Monday, September 23, 2019

साहित्यिक मित्र

साहित्यिक मित्र

संतोष दिघेला कोकणातील छोट्या गावतील साहित्य संमेलनाचे अध्यक्ष बनविले ही बातमी वाचून आम्हाला मुळीच आश्चर्य वाटले नाही.कारण या आधीही असे अनपेक्षित धक्के आम्हाला बसले होते.फार फार तर आता साहित्य संमेलनात साहित्यिक असतात या गोष्टीवरचा विश्वास आता उडाला.पूर्वी एकदा टम्या केळकरला आयआयटीला ऍडमिशन मिळाली तेव्हा आयआयटी फक्त हुशार मुलांसाठी असते ह्यावरचाही विश्वास उडाला होता.हुशार विद्यार्थ्यांची सीट गेली म्हणून बाजी रेवळेने उपोषणाची धमकी दिली होती.पण दुसऱ्या दिवशी उजाला बारमध्ये टम्या आणि बाजा एकत्र दिसले तेव्हा उपोषणावरचा विश्वास उडाला.
तर ही बातमी आम्हाला अचानकच कळली.दिघ्या कडून कळली असती तर आमच्या खिशातील सगळे पैसे त्याने संपविले असते.आता निदान सावध राहून आम्ही येणाऱ्या परिस्थितीशी सामना करण्याची मनाची तयारी करून राहिलो .
मी आणि विक्रम इराण्याकडे मस्का पाव आणि चहा पिताना नेमकी पावाच्या खालच्या पेपरवर याची बातमी होती. तो तेलकट पेपर  विक्रम इतक्या चवीने वाचताना पाहून मला भलतीच शंका आली पण नंतर काही न बोलता त्याने तो पेपरचा तुकडा डिशसह माझ्याकडे सरकवला.कोणतातरी कोणत्याही स्टॉलवर न दिसणारा पेपर होता तो.त्याच्या चार नंबर पेजवर बंगाली बाबांच्या जाहिरातीखाली याची बातमी होती .
संतोष दिघे साहित्यिक आहे का ...??? हाच मोठा चर्चेचा विषय ..खरे तर वादाचा विषय अशी माझी सौ म्हणते .त्याची तीन चार पुस्तके प्रकाशित झालीय असे तो इतरांना सांगतो . माझी पुस्तके सहजासहजी उपलब्ध नाहीत असेही तो म्हणतो आणि या गोष्टीला विक्रम पाठिंबा देतो. विक्रमनेच त्याचे एक पुस्तक रात्री नऊनंतर दादरच्या रेल्वे ब्रिजखली बसणाऱ्या विक्रेत्याकडून आणले होते . रातों का शहेनशहा असे त्या पुस्तकाचे नाव होते . त्याची भाषाशैली आम्हाला माहीत होतीच पण पुस्तकातील रतिक्रीडेची वर्णन आणि त्याचा कल्पनाविलास पाहून आम्ही थक्क झालो .
दिघ्या पहिल्यापासूनच मराठी भाषेत हुशार .सदा साळवीला त्याने एक प्रेमपत्र लिहून दिले होते ते वाचून कुंदा म्हात्रेची मोठी बहीण आपल्या  वर्षाच्या मुलीला कमरेवर घेऊन त्याला भेटायला गार्डनमध्ये आली . आणि ते पत्र तिला नाही तर तिच्या बहिणीला आहे  हे कळताच तिने मारलेली थप्पड आजही आमच्या कानात घुमतेय.मध्येच एकदा तो कवी झाला होता . पण नशा अंगात  भिनल्याशिवाय कविता कागदावर उमटत नाही असा सल्ला कोणीतरी देवमाणसाने त्याला दिला . ह्याने पाजलेल्या दारूवर महिनाभर आमच्यासारख्या मित्रांनी चैन केली . पण नंतर कविता करण्याचे प्रमाण दारुप्रमाणेच अति होऊ लागले तेव्हा एकेक जण गळू लागला .
दिघेने काही मराठी मालिकांमध्ये लिखाणही केले असे ऐकून होतो . त्याचे नाव शोधण्यासाठी मी संध्याकाळी सात ते रात्री दहा पर्यंत टीव्ही समोर ठाण मांडून बसू लागलो .  मित्रांसोबत नाक्यावर उभा राहणारा आपला नवरा अचानक घरी टीव्ही समोर का बसू लागलाय या शंकेने सौ ला पछाडले . बाहेरची भानगड अंगावर आली नसेल ना या काळजीने तिने घरात राहणे सोडून दिले . मेव्हणीला काम देतो असे सांगून तो आमच्या घरी दोनवेळा फुकटात जेवून गेला हे सौ अजूनही विसरली नाही . पण संतोषकडे नवनवीन युक्त्यांचा खजिना आहे . त्यामुळे अजून चारवेळा जेवून जाईल याची मला खात्री आहे .
त्याच्या संमेलनाध्यक्षपदाची बातमी वाचून मी आणि विक्रमने एकमेकांच्या तोंडाकडे पाहिले आणि निराशेने मान हलवली .आता हे संमेलन होईपर्यंत दिघ्या माझ्याकडे कमीतकमी तीन वेळा आणि विक्रमकडे चार वेळा जेवणार हे नक्की .

© श्री. किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment