Thursday, April 13, 2023

लॉस्ट

लॉस्ट
Lost
कलकत्त्यात घडलेली ही सत्य घटना आहे असे म्हणतात. ईशान भारती हा दलित नाट्यवेडा तरुण.रस्त्यावर पथ नाट्य करतो .अतिशय सरळ मार्गी तरुण . अंकिता चौहान त्याची मैत्रीण.तीही छोट्याश्या गावातून करियर करण्यास आली आहे.दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम आहे.
राजन बर्मन हा तरुण नेता.त्याला अंकिता चौहानमध्ये इंटरेस्ट होतो.तो तिला आपल्याकडे नोकरी देतो आणि पुढच्या निवडणुकीत तिला तिकीट देण्याचे आश्वासन देतो.
ईशान तिला भेटायला जातो आणि त्यानंतर गायबच होतो.त्याची बहीण पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवते पण तिलाच पोलिसांकडून त्रास देण्यास सुरुवात होते.ईशान नक्षलवादी होता असा पोलिसांचा आरोप असतो.
विधी साहनी एक क्राईम रिपोर्टर .ती आजोबांसोबत राहते.तिचे आजोबा निवृत्त प्राध्यापक होते.विधी अतिशय तत्वनिष्ठ आहे.ती ईशान भारती प्रकरणाचा शोध घेण्याचे ठरविते. ती कोणत्याही दाबावास बळी न पडता या प्रकरणाच्या मुळाशी जाते.शेवटी तिला ईशानविषयी माहिती कळते आणि ती कोलमडून पडते.पण सत्य काही वेगळेच असते.
ही खरोखरच उत्कंठावर्धक शोध मोहीम आहे.यात कोठेही हिंसाचार नाही .आरडाओरडा नाही.हाणामारीही नाही. यातील कोणतीही पात्रे एकमेकांवर चिडूनही बोलत नाहीत.पण कुठेतरी एक भीतीचे वातावरण जाणवते.विधीचा पाठलाग ,विधीच्या आजोबांना अप्रत्यक्षपणे दिलेली धमकी.पोलिसांचे ईशानच्या नातेवाईकांशी बोलणे. राजन बर्मनचे हसऱ्या चेहऱ्याने मुलाखत देणे .हे सर्व सोपे वाटत असले तरी त्यामागे कुठेतरी हिंसा आहे ,काहीतरी गंभीर घडतेय याची जाणीव सतत होत राहते.
विधी आणि तिचे आजोबा यांचे रिलेशनही खूप सुंदर दाखविले आहे.त्यांच्या सहज घडणाऱ्या चर्चा ,एकमेकांच्या कामात दखल न देता उलट सपोर्ट करणे हे सिन बघण्याआरखे आहेत.
यामी गौतमने विधी साहनी सहजपणे उभी केलीय.तर पंकज कपूर आजोबांच्या भूमिकेत वावरतात.राहुल खन्ना बर्मनच्या  छोट्या भूमिकेत छाप पाडून जातो.
चित्रपट झी 5 वर आहे.

No comments:

Post a Comment