Monday, September 9, 2019

द फर्म.... जॉन ग्रिशम

द फर्म.... जॉन ग्रिशम
अनुवाद ....अनिल काळे
मेहता पब्लिकेशन
मेंफिस सारख्या छोट्याश्या शहरात ती वकिलांची फर्म आहे . मोजून चाळीस वकील तेथे काम करतात . मोठ्या मोठ्या धनाढ्य आशिलांची टॅक्सची प्रकरणे त्यांच्याकडे आहेत . आपल्या वकिलांना भरपूर पगार ,उत्तम सुखसोयी ती फर्म देते . अट एकच... त्यांनी भरपूर काम करायचे आणि भरपूर पैसे कमवायचे. त्या फर्ममध्ये एकदा लागलेला वकील कधीच फर्म सोडून जात नाही . उलट कमी वयात लक्षाधीश बनून निवृत्त होतात . पण गेल्या पंधरा वर्षात पाच वकिलांचे संशयास्पद मृत्यू झाले आहेत आणि हे सर्व अपघाती मृत्यू आहेत .
एक तरुण वकील जो नुकताच लॉ कॉलेजमधून बाहेर पडलाय.तो गरीब आहे मेहनती आहे प्रामाणिक आहे . फर्मने त्याला आपल्याकडे घेतलाय . त्यानेही दिवसाचे अठरा अठरा तास काम करून आपली निवड सार्थ ठरवली आहे . पण कुठेतरी काहीतरी चुकतेय याची सतत त्याला जाणीव होतेय . त्याच्या घरात ,कारमध्ये ,मायक्रोफोन बसविले आहेत . त्याच्यावर आणि त्याच्या पत्नीवर पाळत ठेवली जातेय . त्याने नेमलेल्या एका खाजगी डिटेक्टिव्हचा अमानुषपणे खून झालाय .
एफबीआय या फर्मवर बारीक लक्ष ठेवून आहे . या फर्मच्या मागे एक प्रसिद्ध माफिया फॅमिली आहे असा त्यांना संशय आहे . त्यांचा प्रचंड काळा पैसा पांढरा करण्यासाठी या फर्मचा वापर केला जातोय . एफबीआयने आता या तरुण वकिलांची मदत घ्यायची ठरविले आहे .
तो तरुण वकील आणि त्याची पत्नी दोघेही माफिया आणि एफबीआयच्या जाळ्यात अडकतात . आता त्यांना तेथून बाहेर पडायचे आहे .....

No comments:

Post a Comment