Wednesday, April 1, 2020

जंगल आणि माणूस

जंगल आणि माणूस 
हातात मोबाईल आणि तोंडात चिरुट ठेवून शेरखान अंकल हत्तीच्या पुढ्यात उभा राहिला. त्याचा आवेश पाहूनच अंकल समजून गेला आज शेरखानचा संध्याकाळचा प्रोग्रॅम लवकरच झालेला दिसतोय. त्याने काही न बोलता आपला तंबाखू भरलेला खास बांबू बाहेर काढून शिलगावला आणि जोरदार दम मारला.
"काय झाले शेरु ..."?? त्याने  हवेत धूर सोडत विचारले.
एरव्ही शेरू म्हटल्यावर कधीही न चिडणारा शेरखान आज मात्र भडकला.
"शेरू बोलू नकोस .. शेरखान आहे मी.या जंगलाचा 
राजा आहे ... "तो चिडून म्हणाला 
"असशील.. पण मी तुझ्या बापालाही अशीच हाक मारायचो . आणि तुला राजाही मीच बनवले आहे  ..अंकल सहज स्वरात म्हणाला.. तू कामाचे बोल"
"हे बघ... त्या रशियात म्हणे आपले बांधव आणि जेष्ठ बंधूना रस्त्यावर मोकाट सोडले आहे . माणसे घराबाहेर पडू नये म्हणून ... पाचशे सिह म्हणे सोडले आहेत .." असे म्हणून मोबाईलमधील चित्र त्यास दाखविले .तो मोबाईल त्याने जंगलात फिरणाऱ्या माणसाकडून चोरला होता.
ते पाहून अंकल खो खो हसू लागला.."बघ..उगाच का मी तुला शेरू म्हणतो ...अरे या जगात पाचशे सिंह राहिले नाहीत तर  रशियाकडे किती  असतील..."??
"तरीही मानवाला घाबरविण्यासाठी आपल्या बांधवांचा वापर करणे चुकीचे नाही वाटत तुला ... .."शेरखान चिरुटचा मोठा झुरका मारीत म्हणाला.
"पण गरज काय ..माणसांना घाबरवायची ...."?? अंकलने सोंडेने डोके खाजवीत विचारले.
"तो कोणतातरी नवीन रोग निर्माण झाला आहे जगभरात .. त्यावर इलाज नाही म्हणतात. म्हणून लोकांनी घराबाहेर पडायचे नाही असे सांगितले गेलेय.." शेरखान मोबाईलमध्ये पाहत म्हणाला .
"आणि ही माहिती तुझ्याकडे कशी... .."??अंकलने आश्चर्याने विचारले 
"तो चतुरसिंह कोल्हा आहे ना .. त्याला सर्व माहितीय . त्याला हा मोबाईलही चालवता येतो.माझ्यातली थोडी  शिकार देतो मो त्याला . आणि शिकून घेतो ... "शेरखान हसत डरकाळी देत म्हणाला .
"अरे वा... खरा राजा शोभतोस.तरीच विचार करतोय . जंगलात माणसे दिसत नाहीत.त्या दिवशी आपला  राम माकड ही सांगत होता.. गावातली माणसे घराबाहेर पडत नाहीत. पोलीस सगळीकडे आहेत.त्याने तर एकाच्या केळीच्या बागेत धुडगूस घातला तरी कोण बाहेर आले नाहीत . इतके मानव घाबरले का..एका रोगाला...."??  अंकल मोठा झुरका घेऊन म्हणाला 
"अंकल..हे तर काहीच नाही.या मानवाचे एक आहे.. जरा काही असे झाले की ताबडतोब मांसाहार सोडणार . कोंबड्या खाणे सोडणार आणि सर्व व्यवस्थित ..छान चालू असेल तर शिकारीला येणार.. मिळेल त्या प्राण्यांची शिकार करणार .ह्या मानवाची अक्कल वाढत गेली तसतसा तो बेसिक गोष्टी विसरू लागला . उठता बसता एकमेकांना मिठ्या काय मारतात .. गालाला गाल काय लावतील .. एकमेकांना घास काय भरवतील... बरे जेवण अन्न तरी व्यवस्थित शिजवून खातील तर शपथ ... हल्ली जेवणात ही वेगवेगळे प्रयोग चालू झालेत त्याचे ... जगातील प्रत्येक प्राणी कीटक किडे हे खाण्यासाठीच आहेत असे त्याला वाटते ... स्वच्छता पाळत नाही .. गेली कित्येक शतके आपण जंगलाच्या कायद्याप्रमाणेच वागतो . भूक लागेल तेव्हाच शिकार करा . अन्न जपून वापरा. कुटुंबाची काळजी घ्या . आपली हद्द सोडू नका .. पण हे मानव सर्व विसरून गेले आहेत . नवीन नवीन प्रकारचे अन्न.. मसाले..तयार करू लागलेत . त्यात नवीन रोग उत्पन्न होऊ लागले..."शेरखान चिडून म्हणाला.
"खरे आहे .. आणि त्याचे खापरही आपल्यावर फोडले जाते ... काय तर म्हणे कोंबड्यांपासून रोग होतो .. माकडांपासून रोग झाला .. आता तर म्हणे वटवाघळापासून रोग झालाय .ती तर बिचारी हल्ली रात्रीही गुहेतून बाहेर पडत नाहीत . त्यांना अन्न पुरवायची जबाबदारी त्या अण्णा गिधाडांने घेतलीय .."अंकल तोंड बारीक करून म्हणाला .
"अरे रे ...म्हणजे हे मानव चूक करतात आणि त्याचे खापर आपल्यावरच का ....??  आपल्या जंगलातील आदिवासी बरे ... सकाळी बाहेर पडणार जंगलात फिरून सुकी लाकडे सरपणासाठी गोळा करतात . जरुरी आहे तेव्हडीच शिकार करतात . ओढ्याचे स्वछ वाहते पाणी पितात . योग्य झाडांचा रस मध गोळा करतात .संध्याकाळी गाणी गात सामूहिक नृत्य करत ईश्वराचे आभार मानतात . कसले वादविवाद नाहीत ..मोबाईल नाही ..आजारपणही नाही .मान्य आहे शहरातील संस्कृती वेगळी आहे पण आजचा विचार करून जगा ना ....?? माझ्या मुलांसाठी माझ्या नातवासाठी मला दिवसरात्र काम करायलाच हवे .. हे कशासाठी ....?? मग त्यात शरीराकडे लक्ष नाही ,काहीही अरबट चरबट खाणे आणि वेगवेगळ्या रोगांना आमंत्रण देणे आलेच ...  का नाही मानव आपला वेळ आपल्या कुटुंबासाठी देऊ शकत ....?? आपण आपली संध्याकाळ कुटुंबासोबत घालवतोच ना .....?? शेरखान आता रागावून डरकाळ्या फोडू लागला ..
खरे आहे तुझे शेरू ...आता तरी या बंदिवासात मानवाला स्वतःच्या शरीराचे कुटुंबाच्या स्वास्थ्याचे ,प्रेमाचे महत्व कळेल ... अंकल त्याच्या पाठीवर आपली सोंड प्रेमाने फिरवू लागला.
© श्री. किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment