेमका आमच्याकडे नाही . मग ही आमच्यासाठी एक शिक्षा आहे असे समज आणि आमच्या मुलांसाठी एक शिकवण . उद्या दादा गेल्यावर ज्या ज्या वेळी आम्हाला त्यांची आठवण येईल तेव्हा आम्ही त्यांचे हे अखेरचे दिवस पाहू ..त्यांचे चेहरे पाहू . त्यावेळी आम्ही त्यांच्या जवळ नसल्याची ही शिक्षा भोगू . लोक आनंद एन्जॉय करतात पण आम्ही हे दुःख आमच्या अखेरपर्यंत भोगू . मुलांना सांगू सुख मिळविण्याच्या मागे किती दुःख सहन करावे लागते ते पहा... . तुम्ही काय कमावले आणि काय गमावले हे तुम्हीच ठरवा .आणि हो दादा गेले की म्हातारीला उचलून घेऊन जाईन मी .तिची इच्छा असो व नसो त्यासाठी तुमची साथ हवी..." असे बोलून पक्याने डोळे पुसले .
मी आश्चर्यचकित होऊन म्हटले "आयला ...!! पक्या कुठून ही भारी आयडिया आणलीस... ?? 
"अरे भाऊ कालच फेसबुक वर मी एका मैत्रिणींच्या मुलीचे प्री डिलिव्हरीचे फोटो शूट पाहिले . तिला विचारले तर म्हणते हल्ली प्रत्येक गोष्टीची प्री शूट होते. लग्न एकदाच होते आणि हल्ली एकाच मुलाची फॅशन आलीय म्हणे मग ते क्षण जपून ठेवायला नको . तेव्हा मला हे सुचले की माणूस एकदाच मरतो मग त्याच्या मृत्यूचे क्षण प्री शूट केले तर काय हरकत आहे ...??. त्यांची जेव्हा जेव्हा आठवण येईल तेव्हा तेव्हा ती शूटिंग बघायची .आता मी गेल्यानंतर जे काही होईल ते तुमच्या डोळ्यासमोर घडेल पण मी ते कसे अनुभवणार.."?? असे बोलून त्याने विक्रमकडे पाहत डोळे मिचकवले . विक्रमने मुकाटपणे त्याला हात जोडून नमस्कार केला .
"एकदम मान्य आहे तुझा हा प्लॅन ..आजच एका मित्राला फोन करून सर्व व्यवस्था करून ठेवतो." एक मोठा प्रॉब्लेम सुटल्याच्या खुशीत आम्ही इराण्यातून बाहेर पडलो.
© श्री . किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment