Friday, October 28, 2022

अंजान

अंजान स्पेशल क्राईम युनिट
डिस्कव्हरी + 
गोव्यातील तो बीच झपाटलेला बीच म्हणून ओळखला जात होता. रात्री त्या बीचवर कोणीही जात नव्हते.पण त्या दिवशी ते तीन मित्र दारू प्यायला बीचवर आले होते.त्यातील एक तिकडच्या आमदाराचा मुलगा होता . अचानक त्यांना तिथे एक मच्छीमार स्त्री दिसून आली . ती हळूहळू एका पडक्या होडीच्या दिशेने चालू लागली.आमदाराचा मुलगा संमोहित झाल्यासारखा तिच्यामागे चालू लागला आणि गायब झाला. 
स्पेशल क्राईम युनिटच्या एसीपी विक्रांतकडे ही केस दिली गेली. तो गोव्यात आला तेव्हा आमदाराचा मोठा मुलगा ही काही महिन्यांपूर्वी गायब झाल्याचे त्याला आढळून आले . तसेच इतर काहीजणही तिथे असेच गायब झाले होते. गायब झालेल्या व्यक्तींचा काहीही तपास लागला नव्हता.
विक्रांत गावात फिरून चौकशी करू लागला. मध्येमध्ये त्याला एक शाळकरी मुलगा खुणावू लागला . चौकशी दरम्यान त्याला असे कळले की काही महिन्यांपूर्वी एक मच्छीमार आपल्या होडीत मृतावस्थेत सापडला होता आणि त्या नंतर त्याच्या बायकोने आपल्या मुलांसोबत आत्महत्या केली होती. बीचवर जी स्त्री आमदाराच्या मुलाला दिसली होती ती त्या मच्छीमाराचीच पत्नी होती.
असे काय कारण होते की गावातील मोजकीच माणसे गायब होत होती ?? विक्रांत हे शोधून काढेल का ?
नॅशनल पार्कच्या त्या रस्त्याने रात्री कोणीच जात नव्हते .पण त्या दिवशी एका डीजीपीचा मुलगा दारू पिऊन गाडी चालवत त्या रस्त्याने निघाला .वाटेत त्याला ती लिफ्टसाठी उभी असलेली दिसली.एक सुंदर तरुणी नववधूच्या पोशाखात हातात जड बॅग घेऊन उभी होती.तो तसाच पुढे निघाला आणि पुढच्या वळणावर ती त्याच्या गाडीसमोरच आली. त्या नंतर तो नाहीसा झाला . एसीपी विक्रांतकडे ते प्रकरण सोपवले गेले.  विक्रांतने त्याला शोधून काढले त्यावेळी तो स्वतःशी बडबडत झाडावर काही विचित्र खुणा काढत होता . भूतप्रेत या गोष्टींवर विश्वास नसलेला विक्रांत या केसकडे विज्ञानाच्या दृष्टीने पाहू लागला . एका बंद पडलेल्या पोलीस स्टेशनमध्ये त्या मुलीचा फोटो सापडला . दहा वर्षांपासून  ती मुलगी मिसिंग होती.चौकशी करताना कळले की तिच्या लग्नाच्या दिवशीच दागिने घेऊन पळून गेली होती .
मग ती मुलगी त्याच रस्त्यावर आताही कशी दिसते ? त्या भागात काही लोक नाहीसे झाले होते. त्यांचा तर तिच्याशी काही संबंध नसेल ?? विक्रांत ही केस सोडवू शकेल ??
 एसीपी विक्रांतच्या भूमिकेत गश्मीर महाजनीने दमदार अभिनय केला आहे .पोलीस अधिकाऱ्यांच्या भूमिकेत तो फिट बसतो. ही सिरीजमध्ये अनेक गूढ भयकथा आहेत.काही अतर्क्य अमानवी आहेत .कथेचे सादरीकरण अतिशय सुंदर आहे . कधीकधी काही सिन पाहताना भीती वाटते .
ज्यांना भयकथा गूढकथा आवडतात त्यांना ही सिरीज नक्की आवडेल . 

No comments:

Post a Comment