Tuesday, April 21, 2020

राख

#CinemaGully
#raakh
#राख
हू इज अमीर खान...?? आस्क  द गर्ल्स टू नेक्स्ट डोअर... आणि डोळ्यावर काळा गॉगल ,ब्लॅक जॅकेट घातलेल्या कोवळ्या हिरोचे सहा फुटी पोस्टर प्रत्येक नाक्यानाक्यावर  लागले.
१ मार्च १९८८ रोजी कयामत से कयामत तक  रिलीज झाला आणि अपेक्षेप्रमाणे सुपरहिट झाला आणि अमीरखान तरुणींच्या गळ्यातील ताईत बनला.
 आता या चॉकलेटी हिरोचे असेच चित्रपट पाहायला मिळणार अश्याच अपेक्षेने सर्वजण त्याच्या पुढील चित्रपटाची वाट पाहू लागले . पण त्याचा पुढील चित्रपट मात्र तरुणाईला धक्का देणारा होता . 
२१ एप्रिल १९८९ साली त्याचा राख पडद्यावर आला आणि हे पाणी वेगळेच आहे याची जाणीव सर्वांना झाली.
आदित्य भट्टाचार्यने दिग्दर्शित केलेल्या या थ्रील्लर सूडपटात अमीर खान सोबत सुप्रिया पाठक ..पंकज कपूर अशी तगडी टीम होती . संपूर्ण चित्रपट एका संथ  उदास डार्क रंगात चित्रित केला गेला होता .
वयाने आपल्यापेक्षा मोठ्या असलेल्या मैत्रिणीबरोबर नायक अमीरखान पार्टी वरून परतत असतो त्याच वेळी शहरातील गुंड आणि त्याची माणसे त्याच्या मैत्रिणीवर सुप्रिया पाठकवर बलात्कार करतात ..त्यांना मारहाण करतात . नेहमीप्रमाणे पोलीस नायक आणि 
नायिकेच्या बाजूने उभे राहत नाहीत तेव्हा नायक स्वतः बदला घेण्याचे ठरवितो .
त्याच वेळी एक निलंबित झालेला प्रामाणिक पोलीस अधिकारी त्याच्या मदतीला येतो आणि दोघे मिळून सूड पूर्ण करतात.
खरे तर ही नेहमीची सूडकथा पण पडद्यावर ती उत्तमरीत्या मांडली गेली आहे . २१ वर्षाच्या कोवळ्या तरुणाचे एका गंभीर माणसात होणारे रूपांतर अमीरखानने उत्कृष्टपणे वठविले आहे . त्याला पंकज कपूर ने सुंदर साथ दिली आहे .मधुकर तोरडमल आणि होमी वाडिया यांनी आपल्या  छोट्याश्या भूमिकेत छाप पाडली आहे .
या चित्रपटासाठी 1989 साली पंकज कपूर आणि आमिरखानला नॅशनल अवॉर्ड मिळाले होते 
© श्री. किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment