Wednesday, September 14, 2016

समाजसेवा पण नकोशी वाटत असलेली

आज आरतीला बंड्या नाही बघूनच थोडा आश्चर्य चकित झालो .घरात गणपती आणि हा आरतीला हजर नाही ?थोडा चिडलोच ,न राहवून त्याच्या आईला विचारले "बंड्या ""??? तिने थोड्या घुश्यात उत्तर दिले गेलाय कर्जतला ,जल्लि मेली ती समाजसेवा," मी त्याच्या बाबांकडे नजर टाकली तर ते फक्त हसले .आरती संपता संपता बंड्या दारात हजर झाला पण आत शिरला नाही तसाच मागच्या दारातून बाथरूममध्ये घुसला .हा काय प्रकार आहे ते कळेना ,मी बंड्याशी बोलायचे ठरविले .तशीही बायको गणपतीसाठी चार दिवस माहेरी गेली होती त्यामुळे माझ्याकडे हि वेळ होता ."काका तुम्ही घरी निघा ,मी येतो तुमच्याकडे " माझ्या मनातले विचार ओळखूनच बंड्या म्हणाला .
थोड्या वेळाने तो समोर बसला " काय रे ?,घरातला गणपती सोडून कुठे बाहेर  फिरतोस ?हे पाच दिवस तरी घरी राहा ,नंतर तुलाच करायचे आहे सगळे , कुठे गेलेलास भटकायला "??माझा प्रश्नाचा भडीमार चालू झाला ."प्रेताला"? बंड्याने मान खाली घालून  उत्तर दिले .मला भयानक धक्का बसला ,"अरे कोणाच्या "? घरचे बोलले कसे नाही मला " कोण गेले "?? मला राहवत नव्हते ."काका  ती आजी कोण आहे ?,होती ?मला माहित नाही ,पणती अनाथ होती आणि तिच्या मागे करणारे कोण नव्हते एव्हडेच मला माहित आहे " बंड्याने पडलेल्या चेहऱ्याने उत्तर दिले .'काय चाललंय ते नीट सांग बंड्या "?? मी रागाने बोललो . "काका मागच्या महिन्यात आमचा ग्रुप कर्जतला गेलेला ,आठवतंय? "अरे तू नेहमीच कुठे तरी भटकत असतोस .पुढे बोल ".मी म्हटले " तिथे सहज आम्ही एका वृद्धाश्रमाला भेट दिली .तेव्हा तिथे एका वृद्ध माणसाचे निधन झाले होते आणि सर्वजण महानगरपालिकेच्या गाडीची वाट पाहत होते .आम्ही त्याच्या चेहऱ्याकडे नजर टाकली आणि कुठेतरी मनातून हाललो ,त्याच्या चेहऱ्यावर  वेदना होती ,एक दुःख दडलेले दिसत होते.न राहवून आम्ही त्याची चौकशी केली ,तर एका मोठ्या सरकारी कंपनीतून मोट्या अधिकारपदावरून निवृत्त झालेला वृद्ध होता तो .दोन्ही मुले उच्च शिक्षण घेऊन परदेशात होती ,इथे कोणीच नाही,वेळच्या वेळी त्यांच्या खात्यात पैसे जमा होत होते.पण कोण भेटायला येत नव्हते ,.नेहमी बोलायचे खूप काही कमावले मी आयुष्यात पण खांद्यावर घेऊन जाणारी चार माणसे जमवू शकलो नाही .ते ऐकून आम्ही ठरविले याचे अंत्यसंस्कार आम्ही करू.आम्ही विधिपूर्वक त्याचे अंत्यसंस्कार केले .चितेवर ठेवताना का कुणास ठाऊक त्यांचा चेहरा समाधानी दिसला . आम्हालाही काहीतरी केल्याचा आनंद झाला .तेव्हापासून आम्ही त्या आश्रमातील बेवारशी मृतदेहांचे विधिपूर्वक अंत्यसंस्कार करायचे ठरविले ,.आज तिसरी व्यक्ती होती जिचे अंत्यसंस्कार आम्ही करुंन आलो काका कसे हे आयुष्य हो ,तरुणपणी या माणसांनी खूप मजा केली असेल ,कुटुंबासाठी खूप कष्ट घेतले असतील ,मित्रासाठी रात्री अपरात्री धावून गेले असतील,पार्ट्या केल्या असतील पण आज ते एकटे पडलेत ,त्यांचे कोणी ऐकत नाही त्यांना सांभाळायला नको म्हणून इथे आणून टाकतात पण जिवंत आहेत कि मेलेत हे हि पाहत नाहीत काय वाटत असेल हो त्यांना ?"म्हणून आम्ही ठरविले कमीत कमी याना बेवारशी मरण येऊ नये याची काळजी आम्ही घेऊ ,त्यांचे विधिपूर्वक अंत्यसंस्कार करू .मला माहित आहे असे कोणाच्याही बाबतीत घडू नये पण हे घडतेय मग आमच्यापरीने जे जे काही होईल ते आम्ही करू..मला काही सुचेना. हि कसली समाजसेवा ?आणि तीही यावयात .मी म्हटले अरे तुझ्या घरचे काय म्हणतील" ?"आई नाराज आहे पण बाबा काहीच म्हणाले नाहीत "." ठीक आहे ,मी बोलतो बाबांशी " मी त्याला आस्वासन दिले .
. दुसऱ्या दिवशी त्याचे बाबा रस्त्यातच भेटले " काल बंड्या बोलला माझ्याशी ,तुमचे काय मत आहे ? "खरे सांगू का " ?? बाबा म्हणाले " आज अभिमान वाटतो मला बंड्याचा , ,तो जे करतोय ते समाजाच्या दृष्टीने चुकीचे असेल ,रूढी परंपरेच्या विरुद्ध असेल पण त्याला जे योग्य वाटतेय तो ते करतोय ,आज माझे संस्कार कामी आले त्याच्या " मी ताबडतोब बंड्याला फोन केला " बंड्या पुढच्यावेळी जाशील तेव्हा सांग मला ,मीही खांदा द्यायला येईन .

No comments:

Post a Comment