Wednesday, February 7, 2024

थ्री ऑफ अस

Three Of Us
थ्री ऑफ अस
शैलजा आणि दिपांकर पतिपत्नी .आता ते पन्नाशीला आलेत.शैलजा घटस्फोट कोर्टात कन्सल्टंट आहे.दिपांकर इन्शुरन्स एजंट आहे. घरी दोघेच मुलगा बाहेरगावी शिकतोय .त्यामुळे नात्यात एक तणाव आल्यासारखा आहे.दोघात बोलणे कमी होतेय.त्यात शैलजाची स्मरणशक्ती कमी होत चालली आहे. 
अचानक एक दिवस तिला आपल्या गावी वेंगुर्ल्याला जावेसे वाटते.इथे तिचे प्राथमिक शिक्षण झाले आहे.तिला त्या शाळेत जावेसे वाटते .काही जवळचे मित्र मैत्रिणी आहेत ज्यांना ती गाव सोडल्यानंतर कधीच भेटली नाही .त्यातही तिचा एक खास मित्र आहे प्रदीप कामत .त्याला भेटायची इच्छा आहे.
नवऱ्याला सोबत घेऊन ती वेंगुर्ल्याला येते.तिथे तिची बालमैत्रीण गौरी भेटते.तिच्याकडून प्रदीप कामतचा पत्ता घेऊन त्याला भेटायला जाते.
प्रदीप कामत कुडाळला बँकेत मॅनेजर आहे.तिला अचानक बँकेत पाहून त्याला धक्का बसतो . त्यानंतर चालू होतो तिघांचा प्रवास . शाळेतील वर्गात जाऊन जुन्या आठवणी ताज्या करणे.मित्र मैत्रिणीच्या घरी जाऊन त्यांच्या पालकांना भेटणे.जुन्या दिवसात रमणे.
एक अतिशय तरल साधा संथ गतीत चित्रपट सुरू राहतो.प्रेम मैत्री यांच्या नाजूक नात्यावर चित्रपट उभा आहे.यात तिघेही एका विचित्र तणावात आहेत.आपल्या बालपणीची खास मैत्रिण आणि तिच्या नवऱ्यासोबत फिरताना एक अवघडेलपणा प्रदीपच्या चेहऱ्यावर सतत दिसून येतो .तर दिपांकर ही त्याच अवस्थेतून जातोय. शैलजा ह्या सगळ्या आठवणी मनात रुजू देतेय.
चित्रपट कोकणच्या पार्श्वभूमीवर आहे त्यामुळे कोकणातील लोकांना तो जास्त भावतो.कोकणातील निसर्ग ,देवळे ,घरे पाहून प्रत्येक कोकणी माणूस आपल्या बालपणात जातो आणि हळवा होतो.
शेफाली शहाने शैलजाची भूमिका छान केलीय.तिचे एकाकी असणे .सतत तणावात दिसणे.शून्यात राहणे छान उभे केलेय.तर स्वानंद किरकिरेने तिला सांभाळून घेणार ,तिला साथ देणारा तिला दिपांकर रंगविला आहे.पण भाव खाऊन जातो तो जयदीप अहलावत .शैलजाला अनेक वर्षांनी समोर पाहून धक्का बसणे तिच्या नवऱ्याशी बोलताना येणारा अकवर्डनेस .तिच्याशी जपून बोलणे.आता आपण लहानपणीचे मित्र मैत्रिण नाही तर मॅच्युअर्ड झालोत हे मनात ठेवून वागणे असा प्रदीप कामत छान उभा केलाय.
हा चित्रपट पाहून काहीजणांना निश्चितच पुन्हा जुन्या आठवणी जाग्या करावयाच्या वाटतील .
चित्रपट नेटफ्लिक्सवर आहे.

No comments:

Post a Comment