Tuesday, September 17, 2019

इंजिनियर्स डे

इंजिनियर्स डे
त्या फाईव्ह स्टार हॉटेलच्या डायनिंग हॉलमधील कोपऱ्यातील  टेबलवर ते दोघे आज भेटणार होते.
नेहमीप्रमाणे तो वेळेच्या आधीच आला होता . दिसायला साधारणच होता . असल्या हॉटेलमध्ये यायची सवय मुळीच दिसत नव्हती.सावधपणे चारीबाजूने नजर फिरवून तो भिंतीकडे पाठ करून बसला.  नंतर हातातील टॅब ओपन करून शांतपणे काम करु लागला.
थोड्यावेळाने ती आली. दोघेही एकाच वयाचे दिसत होते . ती दिसायला सुंदर होती.नवीन डिझाईनची साडी तिला खुलून दिसत होती . सराईत असल्याप्रमाणे त्याच्या टेबलाजवळ आली . त्याने मान वर करून पाहताच ओळखीचे हसली आणि समोर बसली.
" उशीर झाला का ....."?? तिने विचारले .
"नाही ग ....मीच लवकर आलो... तो म्हणाला. "नेहमीसारखा ...."?? तिने हसत विचारले.
"काय करणार ....?? असे करावेच लागते .धंद्याचा भाग आहे तो ... तो हसून म्हणाला.
"मग काय म्हणतोय धंदा ...."?? तिने ज्यूसचा घोट घेत विचारले.
"मस्त .. !! जो पर्यंत लफडी आहेत तोपर्यंत आमच्या धंद्याला मरण नाही .तुझे काय ..."?? त्याने विचारले.
"राजकारणी लोकांना कुठे मरण असते...."?? तिने उलट प्रश्न केला."ज्याची पार्टी वरचढ त्याच्याकडे जायचे . पदरात खुर्ची पडून घ्यायची. जाऊदे मी सांगितलेल्या कामाचे काय झाले ..."?? तिने विचारले.
त्याने खिशातून मेमरी कार्ड काढून तिच्या हातात दिले ." 64 जीबी फुल आहे. तुला पाहिजे त्यापेक्षा जास्त काही आहे यात . नवीन प्रकारच्या कॅमेऱ्यांमुळे रात्रीच्या अंधारातले ही स्पष्ट दिसते तर सुस्काराही कानाजवळ ऐकू येतो.सोशल मीडिया ..मेल.. सर्व काही हॅक केले होते.
" छान .. पैसे तुझ्या अकाउंटला जमा करते मी " तिने मेमरी कार्ड पर्समध्ये ठेवले. दोघेही शांतपणे जेवू लागले.
" कसा या धंद्यात आलास रे तू ...."?? खूप हुशार विद्यार्थी होतास तेव्हा ...."?? तिने अचानक विचारले.
" तू कशी राजकारणात आलीस ...?? फॉरेनला जाशील असे वाटले होते .."त्याने तसेच उत्तर दिले.
" हो रे ...माझ्या घरात सगळे शिकलेले. कदाचित त्यामुळेच एक आत्मविश्वास होता अंगात . पण कॉलेजच्या निवडणुका , फॅसिलिटी यात नकळत गुंतून गेले . तुला माहीतच आहे कुठेही अन्याय होताना दिसला की मी पुढेच . नंतर एके ठिकाणी जॉब केला पण तिथेही कंपनी पॉलिटिक्स सुरू .नकळत या राजकारणात ओढले गेले . आणि आता यातच गुरफटलीय . काही गोष्टी पास करून घ्यायचा आहेत त्यासाठी  काही व्यक्तींची आतली ओळख असावी म्हणून अश्या गोष्टी जमवाव्या लागतात .कधी कुठे कसा वापर होईल सांगता येत नाही बाबा ... पर्समधील मेमरी कार्ड दाखवत ती हसत म्हणाली.
" माझ्या घरातच दारिद्रय..  त्यामुळे पैसे कमविणे हा माझा मूळ हेतू . शिक्षण पूर्ण झाले .एक दोन ठिकाणी जॉब केला पण पगार काही चांगला नव्हता . कॉम्प्युटर नेट सर्फिंग यात मी एक्सपर्ट .एक दिवस मित्राने सांगितले एकाचा कॉम्प्युटर लॉक झालाय ओपन करून देशील का ....?? सोपे काम होते ते ..?? पण त्या कॉम्प्युटरमध्ये बऱ्याच काही गोष्टी होत्या . अपेक्षेपेक्षा जास्त पैसे मिळाले .  मग अशीच छोटी मोठी कामे स्वीकारू लागलो . एक जण म्हणाला माझ्या बायकोचा मोबाईल हॅक कर ,तर एक स्त्री सांगते नवऱ्याचा बाहेर लफडी आहेत असा संशय काहीही करून त्याला पकडायचे आहे . हल्लीच्या स्मार्टफोन आणि वेगवेगळ्या गॅझेटमुळे ही कामे बरी पडतात. तक्रार कोण करायला जात नाही .. आता पैसे ही चांगले मिळतात शिवाय मनात येईल तेव्हा काम करायचे . तो रोजचा प्रवास ,मस्टर, आठ दहा तास काम ,बॉसच्या शिव्या यातून मुक्त आहे मी...." तो जेवता जेवता तिला सांगत होता.
"एकूण काय दोघेही आपल्या मार्गाने चाललोय .ओके.... निघते मी ... "असे म्हणून ती उठली." बाय द वे हॅपी इंजिनियर्स डे ..."असे म्हणत तिने हात पुढे केला.त्याने ही हातात हात घेत सेम टू यु म्हटले.
" खरेच इंजिनियर आहोत का आपण ......"?? त्याने विचारले . न्यूटन ..आईन्स्टाईन .. फक्त काही वर्षेच आपल्या आयुष्यात आले . त्यांचे नियम त्यांची तत्वे कधीच वापरली नाहीत आपण . उद्या तू मंत्री होशील काही वर्षांनी मुख्यमंत्रीही होशील .. इतरांवर कंट्रोल ठेवण्यासाठी माझ्यासारख्यांचा वापर करशील . मीही पैसे कमविण्यासाठी तुला साथ देईन ..."तो उद्वेगाने म्हणाला.
ती काही न म्हणता बाहेर पडली.
गाडीत बसताच तिने एकाला फोन लावला .." काम झाले आहे .आता तो काहीच कामाचा नाही .गायब करा त्याला".
आतमध्ये बसून तिचे संपूर्ण बोलणे त्याने कानात असलेल्या छोट्या इयरफोन मधून ऐकले. तो स्वतःशी हसला आणि  एक फोन लावला" हो सर.... आताच मॅडम मला भेटून गेल्या.त्यांचे काम केले आहे मी . अजूनही त्यांचे बाहेर तसले काही प्रकरण दिसत नाही पण लवकरच त्या कोणत्यातरी धोकादायक प्रकरणात अडकतील हे नक्की . सांभाळा तुमच्या बायकोला.जवळच उभ्या असलेल्या वेटरला घसघशीत टीप देऊन तो बाहेर पडला .
© श्री. किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment