Tuesday, March 1, 2022

तो

तो
ती नेहमी खिडकीपाशीच बसून असायची.समोर काही अंतरावर जळणाऱ्या आगीकडे पाहत बसायची.
 कळायला लागले तेव्हापासूनच ती एका जागी बसून असायची . तिच्या कमरेखालचे शरीर काहीच काम करत नव्हते .फारफार तर आता कुठे दहा वर्षांची असेल. खिडकीतून बाहेर बघत राहणे हाच तिचा टाईमपास .खिडकीतून काही अंतरावर ती स्मशानभूमी होती. नेहमी एकतरी चिता तिथे पेटत असायचीच. अंत्यसंस्कारासाठी आलेली माणसे न्याहाळणे हाच तिचा विरंगुळा .
त्या गर्दीत तो तिला दिसायचा . सहा फूट उंच.कमावलेले शरीर .कपाळावर भस्म. डोक्यावर राख .सतत गर्दीत इकडे तिकडे फिरत असायचा .माणसे श्रद्धांजली वाहून बाहेर पडली की हा चितेची व्यवस्था पाहायचा .काठीने चिता वरखाली करून पूर्ण पेटू द्यायचा.त्यावेळी त्याचे उघडे शरीर घामाने चकाकायचे .
कधीकधी साधारण मध्यरात्री हिला जाग यायची तेव्हा तिथे तो जळत्या चितेच्या प्रकाशात हातातील बाटलीतून घोट घेत धुंद होऊन नाचत असायचा . कधी कधी चक्क काही माणसांच्या घोळक्यात भाषण करताना  चिलीम ओढताना दिसायचा.
हिला त्याच्याविषयी उत्सुकता वाटू लागली .बऱ्याचवेळा हात हलवून तिने लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला पण त्याला इतक्या लांबून ती दिसत नसावी .पण त्या दिवशी त्याने अचानक तिच्या दिशेने पाहिले . काही क्षण थांबून त्याने हात हलविला .त्यानंतर त्यांचे एकमेकांकडे पाहून हात उंचावून हाय चालू झाले .
एक दिवस रात्री तिला अचानक जाग आली . तिने सवयीने स्मशानाच्या दिशेने पाहिले . तो धुंद होऊन चितेच्या प्रकाशात नाचत होता . मध्येच हातातील चिलीम तोंडाला लावून जोरदार कश मारत होता . अचानक त्याचे लक्ष  तिच्याकडे गेले आणि तो तिच्या दिशेने चालू लागला . काही क्षणात तो तिच्या  खिडकीसमोर उभा होता .
"तुला भीती नाही वाटत रात्रीचे असे फिरायची..."?? तिने मनात बरेच दिवस साचून राहिलेला प्रश्न विचारला.
"कोणाची ...?? भुताची ...?? की जनावरांची ..?? नाही वाटत कसली भीती. सर्वांपलीकडे गेलोय मी .."?? त्याने हसून उत्तर दिले.
"मला नेशील तिकडे .."?? तिने स्मशानाकडे बोट दाखवून विचारले .
"चल की ....'असे बोलून त्याने तिला अलगद उचलून घेतले आणि स्मशानाच्या दिशेने चालू लागला .
"तू इथे राहतोस .."?? 
"होय ...' एका बाकड्यावर तिला हळुवार बसवत त्याने उत्तर दिले.
"इथे नेहमी गर्दी असते का ..."?? आजूबाजूला फिरणारी माणसे पाहत तिने विचारले.त्यात काही स्त्रिया लहान मुले ही होती. सगळे जण त्याच्याकडे पाहून हात हलवीत सलाम करीत होते.
"सगळेजण फिरायला येतात . गप्पा मारायला येतात..." तो सहज म्हणाला. 
"ते आमच्या बिल्डिंगमधील काकाही आलेत.."ती एका वृद्ध व्यक्तीकडे बोट दाखवून म्हणाली. "खूप दुःखी असतात ते पण आता किती खूष दिसतायत .."ती त्याने दिलेला दुधाचा ग्लास हातात घेत म्हणाली.
"इथे येणारा प्रत्येकजण खूष असतो .तू ही खूष झालीस ना ..."?? तो गूढ हसत म्हणाला ."चल घरी सोडतो तुला .."असे म्हणून  तो तिला उचलून घ्यायला पुढे आला .
"नको ..मला चालवेसे वाटते ..."असे म्हणून तिने त्याचा हात पकडला आणि घराकडे चालू लागली.घराजवळ येताच त्याने तिला अलगद उचलले आणि पुन्हा खिडकीतून बेडवर ठेवले.
"मी निघतो ....भेटू पुन्हा ..."असे बोलून तो वळला .
"एक मिनिटं ...."ती थोड्या कठोर स्वरात म्हणाली..."तू भूत आहेस ना ..."??
तो आश्चर्याने वळला ...
"तुला कसे कळले...भुतांविषयी किती माहिती आहे तुला ...."??त्याने विचारले .
"जगातील कोणतीही व्यक्ती जमिनीवर उभे राहून तिसऱ्या मजल्यावरील छोट्या मुलीला खिडकीतून सहजपणे उचलून घेऊ शकत नाही.आणि स्मशानातील ते काका आठ दिवसांपूर्वीच देवाघरी गेले .त्यावेळी तू ही हजर होतास ..मी पाहिले तुला ..."ती नजर रोखून म्हणाली .
तो हसला ."उद्या महाशिवरात्र आहे .मी या दिवसात असाच फिरत असतो सगळ्या स्मशानात. तेच तर माझे मूळ घर आहे. इथली राख मला थंडावा देते. तू मला बोलावलेस म्हणून तुला भेटलो ..मी भूत नाही मी रुद्र आहे..."
"पुन्हा भेटशील ..."तीने हसत विचारले .
"आतातर सारखी भेट होईल ..."तो गूढ हसला आणि वळला .
दुसऱ्या दिवशी सकाळी ती आपल्या बेडवर शांतपणे झोपलेली आढळली पुन्हा कधीही न उठण्यासाठी .
© श्री.किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment