Thursday, October 20, 2022

द रीडर

द रीडर
बर्नार्ड शिंल्क
अनुवाद..अंबिका सरकार 
दुसरे महायुद्ध आठवले की हिटलर आणि त्याच्या छळछावण्यांचीच आठवण होते.आतापर्यंत या विषयांवर अनेक पुस्तके लिहिली गेली आहेत.पण हे पुस्तक महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर वेगळे ठरते.ही एक प्रेमकहाणी आहे .ही नुसती प्रेमकथा नाही तर त्यामागे एक गूढता आहे.
कादंबरी तीन भागात घडते .पहिल्या भागात लेखकाचे बालपण आणि त्यात त्याची नायिकेशी असलेले संबंध यावर आहे.नायक हा पंधरा वर्षाचा शाळेत जाणारा विद्यार्थी आहे तर नायिका ट्राममध्ये कंडक्टर आहे.ती साधारण पस्तीस वर्षाची असेल. नायक आणि नायिकेचे प्रेमसंबंध असतात.त्यांच्यात लैंगिक संबंध ही असतात. ती निरक्षर आहे .त्याच्याकडून वेगवेगळी पुस्तके वाचून घेते .त्यावर चर्चा करते. हे सगळे व्यवस्थित चालू असताना ती अचानक निघून जाते. इथे पहिला भाग संपतो.
दुसऱ्या भागात नायक आता मोठा झालाय.तो कायद्याचा अभ्यास करतोय. काही नाझी एसएस महिला अधिकाऱ्यांवर ज्यू अत्याचाराचा खटला चालू आहे .नायकाला तिथे ती आरोपी म्हणून दिसते. तो संपूर्ण खटला हजर राहतो तिचे निरीक्षण करतो .तीही त्याला पहाते पण लक्ष देत नाही . ती तिच्यावर असलेल्या आरोपाचे खंडन करत नाही. तिचा आरोप सिद्ध होतो आणि तिला जन्मठेपेची शिक्षा होते.
तिसऱ्या भागात नायक वकील झाला आहे. तो नायिकेला अजूनही विसरला नाही .त्याने पुन्हा तिच्या आवडीची पुस्तके वाचायला सुरुवात केली.ती पुस्तके आपल्या आवाजात रेकॉर्ड करून तिला पाठवतो. रिप्लाय म्हणून ती त्याला दोन ओळींचे पत्र पाठवते.त्यानंतर ती त्याला पत्रे पाठवीत राहते. त्याच्याशी चर्चा करण्यासाठी  ती लिहायला वाचायला शिकते. पत्राद्वारे त्याच्याशी वेगवेगळ्या पुस्तकांवर चर्चा करते.
शेवटी तिची तुरुंगातून सुटका होण्याचा दिवस नक्की होतो.त्यावेळी तुरुंगाधिकारी नायकाला बाहेरच्या जगात तिची सोय करशील का म्हणून विचारते.त्यावेळी तो तिला भेटायला तुरुंगात येतो.बऱ्याच वर्षांनी पुन्हा एकदा त्यांची प्रत्यक्षात भेट होते.ती अजूनही त्याला बच्चू म्हणूनच हाक मारते. तो तिच्यासाठी घर शोधतो. नोकरी शोधतो  आणि उत्सुकतेने तिच्या सुटकेची वाट पाहत राहतो.पण ....
 तुरुंगातून सुटका झाल्यावर ती पुन्हा त्याच्यासोबत राहील का ??  तिने खरोखरच छळ छावणीत काही गुन्हे केले होते का ?? ज्या गुन्ह्याची शिक्षा  ती भोगतेय त्यामागील सत्य काय आहे ?? एका नाझी महिला अधिकाऱ्याला जग स्वीकारेल .?? यासारख्या अनेक प्रश्नाची उत्तरे आपल्याला शेवटी मिळतील.

No comments:

Post a Comment