Monday, September 23, 2019

साहित्यिक मित्र

साहित्यिक मित्र

संतोष दिघेला कोकणातील छोट्या गावतील साहित्य संमेलनाचे अध्यक्ष बनविले ही बातमी वाचून आम्हाला मुळीच आश्चर्य वाटले नाही.कारण या आधीही असे अनपेक्षित धक्के आम्हाला बसले होते.फार फार तर आता साहित्य संमेलनात साहित्यिक असतात या गोष्टीवरचा विश्वास आता उडाला.पूर्वी एकदा टम्या केळकरला आयआयटीला ऍडमिशन मिळाली तेव्हा आयआयटी फक्त हुशार मुलांसाठी असते ह्यावरचाही विश्वास उडाला होता.हुशार विद्यार्थ्यांची सीट गेली म्हणून बाजी रेवळेने उपोषणाची धमकी दिली होती.पण दुसऱ्या दिवशी उजाला बारमध्ये टम्या आणि बाजा एकत्र दिसले तेव्हा उपोषणावरचा विश्वास उडाला.
तर ही बातमी आम्हाला अचानकच कळली.दिघ्या कडून कळली असती तर आमच्या खिशातील सगळे पैसे त्याने संपविले असते.आता निदान सावध राहून आम्ही येणाऱ्या परिस्थितीशी सामना करण्याची मनाची तयारी करून राहिलो .
मी आणि विक्रम इराण्याकडे मस्का पाव आणि चहा पिताना नेमकी पावाच्या खालच्या पेपरवर याची बातमी होती. तो तेलकट पेपर  विक्रम इतक्या चवीने वाचताना पाहून मला भलतीच शंका आली पण नंतर काही न बोलता त्याने तो पेपरचा तुकडा डिशसह माझ्याकडे सरकवला.कोणतातरी कोणत्याही स्टॉलवर न दिसणारा पेपर होता तो.त्याच्या चार नंबर पेजवर बंगाली बाबांच्या जाहिरातीखाली याची बातमी होती .
संतोष दिघे साहित्यिक आहे का ...??? हाच मोठा चर्चेचा विषय ..खरे तर वादाचा विषय अशी माझी सौ म्हणते .त्याची तीन चार पुस्तके प्रकाशित झालीय असे तो इतरांना सांगतो . माझी पुस्तके सहजासहजी उपलब्ध नाहीत असेही तो म्हणतो आणि या गोष्टीला विक्रम पाठिंबा देतो. विक्रमनेच त्याचे एक पुस्तक रात्री नऊनंतर दादरच्या रेल्वे ब्रिजखली बसणाऱ्या विक्रेत्याकडून आणले होते . रातों का शहेनशहा असे त्या पुस्तकाचे नाव होते . त्याची भाषाशैली आम्हाला माहीत होतीच पण पुस्तकातील रतिक्रीडेची वर्णन आणि त्याचा कल्पनाविलास पाहून आम्ही थक्क झालो .
दिघ्या पहिल्यापासूनच मराठी भाषेत हुशार .सदा साळवीला त्याने एक प्रेमपत्र लिहून दिले होते ते वाचून कुंदा म्हात्रेची मोठी बहीण आपल्या  वर्षाच्या मुलीला कमरेवर घेऊन त्याला भेटायला गार्डनमध्ये आली . आणि ते पत्र तिला नाही तर तिच्या बहिणीला आहे  हे कळताच तिने मारलेली थप्पड आजही आमच्या कानात घुमतेय.मध्येच एकदा तो कवी झाला होता . पण नशा अंगात  भिनल्याशिवाय कविता कागदावर उमटत नाही असा सल्ला कोणीतरी देवमाणसाने त्याला दिला . ह्याने पाजलेल्या दारूवर महिनाभर आमच्यासारख्या मित्रांनी चैन केली . पण नंतर कविता करण्याचे प्रमाण दारुप्रमाणेच अति होऊ लागले तेव्हा एकेक जण गळू लागला .
दिघेने काही मराठी मालिकांमध्ये लिखाणही केले असे ऐकून होतो . त्याचे नाव शोधण्यासाठी मी संध्याकाळी सात ते रात्री दहा पर्यंत टीव्ही समोर ठाण मांडून बसू लागलो .  मित्रांसोबत नाक्यावर उभा राहणारा आपला नवरा अचानक घरी टीव्ही समोर का बसू लागलाय या शंकेने सौ ला पछाडले . बाहेरची भानगड अंगावर आली नसेल ना या काळजीने तिने घरात राहणे सोडून दिले . मेव्हणीला काम देतो असे सांगून तो आमच्या घरी दोनवेळा फुकटात जेवून गेला हे सौ अजूनही विसरली नाही . पण संतोषकडे नवनवीन युक्त्यांचा खजिना आहे . त्यामुळे अजून चारवेळा जेवून जाईल याची मला खात्री आहे .
त्याच्या संमेलनाध्यक्षपदाची बातमी वाचून मी आणि विक्रमने एकमेकांच्या तोंडाकडे पाहिले आणि निराशेने मान हलवली .आता हे संमेलन होईपर्यंत दिघ्या माझ्याकडे कमीतकमी तीन वेळा आणि विक्रमकडे चार वेळा जेवणार हे नक्की .

© श्री. किरण कृष्णा बोरकर

द केस ऑफ  द काउंटरफिट आय

द केस ऑफ  द काउंटरफिट आय .. अर्ल स्टँले गार्डनर
अनुवाद .... आनंद केतकर
मेहता पब्लिकेशन
हार्टली बॅसेट या धनाढ्य उद्योगपतींचा मृतदेह त्याच्याच अभ्यासिकेत सापडलाय. अर्थात खुन्याने ती आत्महत्या आहे असा भासवायचा प्रयत्न केलाय . पण मृतदेहापाशी तीन रिव्हॉल्वर सापडली . एक त्याच्या पत्नीनेच घाबरून तिथे ठेवले आहे आणि खुनी म्हणून तिलाच अटक झालीय .  पेरी मेसनकडे एक माणूस आपल्या हरवलेल्या खोट्या डोळ्यांची तक्रार करण्यासाठी  आलाय आणि तो डोळा गैरमार्गासाठी वापरला जाईल असा त्याला दाट संशय आहे .बॅसेटकडे काम करणाऱ्या एकाने पैश्याची अफरातफर केलीय आणि तो पैसे देण्यास असमर्थ आहे . तर बॅसेटच्या पत्नीला त्याला सोडून जायचे आहे .बॅसेटचा सावत्र मुलगा त्याचा प्रचंड तिरस्कार करतोय . मृत असलेल्या बॅसेटच्या हातात काचेचा नकली डोळा आहे . कदाचित खुनी माणसाचाच तो असावा .
वरवर साधी सरळ वाटणारी केस खूपच गुंतागुंतीची बनली आहे .  तरीही पेरी मेसन खरा खुनी शोधून काढतोच .

Sunday, September 22, 2019

वासांसी नूतानानि ..... नारायण धारप

वासांसी नूतानानि ..... नारायण धारप
साकेत प्रकाशन
खरे तर ऋषिकेश हा फारच साधा तरुण . एकटाच राहणाराया. सरळ मार्गाने नोकरी करणारा . अबोल स्वभावाचा . एके दिवशी कामावर जाताना त्याच्या बसला अपघात होतो . आणि तो जखमी होतो . हॉस्पिटलमध्ये त्याला काही विचित्र स्वप्ने पडतात . तीही पुरातन कालखंडातील  असतात . त्याच वेळी हॉस्पिटलमध्ये एक वृद्ध व्यावसायिक ऍडमिट होतो . त्याला पाहताच ऋषिकेशच्या आंतरिक शक्ती जागृत होतात . न कळत तो त्या वृद्धावर आणि त्याच्या तरुण मुलीवर आपल्या शक्तीचा प्रभाव पडून त्यांना संकटातून बाहेर पडण्यास मदत करतो .अतिशय गुंतागुंतीच्या या गुढकथेत धारपानी  उत्कंठा ताणून धरली आहे . त्यामुळे वाचक शेवटपर्यंत पुस्तक वाचतात .

Wednesday, September 18, 2019

द केस ऑफ द डेम्यूर डिफेडन्ट ...

द केस ऑफ द डेम्यूर डिफेडन्ट ...अर्ल स्टँले गार्डनर
अनुवाद ....बाळ भागवत
मेहता पब्लिकेशन
नादिन फार ही तरुणी एका मानसोपचारतज्ञाकडे उपचार घेतेय . एका औषधांच्या गुंगीत आपल्या हातून खून झालाय असे ती सांगते . तिचा हा कबुलीजबाब रेकॉर्ड होतो . पण यावर काही कायदेशीर कारवाई होणार की नाही याविषयी सल्ला घेण्यासाठी डॉक्टर पेरी मेसनकडे  जातो . त्याच वेळी तेथील नर्सकडून ती माहिती पोलिसांना दिली जाते आणि कबुलीजबाब त्यांच्या हाती दिला जातो .  सायनाईडच्या गोळ्या हॉट चॉकलेटमध्ये टाकून खून केला असे नादिन फर सांगते . उरलेल्या गोळ्या आणि  शिश्याच्या गोळ्या एका बाटलीत  भरून  ती बाटली तलावात फेकली असेही ती सांगते . पेरी मेसन ती बाटली शोधून काढतो तेव्हा त्यात साध्या रासायनीक साखरेच्या गोळ्या सापडतात . पण पोलिसांना सायनाईडची बाटलीही सापडते आणि संशय पेरी मेसनवर ही घेतला जातो. खरेच नादिनच्या हातून खून घडला आहे का ...?? का तिने त्याचा खून करायचा निर्णय घेतला ..?? तिच्या पूर्वायुष्यात काय घडले आहे ...?? अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे शेवटी  आपल्याला मिळतात .

Tuesday, September 17, 2019

इंजिनियर्स डे

इंजिनियर्स डे
त्या फाईव्ह स्टार हॉटेलच्या डायनिंग हॉलमधील कोपऱ्यातील  टेबलवर ते दोघे आज भेटणार होते.
नेहमीप्रमाणे तो वेळेच्या आधीच आला होता . दिसायला साधारणच होता . असल्या हॉटेलमध्ये यायची सवय मुळीच दिसत नव्हती.सावधपणे चारीबाजूने नजर फिरवून तो भिंतीकडे पाठ करून बसला.  नंतर हातातील टॅब ओपन करून शांतपणे काम करु लागला.
थोड्यावेळाने ती आली. दोघेही एकाच वयाचे दिसत होते . ती दिसायला सुंदर होती.नवीन डिझाईनची साडी तिला खुलून दिसत होती . सराईत असल्याप्रमाणे त्याच्या टेबलाजवळ आली . त्याने मान वर करून पाहताच ओळखीचे हसली आणि समोर बसली.
" उशीर झाला का ....."?? तिने विचारले .
"नाही ग ....मीच लवकर आलो... तो म्हणाला. "नेहमीसारखा ...."?? तिने हसत विचारले.
"काय करणार ....?? असे करावेच लागते .धंद्याचा भाग आहे तो ... तो हसून म्हणाला.
"मग काय म्हणतोय धंदा ...."?? तिने ज्यूसचा घोट घेत विचारले.
"मस्त .. !! जो पर्यंत लफडी आहेत तोपर्यंत आमच्या धंद्याला मरण नाही .तुझे काय ..."?? त्याने विचारले.
"राजकारणी लोकांना कुठे मरण असते...."?? तिने उलट प्रश्न केला."ज्याची पार्टी वरचढ त्याच्याकडे जायचे . पदरात खुर्ची पडून घ्यायची. जाऊदे मी सांगितलेल्या कामाचे काय झाले ..."?? तिने विचारले.
त्याने खिशातून मेमरी कार्ड काढून तिच्या हातात दिले ." 64 जीबी फुल आहे. तुला पाहिजे त्यापेक्षा जास्त काही आहे यात . नवीन प्रकारच्या कॅमेऱ्यांमुळे रात्रीच्या अंधारातले ही स्पष्ट दिसते तर सुस्काराही कानाजवळ ऐकू येतो.सोशल मीडिया ..मेल.. सर्व काही हॅक केले होते.
" छान .. पैसे तुझ्या अकाउंटला जमा करते मी " तिने मेमरी कार्ड पर्समध्ये ठेवले. दोघेही शांतपणे जेवू लागले.
" कसा या धंद्यात आलास रे तू ...."?? खूप हुशार विद्यार्थी होतास तेव्हा ...."?? तिने अचानक विचारले.
" तू कशी राजकारणात आलीस ...?? फॉरेनला जाशील असे वाटले होते .."त्याने तसेच उत्तर दिले.
" हो रे ...माझ्या घरात सगळे शिकलेले. कदाचित त्यामुळेच एक आत्मविश्वास होता अंगात . पण कॉलेजच्या निवडणुका , फॅसिलिटी यात नकळत गुंतून गेले . तुला माहीतच आहे कुठेही अन्याय होताना दिसला की मी पुढेच . नंतर एके ठिकाणी जॉब केला पण तिथेही कंपनी पॉलिटिक्स सुरू .नकळत या राजकारणात ओढले गेले . आणि आता यातच गुरफटलीय . काही गोष्टी पास करून घ्यायचा आहेत त्यासाठी  काही व्यक्तींची आतली ओळख असावी म्हणून अश्या गोष्टी जमवाव्या लागतात .कधी कुठे कसा वापर होईल सांगता येत नाही बाबा ... पर्समधील मेमरी कार्ड दाखवत ती हसत म्हणाली.
" माझ्या घरातच दारिद्रय..  त्यामुळे पैसे कमविणे हा माझा मूळ हेतू . शिक्षण पूर्ण झाले .एक दोन ठिकाणी जॉब केला पण पगार काही चांगला नव्हता . कॉम्प्युटर नेट सर्फिंग यात मी एक्सपर्ट .एक दिवस मित्राने सांगितले एकाचा कॉम्प्युटर लॉक झालाय ओपन करून देशील का ....?? सोपे काम होते ते ..?? पण त्या कॉम्प्युटरमध्ये बऱ्याच काही गोष्टी होत्या . अपेक्षेपेक्षा जास्त पैसे मिळाले .  मग अशीच छोटी मोठी कामे स्वीकारू लागलो . एक जण म्हणाला माझ्या बायकोचा मोबाईल हॅक कर ,तर एक स्त्री सांगते नवऱ्याचा बाहेर लफडी आहेत असा संशय काहीही करून त्याला पकडायचे आहे . हल्लीच्या स्मार्टफोन आणि वेगवेगळ्या गॅझेटमुळे ही कामे बरी पडतात. तक्रार कोण करायला जात नाही .. आता पैसे ही चांगले मिळतात शिवाय मनात येईल तेव्हा काम करायचे . तो रोजचा प्रवास ,मस्टर, आठ दहा तास काम ,बॉसच्या शिव्या यातून मुक्त आहे मी...." तो जेवता जेवता तिला सांगत होता.
"एकूण काय दोघेही आपल्या मार्गाने चाललोय .ओके.... निघते मी ... "असे म्हणून ती उठली." बाय द वे हॅपी इंजिनियर्स डे ..."असे म्हणत तिने हात पुढे केला.त्याने ही हातात हात घेत सेम टू यु म्हटले.
" खरेच इंजिनियर आहोत का आपण ......"?? त्याने विचारले . न्यूटन ..आईन्स्टाईन .. फक्त काही वर्षेच आपल्या आयुष्यात आले . त्यांचे नियम त्यांची तत्वे कधीच वापरली नाहीत आपण . उद्या तू मंत्री होशील काही वर्षांनी मुख्यमंत्रीही होशील .. इतरांवर कंट्रोल ठेवण्यासाठी माझ्यासारख्यांचा वापर करशील . मीही पैसे कमविण्यासाठी तुला साथ देईन ..."तो उद्वेगाने म्हणाला.
ती काही न म्हणता बाहेर पडली.
गाडीत बसताच तिने एकाला फोन लावला .." काम झाले आहे .आता तो काहीच कामाचा नाही .गायब करा त्याला".
आतमध्ये बसून तिचे संपूर्ण बोलणे त्याने कानात असलेल्या छोट्या इयरफोन मधून ऐकले. तो स्वतःशी हसला आणि  एक फोन लावला" हो सर.... आताच मॅडम मला भेटून गेल्या.त्यांचे काम केले आहे मी . अजूनही त्यांचे बाहेर तसले काही प्रकरण दिसत नाही पण लवकरच त्या कोणत्यातरी धोकादायक प्रकरणात अडकतील हे नक्की . सांभाळा तुमच्या बायकोला.जवळच उभ्या असलेल्या वेटरला घसघशीत टीप देऊन तो बाहेर पडला .
© श्री. किरण कृष्णा बोरकर

Thursday, September 12, 2019

हिटलर ....श्री.ह.अ. भावे

हिटलर ....श्री.ह.अ. भावे
वरदा बुक्स पुणे
दुसऱ्या महायुद्धाला कारणीभूत ठरलेला जर्मनीचा नेता म्हणून हिटलर प्रसिद्ध आहे. काहीजण त्याला जर्मनीचा लोकप्रिय नेता म्हणतात तर काहीजण जर्मनीचा हुकूमशहा मानतात.त्याच्या कारकिर्दीत जर्मनीची प्रगती झाली तर तिचा ऱ्हास व्हायलाही हाच कारणीभूत आहे असे ही म्हणतात .इतिहासात या व्यक्तींबद्दल अजूनही कुतूहल आहे . हा नक्की कसा आहे ...??  ह्याला इतक्या पराकोटीचा ज्यू द्वेष का ??? साठ लाख लोकांच्या हत्येला हा माणूस कारणीभूत आहे असा इतिहास सांगतो . याच्यापेक्षाही क्रूर  हुकूमशहा इतिहासात झाले पण इतकी प्रसिद्धी कोणालाच मिळाली नाही .1930 पर्यंत जर्मनीला अज्ञात असलेला हिटलर पहिल्या महायुद्धानंतर प्रसिद्धीस आला . त्याचा उदय हा जर्मनीसाठी एक अपघात होता असे लेखक म्हणतो  आणि त्यावरच हे पुस्तक आहे .त्याला खरोखरीच लष्करात जायचे होते का ..?? सैन्य भरती चुकविण्यासाठी त्याने बरीच ठिकाणे बदलली . त्याचे विचार एकांगी होते .आपल्या निर्णयाचे काय परिणाम होतील याचा त्याने कधीही विचार केला नाही .दुसरे महायुद्ध त्याने घडविले पण त्याचा जर्मनीला काहीच फायदा झाला नाही ना त्यांच्या नकाशात काडीमात्र बदल झाला नाही .  उलट सत्तर टक्के स्त्री पुरुष  मारले गेले . म्हणूनच त्याला क्रूरकर्मा ओळखले जाते . एकछत्री हुकूमशाही कशी निर्माण होते हे या पुस्तकातून आपल्याला कळते. हिटलरच्या बऱ्याचश्या  बाजू  आपल्याला कळतात .

Monday, September 9, 2019

द फर्म.... जॉन ग्रिशम

द फर्म.... जॉन ग्रिशम
अनुवाद ....अनिल काळे
मेहता पब्लिकेशन
मेंफिस सारख्या छोट्याश्या शहरात ती वकिलांची फर्म आहे . मोजून चाळीस वकील तेथे काम करतात . मोठ्या मोठ्या धनाढ्य आशिलांची टॅक्सची प्रकरणे त्यांच्याकडे आहेत . आपल्या वकिलांना भरपूर पगार ,उत्तम सुखसोयी ती फर्म देते . अट एकच... त्यांनी भरपूर काम करायचे आणि भरपूर पैसे कमवायचे. त्या फर्ममध्ये एकदा लागलेला वकील कधीच फर्म सोडून जात नाही . उलट कमी वयात लक्षाधीश बनून निवृत्त होतात . पण गेल्या पंधरा वर्षात पाच वकिलांचे संशयास्पद मृत्यू झाले आहेत आणि हे सर्व अपघाती मृत्यू आहेत .
एक तरुण वकील जो नुकताच लॉ कॉलेजमधून बाहेर पडलाय.तो गरीब आहे मेहनती आहे प्रामाणिक आहे . फर्मने त्याला आपल्याकडे घेतलाय . त्यानेही दिवसाचे अठरा अठरा तास काम करून आपली निवड सार्थ ठरवली आहे . पण कुठेतरी काहीतरी चुकतेय याची सतत त्याला जाणीव होतेय . त्याच्या घरात ,कारमध्ये ,मायक्रोफोन बसविले आहेत . त्याच्यावर आणि त्याच्या पत्नीवर पाळत ठेवली जातेय . त्याने नेमलेल्या एका खाजगी डिटेक्टिव्हचा अमानुषपणे खून झालाय .
एफबीआय या फर्मवर बारीक लक्ष ठेवून आहे . या फर्मच्या मागे एक प्रसिद्ध माफिया फॅमिली आहे असा त्यांना संशय आहे . त्यांचा प्रचंड काळा पैसा पांढरा करण्यासाठी या फर्मचा वापर केला जातोय . एफबीआयने आता या तरुण वकिलांची मदत घ्यायची ठरविले आहे .
तो तरुण वकील आणि त्याची पत्नी दोघेही माफिया आणि एफबीआयच्या जाळ्यात अडकतात . आता त्यांना तेथून बाहेर पडायचे आहे .....